निसर्गात किती सुंदर आणि आरोग्यदायी गोष्टी ईश्वराने निर्माण केल्या आहेत नाही....या सगळ्या निसर्गातील आरोग्यदायी गोष्टींची माहिती करून घेऊन ती आपल्या मित्रमैत्रिणींना सांगा आणि निरोगी रहा.
निसर्गातील वेगवेगळ्या गोष्टी या आपल्याला आनंद तर देतातच तसेच आपल्या निसर्गातील प्रत्येक गोष्ट आपल्या आरोग्यासाठी सुद्धा उपयुक्त आहेत. वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळी फुलं निसर्गात फुलतात. वेगवेगळ्या रंगांची सुंदर फुले मन प्रसन्न करतात. तुम्हाला आतापर्यंत माहीत झालं असेलंच की ही फुलं केवळ शोभा वाढवण्यासाठी, केसात माळण्यासाठी, गुच्छ म्हणून भेट देण्यासाठीच नव्हे तर फुलांचा वापर आहारात आणि औषधांमध्ये सुद्धा केला जातो. आज आपण अशाच एका सुंदर फुलाचे आरोग्यासाठी फायदे जाणून घेणार आहोत.
सुंदर निळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे, गाईच्या कानासारखा आकार असलेले फूल जे गोकर्ण या नावाने ओळखले जाते. संस्कृत भाषेत अपराजिता तसेच भगवान विष्णूला प्रिय असल्यामुळे या फुलांच्या वेलीला विष्णुकांता असे म्हटले जाते. पांढऱ्या, फिकट निळ्या तसेच गडद निळ्या अश्या तीन प्रकारात ही फुलं फुलतात. तुम्ही ही सुंदर फुलं बघितली आहेत का??? अपराजिताच्या वेलीला छोट्या शेंगासुद्धा लागतात. या शेंगांमध्ये बिया असतात. सुकलेल्या शेंगांमधून बिया गोळा करून त्या पेरून त्यापासून नवीन वेल उगवता येते. ही आपराजिताची वेल आपल्या बागेचं सौंदर्य खुलवते त्याचबरोबर ती औषधी गुणांनी युक्त आहे बरं.
या वेलीची मुळं आणि बिया आयुर्वेद औषधांमध्ये वापरली जातात. औषधांमध्ये पांढऱ्या गोकर्णीचा वापर केला जातो आणि गोकर्णीच्या निळ्या फुलांचा चहा किंवा सरबत केले जाते.
अपराजिता बुद्धी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा उपयोगी आहे.
गोकर्णीच्या फुलांचे सरबत प्यायले असता शरीरातील उष्णता कमी होते. पोटात जळजळ होत असेल तर ती कमी होते.
गोकर्णीच्या चहा प्यायल्याने झोप शांत लागते, डोकं दुखत असेल तर ते दुखायचं थांबतं आणि रोग प्रतिकारक शक्ती म्हणजेच आपल्या शरीराची रोगांशी लढण्याची ताकद वाढते.
या उन्हाळ्यात बाजारात मिळणारी रसायने असलेली शरीराला हानिकारक शीतपेये न पिता या अपराजिता फुलांचे सरबत किंवा चहा करून प्या. हे सरबत किंवा चहा बनवण्यासाठी ताजी निळ्या गोकर्णीची फुलं वापरावी. ही फुलं सावलीत सुकवून सुद्धा वापरू शकता.
अपराजिता फुलांचे सरबत कसे बनवायचे ते बघुया.
साहित्य : अपराजिता फुलं: ८-१०
गरम पाणी: २ कप
मध किंवा खडीसाखर: २ चमचे
लिंबाचा रस: चमचाभर
कृति - अपराजिता फुलं स्वच्छ धुवून घ्या.
एका पातेल्या २ कप उकळते पाणी घ्या आणि त्यात फुलं भिजवा.
फुलं भिजवलेल्या पाण्याला एक सुंदर निळा रंग येईल. हे पाणी थंड झाले की गाळून त्यात २ चमचे खडीसाखर किंवा मध घालून मिश्रण चांगले ढवळा. सरबताची चव वाढवण्यासाठी त्यात चमचाभर लिंबू रस घाला. लिंबाचा रस घातला की सरबताचा रंग बदलून तो जांभळा होतो. या सरबतात भिजवलेल्या सब्जाच्या बिया म्हणजेच तुपमिरी आपल्या आवडीनुसार घालून थंड थंड, निळेशार आरोगदायी सरबत प्या.
तुमच्याकडे ही फुलं असतील तर ताजी फुलं काढून सुकवून ठेवा म्हणजे पावसाळ्यात अपराजिता फुलांचा चहा करून तुम्ही पिऊ शकता. नैसर्गिक निळ्या रंगाचं आणि आरोग्यासाठी फायदेशीर असं सरबत किंवा चहा प्यायला तुम्हाला नक्की आवडेल. निसर्गात किती सुंदर आणि आरोग्यदायी गोष्टी ईश्वराने निर्माण केल्या आहेत नाही....या सगळ्या निसर्गातील आरोग्यदायी गोष्टींची माहिती करून घेऊन ती आपल्या मित्रमैत्रिणींना सांगा आणि निरोगी रहा. आणि हं तुमच्याघरी गोकर्णीची वेल नसेल तर लगेच कुंडीत लागवड करायच्या तयारीला लागा.
वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य