सूचना जारी करूनही दुर्लक्ष : १८ ते २० निरीक्षक नवीन जागी रुजू होण्याबाबत नाखुश
पणजी : गोवा पोलीस खात्याने सुमारे दोन वर्षांपासून एकाच ठिकाणी असलेल्या निरीक्षकांसह इतर निरीक्षक मिळून ५० जणांच्या बदलीचे आदेश १७ एप्रिल रोजी जारी केले होते. या आदेशाला एक महिना होणार आहे. असे असताना सुमारे १८ ते २० निरीक्षक अजून नवीन जागी रुजू झाले नाहीत. या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचना जारी करून काहीही होत नसल्याचे समोर आले आहे.
पोलीस स्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार, पोलीस स्थानकातील, किनारी पोलीस, सुरक्षा विभाग, वाहतूक विभाग, गुन्हा शाखा, विशेष विभाग, दक्षता खात्याच्या भ्रष्टाचार विरोधी विभाग (एसीबी), अमली पदार्थ विरोधी पथक (एएनसी), गोवा राखीव दल (जीआरपी) तसेच इतर विभाग मिळून ५० निरीक्षकांची एकाच वेळी बदली केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, दुसऱ्या विभागातील निरीक्षकाला पदावरून मुक्त केले नसल्यामुळे एक- दोन पोलीस स्थानकात नवीन निरीक्षकाने ताबा घेतला नाही. याशिवाय जारी केलेल्या आदेशातील पाच निरीक्षक सुटीवर गेले आहेत. त्यातील एका निरीक्षकाने आदेश येण्यापूर्वी दीर्घकालीन सुटी घेतली होती. तर, एक निरीक्षक नवीन जागी रुजू झाल्यानंतर सुटीवर गेला आहे. तीन निरीक्षक आदेश आल्यानंतर नवीन जागी रुजू होण्यापूर्वी सुटीवर गेले. याशिवाय एक- दोन निरीक्षकांनी नाराजी व्यक्त करून नवीन जागी जाण्यास नकार दिला. यासाठी त्यांनी राजकीय वशिलेबाजी लावली. त्यामुळे पुढील काही दिवसात निरीक्षकाचा नवीन बदलीचा आदेश येण्याची शक्यता आहे. या कारणामुळे संबंधित विभागातील निरीक्षकांना वरिष्ठांनी मुक्त केलेले नाही. या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अनेकदा बिनतारी संदेश जारी करून बदली झालेल्या निरीक्षकांना मुक्त करण्यास सांगितले आहे. मात्र, संबंधित विभागात बदली झालेले निरीक्षक रुजू झाले नसल्यामुळे दुसऱ्या विभागातील निरीक्षकांना वरिष्ठ अधिकारी मुक्त करण्यास नकार देत असल्याची माहिती समोर आली आहे.
अनेक पोलीस निरीक्षक सुटीवर
बदली आदेशानुसार, वाहतूक विभागातील तीन निरीक्षक, जीआरपी आणि सुरक्षा विभागातील प्रत्येकी दोन निरीक्षक, गुन्हा शाखा, किनारी पोलीस स्थानक, बार्देश तालुक्यातील एका पोलीस स्थानकातील, विशेष विभाग, एसीबी, डीजीपी रीडर आणि दक्षता विभागातील प्रत्येकी एक निरीक्षक रुजू झाला नाही. याशिवाय किनारी पोलीस स्थानक, सायबर विभाग, पोलीस प्रशिक्षण स्कूल (पीटीएस), एएनसी आणि वाहतूक विभागातील प्रत्येकी एक निरीक्षक सुटीवर आहे.
पोलीस खात्याने आदेश जारी करून ५० निरीक्षकांची बदली केली होती. याच दरम्यान दक्षिण गोव्यातील कुडचडे पोलीस स्थानकावर आयपीएस प्रशिक्षणार्थीची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. तर, कोलवा पोलीस निरीक्षकाला दक्षिण गोवा राखीव लाईनमध्ये नियुक्त केले आहे. त्यामुळे वरील दोन्ही पोलीस स्थानकाचा अतिरिक्त ताबा दुसऱ्या निरीक्षकाकडे देण्यात आला आहे.