पणजी : गोवा पोलिसांच्या सायबर विभागाने आंतरराष्ट्रीय सायबर स्लेवरी जॉब स्कॅमचा पर्दाफाश करून चार संशयितांना अटक केली होती. यातील संशयित रुपनारायण गुप्ता आणि आदित्य रविचंद्रन या दोघांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे.
या प्रकरणी तिसवाडी तालुक्यातील बांबोळी येथील चेतन मुरगावकर या युवकाने सायबर विभागात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, त्याची म्यानमारमधून फेब्रुवारी २०२५ मध्ये सुटका केली होती. त्यानंतर सायबर विभागाने पीडित युवकाचा जबाब नोंद केला होता. थायलंडमधील एका कॉल सेंटरमध्ये नोकरी असल्याची जाहिरात इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध झाल्याचे त्याच्या नजरेस आले. त्यात सदर जाहिरातदार एजंटने मासिक ६० हजार रुपये वेतनाची नोकरी मिळेल, असे सांगितले होते. सर्व पाठपुरावा केल्यानंतर संबंधित संशयित एजंटने चेतन मुरगावकर याला दि. १४ जानेवारी २०२५ रोजी थायलंडला नेले. त्यानंतर १५ जानेवारी रोजी तेथे पोहोचल्यानंतर दुसर्या दिवशी त्याला बोटीमार्गे म्यानमारमध्ये नेले. तेथील के के पार्क या बंदिस्त ठिकाणी असलेल्या कॉल सेंटरमध्ये त्याला ठेवण्यात आले. तिथे त्याला अमेरिकन नागरिकांना मोबाईलवरून युवती असल्याचे संदेश पाठवून हनी ट्रॅपमध्ये ओढण्यास व पैसे गुंतवण्यास भाग पाडण्यास सांगितले. याच दरम्यान तेथील लष्कराने सदर कॉल सेंटरवर छापा टाकत मुरगावकर याच्यासह इतर भारतीय युवकांची सुटका केली होती. युवकाला दिल्लीत आणल्यानंतर सीबीआयने त्याची चौकशी करून त्याला गोवा पोलिसांच्या स्वाधीन केले होते. त्यानंतर वरील माहितीच्या आधारे सायबर विभागाने गुन्हा नोंद केला. याच दरम्यान सायबर विभागाने या प्रकरणातील संशयित आदित्य रविचंद्रन याला अटक केली. त्यानंतर विभागाने मुख्य सूत्रधार चिनी वंशाचा कझाकी नागरिक तलानिती नुलाक्सी आणि रुपनारायण गुप्ता या दोघांना अटक केली. तसेच यात जेन्सी राणी हिचा सहभाग असल्यामुळे तिलाही अटक करण्यात आली होती. या चौघांना न्यायालयाने प्रथम पोलीस कोठडी ठोठावली. त्यानंतर संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
१९ रोजी सुनावणी
चौघांनी मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. तो न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतर वरील संशयितापैकी रुपनारायण गुप्ता आणि आदित्य रविचंद्रन या दोघांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ रोजी होणार आहे.