आग विझविण्यास अग्निशामक दलाला यश
केपे : चानीमळ काले येथील बंद चिरेखाणीत रसायन आणि वैद्यकीय कचरा टाकल्याप्रकरणी पोलिसांनी मीराबाग येथील सुदेश नाईक आणि नावेली येथील कंत्राटदार दिनकर पटेली यांना अटक केली आहे.
चिरेखाणीत टाकलेल्या कचऱ्याला तीन दिवसांपूर्वी आग लागली होती. ही आग तीन दिवसांनी आटोक्यात आणण्यास कुडचडे अग्निशामक दलाला यश आले आहे. आग लागल्याने विषारी धूर निघत होता. यामुळे परिसरातील लोकांना स्थलांतरित व्हावे लागले होते.
रासायनिक कचऱ्याला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाला कचऱ्यावर माती घालावी लागली होती. स्थानिकांनी आता खड्ड्यांमध्ये टाकण्यात आलेला कचरा काढून कचरा व्यवस्थापन महामंडळाकडे सोपवावा, अशी मागणी केली आहे.
सांगेचे उपजिल्हाधिकारी मिलिंद्र वेळप यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन अधिकाऱ्यांनी मातीच्या मदतीने आग विझवली असली तरी आत आग धुमसत आहे. यातून विषारी धूर बाहेर पडत आहे.
संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी. हा गावकऱ्यांच्या आरोग्याचा आणि आमच्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. पावसाळा जवळ आला असून पावसाच्या पाण्यामुळे हे विषारी पदार्थ जवळच्या नदीत आणि विहिरींमध्ये वाहून जाणार असल्याची भीती आहे, असे सर्वेश पागी यांनी सांगितले.