एका आस्थापनाला ठोठावला दंड
म्हापसा : अन्न आणि औषधे प्रशासनाने कळंगुट व काणका येथील प्रत्येकी दोन रेस्टॉरंट्स बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. तर, एका आस्थापनाला अस्वच्छ जागेत व्यवसाय चालवल्याबद्दल २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
अन्न व औषधे प्रशासनाने सुरू केलेल्या देखरेख मोहिमेचा एक भाग म्हणून प्रशासनाच्या संचालक श्वेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर गोवा अधिकारी रिचर्ड नोरोन्हा यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी म्हापसा मार्केट सबयार्ड, काणका व कळंगुट या ठिकाणी मंगळवारी पाहणी केली. विविध १४ आस्थापनांची यावेळी तपासणी करण्यात आली.
तपासणीवेळी काणका येथील एका रेस्टॉरन्टमध्ये अवैधरित्या गोमांसचे पदार्थ विक्रीस ठेवल्याचे आढळून आले. त्यामुळे सदर रेस्टॉरन्टसह काणकातील अजून एक रेस्टॉरन्ट बंद करण्याचा आदेश संबंधित मालकांना देण्यात आला.
कळंगुटमध्ये अस्वच्छतेच्या कारणावरुन दोन रेस्टॉरन्ट बंद करण्यात आली. शिवाय, एफडीए अधिकाऱ्यांनी म्हापसा मार्केट सबयार्डमधील काही विक्रेत्यांकडील केळीचे नमुने घेतले व सदर नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत.
दरम्यान, कळंगुटमधील एका प्रमुख चॉकलेट वितरकाकडून चॉकलेट म्हणून लेबल केलेल्या चुकीच्या बँडेड मिठाईच्या साठ्याची तपासणी केली. नंतर सदर नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले.