पोलीस महासंचालक : आपत्तींना तोंड देण्यासाठी साहित्य आणणार
प्रतिनिधी। गाेवन वार्ता
पणजी : पोलीस, अग्निशामक दल, डॉक्टर यांचा समावेश असलेल्या कायमस्वरूपी राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. हा विभाग अस्तित्वात आल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन करणे सोपे होईल. तसेच काही अावश्यक साहित्यांची कमतरता दूर करण्यासाठी आवश्यक साहित्यांची खरेदी केली जाईल, असे पोलीस महासंचालक अलोक कुमार यांनी सांगितले.
आपत्तीला तोंड देण्यासाठी कौशल्यासह साधनसुविधा आणि उपकरणांची गरज असते. प्रशिक्षणाच्या माध्यमातून कुशल जवान घडवणे शक्य होणार आहे, असे अलोक कुमार यांनी सांगितले. गोवा पोलिसांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि एनडीआरएफच्या संयुक्त विद्यमाने अणू आणि रेडिओलॉजी आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशिक्षण आयोजित केले होते. या प्रशिक्षणाचा समारोप बुधवारी झाला. पोलीस, डॉक्टर आणि अग्निशामक दलाचे जवान मिळून २०५ अधिकारी प्रशिक्षणात सहभागी झाले होते. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पोलीस तसेच इतर अधिकाऱ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. पोलीस महासंचालक अलोक कुमार, एनडीआरएफचे डेप्युटी कमांडंट अशोक कुमार, आयपीएस अजयकृष्ण शर्मा, पोलीस अधीक्षक सुनीता सावंत, तसेच इतर अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते. एनडीआरएफ पुणे येथील तज्ज्ञांनी शिबिरात मार्गदर्शन केले. २८ एप्रिल ते १४ मेपर्यंत पाच तुकड्यांनी विभागणी करून प्रशिक्षण पूर्ण केले.
दरवर्षी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर हवे !
कोणत्याही प्रकारची आपत्ती आली तरी त्याला तोंड देण्यासाठी पोलीस तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाची तयारी असली पाहिजे. आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीसाठी पोलीस, डॉक्टर, तसेच इतरांसाठी दरवर्षी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले पाहिजे, असे मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू यांनी सांगितले. आल्तिनो येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आयोजित प्रशिक्षणाच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते. डेप्युटी कमांडंट अशोक कुमार यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती दिली.