अखिल गोवा टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा : अग्निशमनला धूळ चारत पटकावले विजेतेपद
मडगाव : मडगाव नगरपरिषदेने आयोजित केलेल्या अखिल गोवा नगर परिषदा आणि इतर सरकारी कार्यालये तसेच मडगाव पत्रकार संघ यांच्यातील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय संघाने शानदार विजय मिळवला. अंतिम सामन्यात त्यांनी दक्षिण गोवा अग्निशमन विभाग संघाचा २१ धावांनी पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद आणि आकर्षक ट्रॉफी आपल्या नावे केली. मडगाव येथील राजेंद्र प्रसाद स्टेडियमवर या रोमांचक स्पर्धेचा अंतिम सामना रंगला.
या स्पर्धेत एकूण १४ संघांनी सहभाग घेतला होता. नॉकआउट फेरी आणि उपांत्य फेरीतील सर्व सामने प्रत्येकी चार षटकांचे खेळवण्यात आले. मात्र, अंतिम सामन्याची उत्सुकता अधिक वाढवण्यासाठी तो प्रत्येकी तीन षटकांचा ठेवण्यात आला होता. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय संघाने निर्धारित तीन षटकांत ६४ धावांचे लक्ष्य दक्षिण गोवा अग्निशमन विभागासमोर ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना अग्निशमन विभागाच्या संघाला केवळ ४३ धावाच करता आल्या. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या संघाने २१ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण
या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला मडगावचे आमदार दिगंबर कामत, मडगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष दामोदर शिरोडकर, मुख्य अधिकारी मेल्विन वाझ, गोवा महानगरपालिका कर्मचारी संघटनेचे सचिव अनिल शिरोडकर, मडगावचे पत्रकार प्रतिनिधी प्रसाद नागवेकर, नगरसेवक राजू नाईक, महेश आमोणकर, लता पेडणेकर, सुनीता पराडकर आणि आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या आणि उत्कृष्ट खेळाडूंना गौरविण्यात आले.
या स्पर्धेचा उद्घाटन समारंभही मोठ्या उत्साहात पार पडला. त्यावेळी आमदार दिगंबर कामत आणि मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांच्यासह नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, मडगावच्या उपसभापती बबिता नाईक, हज समितीचे अध्यक्ष उर्फान मुल्ला, वास्कोचे मुख्य अधिकारी सिद्धिविनायक नाईक, मडगाव क्रिकेट क्लबचे अध्यक्ष योगेश नायक, हॉस्पिसियोचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र बोरकर, सामाजिक कार्यकर्ते योगीराज कामत, मडगाव नगरपालिकेचे नगर अभियंता दीपक फळदेसाई आणि विविध नगरपालिकांचे अध्यक्ष व नगरसेवक उपस्थित होते.
उत्कृष्ट खेळाडूंचा गौरव :
या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. त्यांची यादी खालीलप्रमाणे आहे. सर्वोत्कृष्ट फलंदाज कुंदन गावस (दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय), सर्वोत्कृष्ट गोलंदाज अनिल टाटो (अग्निशमन विभाग), मालिकावीर साईश गुरव (दक्षिण गोवा रुग्णालय), अंतिम सामन्यातील सामनावीर कुंदन गावस (दक्षिण गोवा रुग्णालय), स्पर्धेतील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक प्रवीण वेळीप (मडगाव नगरपालिका) यांना गौरविण्यात आले.