मान्सून अंदमान समुद्रात दाखल

अनुकूल वातावरण राहिल्यास आगेकुच शक्य


7 hours ago
मान्सून अंदमान समुद्रात दाखल

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : अनुकूल वातावरणामुळे मान्सून दक्षिण अंदमान समुद्र, बंगालच्या उपसागराचा आग्नेय भाग आणि निकोबार बेटांवर दाखल झाला आहे. भारतीय हवामान खात्याने याबाबत केलेला अंदाज खरा ठरला आहे. अनुकूल वातावरण कायम राहिल्यास पुढील चार दिवसांत मान्सून आगेकुच करण्याची शक्यता आहे. दरम्यान मंगळवारी पणजीत कमाल ३५.५ अंश, तर किमान २७.२ अंश सेल्सिअस तापमान होते. मुरगावमधील कमाल तापमान ३४.८ अंश, तर किमान तापमान २५.८ अंश सेल्सिअस राहिले.
पुढील सहा दिवस राज्यातील कमाल तापमान ३५ अंश, तर किमान तापमान २७ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. मंगळवारी पणजीसह राज्यातील अन्य भागांत पावसाच्या किरकोळ सरींची नोंद झाली. २४ तासांत राज्यात ३.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मुरगाव येथे २९ मिमी, दबोळीत १९ मिमी, तर सांगेत २ मिमी पावसाची नोंद झाली. १ मार्च ते १४ मे दरम्यान राज्यात सरासरी १७.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
तीन दिवस पावसाचा ‘यलो अलर्ट’
हवामान खात्याने राज्यात १४ ते १६ मे दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यानुसार तीन दिवसांसाठी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. १७ ते १९ मे दरम्यान किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.