२०२४-२५ मध्ये सर्वाधिक ९८७ कोटींचा महसूल
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : कोविडनंतर राज्यातील पर्यटकांची संख्या वाढत आहे. राज्यातील विविध पद्धतीच्या मद्य शुल्कातून मिळालेल्या महसुलातही वाढ झाली आहे. मागील पाच वर्षांत राज्यातील अबकारी महसुलात तब्बल ८३.८२ टक्क्यांची वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये अबकारी खात्याने ५१५.१७ कोटी रुपयांचा महसूल मिळवला होता. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये त्यात सुमारे ४३२ कोटींची भर पडली. या आर्थिक वर्षात खात्याने ९४७ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे.
खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील १४ आर्थिक वर्षात २०२४-२५ मध्ये मिळालेला महसूल हा सर्वाधिक आहे. २०११-१२ मधील महसूल सर्वांत कमी, म्हणजेच १८२.३४ कोटी रुपये होता. यानंतर पुढील सर्व आर्थिक वर्षात महसुलात वाढ होत गेली आहे. कोविड कालावधीतही अबकारी महसुलात मागील वर्षीपेक्षा वाढ दिसून आली. २०२१-२२ मध्ये ६५०.०८ कोटी, २०२२-२३ मध्ये ८६५.८० कोटी रुपये महसूल प्राप्त झाला होता.
२०१४ पासून दीड लाख परवाने जारी
खात्याने ऑक्टोबर २०१४ पासून आतापर्यंत विविध प्रकारचे सुमारे १.५० लाख ‘ना हरकत’ दाखले अथवा परवाने जारी केले. यामध्ये सर्वाधिक १.३६ लाख वाहतूक परवाने आहेत. याशिवाय ६८ हजार निर्यात परवाने, ४२ हजार आयात परवाने, तर ४,३८१ आयात ईव्हीसी परवाने आहेत. आयातीसाठी ७,३६८ तर ४,७३८ निर्यात ‘ना हरकत’ दाखले देण्यात आले. जुलै २०२४ अखेरीस खात्याने १४ हजार १०२ मद्य परवाने जारी केले होते. यातील सुमारे ९ हजार परवाने हे घाऊक मद्य विक्रीसाठीचे होते.