बारामती तालुक्यातील घटनेने सर्वत्र हळहळ
बारामतीः देशात महिला आणि मुली खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न पुन्हा उपस्थित होतोय. त्यामागे कारण देखील तसंच आहे. गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून एका अल्पवयीन मुलीने स्वत:ला संपवलं. त्या मुलीने यंदा दहावीची परीक्षा दिली असून ती इयत्ता दहावीत शाळेत पहिली आली आल्याची माहिती मिळाली आहे.
वेदनादायी बाब म्हणजे हे यश, हे कौतुक पाहायला ती मात्र आज या जगात नाही. ही घटना घडलीय बारामती तालुक्यातील एका गावात. लेकीचा परीक्षेचा निकाल कळताच आई-वडीलांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. या मुलीला पूर्ण न्याय मिळाला नसून चार आरोपींपैकी केवळ एका आरोपीला अटक झाली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, बारामती तालुक्यातील पीडितेच्या गावातील आरोपी विशाल दत्तात्रय गावडे हा आपले साथीदार प्रवीण नामदेव गावडे, शुभम सतीश गावडे, सुनील हनुमंत खोमणे यांच्यासह गेल्या अनेक महिन्यांपासून सदर मुलीचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत होता.
ते तिचा पाठलाग करायचे, तिला धमकी देणारे संदेश पाठवायचे आणि तिला शस्त्रे दाखवून घाबरवायचे. 'तू जर माझ्याशी बोलली नाही तर तुझ्या घरातील कोणालाही जिवंत ठेवणार नाही, सर्वांची कोयत्याने मुंडकी उडवीन, शिवाय गावच्या यात्रेपूर्वी लग्न कर, अन्यथा तुझ्या घरच्यांना संपवणार,' अशी धमकी तिला आरोपींनी दिली होती. आरोपींकडून वारंवार होणारा पाठलाग आणि दमदाटीला ती मुलगी कंटाळली होती.
अखेर हा त्रास असह्य झाल्याने तिने ८ एप्रिल रोजी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. या प्रकारानंतर कुटुंबाने न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न केले असले तरी, आतापर्यंत फक्त एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. आता उर्वरित आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत आहेत.