महत्त्वाची बातमी! 'भारतात आयफोन कंपन्या उभारू नका', ट्रम्प यांचे सीईओंना आदेश

कतारमध्ये ट्रम्प यांनी केली कुक यांच्याशी बातचीत

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
7 hours ago
महत्त्वाची बातमी! 'भारतात आयफोन कंपन्या उभारू नका', ट्रम्प यांचे सीईओंना आदेश

नवी दिल्लीः भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर दोन्ही देशांकडून एकमेकांविरोधात कारवाया सुरू झाल्या होत्या. ही युद्धजन्य परिस्थिती निवळावी आणि ते श्रेय आपल्याला मिळावे, यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करुन 'भारत-पाकिस्तान यांच्यातील कारवाया थांबल्या असून त्यासाठी मी प्रयत्न केल्याचे सांगितलं. एवढेच नव्हे तर शस्त्रसंधी थांबवावी अन्यथा दोन्ही देशांसोबत अमेरिका व्यापार संबंध तोडून टाकेल, असा दबाव टाकल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले.

त्यानंतर ट्रम्प यांची मध्यस्थी हा चर्चेचा विषय बनला असून त्यानंतर तातडीने पंतप्रधान मोदींनी, 'भारत पाकिस्तान यांच्यातील वादात तिसऱ्या कुणाचाही मध्यस्थी चालणार नसल्याचे ठणकावले. तसेच, अणवस्त्राचा दबाव आमच्यावर लादू नये,' असेही भारत सरकारने स्पष्ट केले आहे.

या घडामोडी घडताच आता ट्रम्प यांनी एक नवा डाव सुरू केला आहे. सध्या आयफोन आणि आयपॅड तयार करणारी 'ॲपल' ही कंपनी भारतात आपल्या प्रोडक्टचे उत्पादन करत आहे. येत्या काही काळात त्याचा विस्तारही केला जाणार आहे. परंतु आता त्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केलंय. 

यात त्यांनी ॲपलला भारतात आयफोन तयार न करण्याचा सल्ला दिलाय.  ट्रम्प यांनी कंपनीचे सीईओ टिम कुक यांना तसे आदेश दिले आहेत. कतारमध्ये झालेल्या त्यांच्या भेटीत ट्रम्प यांनी कुक यांच्याशी झालेल्या चर्चेचा उल्लेख करत ही माहिती दिली.

अमेरिकेत रोजगार वाढण्यासाठी निर्णय-
ट्रम्प यांचं हे विधान त्यांच्या 'अमेरिका फर्स्ट' धोरणाचं प्रतिबिंब असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. ॲपलसारख्या बड्या ब्रँडने अमेरिकेत गुंतवणूक करावी जेणेकरून तिथे नोकऱ्या वाढतील, अशी त्यांची इच्छा आहे. 

भारतात ॲपल फॉक्सकॉन आणि टाटा यांच्या सहकार्यानं आयफोन बनवत आहे. २०२५ मध्ये भारतात तयार होणाऱ्या आयफोनपैकी १५ टक्के आयफोन अमेरिकेत पाठवले जाणार आहेत, अशीही माहिती आता मिळत आहे.

हेही वाचा