गोवा कर्मचारी भरती आयोगाकडून नोटीस जारी
पणजी : कर्मचारी भरती आयोगामार्फत नव्याने भरती होणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदांसाठी सध्या सेवेत असलेले पोलीस शिपाई (पीसी), हवालदार (एचसी) व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) यांच्यासाठी वयाची अट शिथिल करून ऑनलाइन अर्जाच्या नमुन्यात आवश्यक त्या सुधारणा केल्या आहेत. पीएसआय पदासाठी इच्छुकांची सेवा किमान ३ वर्षांची असणे आवश्यक आहे. गोवा कर्मचारी भरती आयोगाने याबाबतची नोटीस जारी केली आहे.
कर्मचारी भरती आयोगाने इतर अनेक पदांसह पोलीस उपनिरीक्षकांची (पीएसआय) १८७ पदे भरण्यासाठी जाहीरात दिली आहे. १८७ पदांपैकी ३० पदे महिलांसाठी राखीव आहे. याशिवाय एससी, एसटी, ओबीसी, क्रीडापटू या गटासाठी राखीव जागा आहेत.
सेवेतील पोलीस शिपाई, हवालदार व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांना अर्ज करणे शक्य व्हावे, म्हणून ऑनलाईन अर्जात आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत.
सेवेतील पोलिसांसाठी वयोमानात सूट मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या मागास (इडब्लूएस), इतर मागासवर्गीय (ओबीसी) व खुल्या (यूआर) गटासाठी ४०पर्यंत वयोमान असलेले अर्ज करण्यास पात्र आहेत. एससी/एसटी गटात ४५पर्यंत वयोमान असलेले अर्ज करण्यास पात्र ठरतात, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.