तिसवाडी : .. अन्यथा दोनशे लोकांना घेऊन पणजीत भीक मागावी लागेल : डोनाल्ड फर्नांडिस

अर्थसंकल्पात निवारा गृहांसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली होती, मात्र अद्याप निधी मिळालाच नाही.

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
7 hours ago
तिसवाडी : .. अन्यथा दोनशे लोकांना घेऊन पणजीत भीक मागावी लागेल : डोनाल्ड फर्नांडिस

पणजी : स्ट्रीट प्रोव्हिडन्स या एनजीओला अर्थसंकल्पात मंजूर झालेला निधी मिळालेला नाही. याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आम्हाला उद्या भेटण्यास बोलवले आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर संस्था वाचवण्यासाठी पणजीत २०० लोकांना घेऊन भीक मागावी लागेल असे वक्तव्य संस्थेचे अध्यक्ष डोनाल्ड फर्नांडिस यांनी केले. गुरुवारी त्यांनी आझाद मैदानात आंदोलन केले. यावेळी निवारा गृहातील महिला उपस्थित होत्या. 

फर्नांडिस यांनी सांगितले की, अर्थसंकल्पात निवारा गृहांसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली होती. यानुसार आमच्या संस्थेला निधी मिळणे आवश्यक होते. मागील तीन वर्षे हा निधी मिळवण्यासाठी आम्ही झगडत आहोत. सध्या सरकारकडे निधी उपलब्ध आहे. मात्र काही सरकारी अधिकाऱ्यांचा अहंकार आड येत असल्याने हा निधी आम्हाला दिला जात नाही. कदाचित मुख्यमंत्र्यांनी थेट तरतूद केल्यामुळे त्यांचा अहंकार दुखावला असेल. त्यामुळेच  ते आम्हाला सहकार्य करत नाहीत. 

ते म्हणाले, सध्या आमच्या संस्थेत सुमारे १९० महिला, ३५ केअर टेकर, ८५ कर्मचारी, दोन पूर्ण वेळ डॉक्टर, ३१ नर्स आहेत. या सर्वांचा महिन्याचा खर्च खूप असतो. सध्या आमच्याकडे ३१ मे पर्यंत पुरतील एवढेच पैसे आहेत. यानंतर आम्हाला संस्था चालवायची असेल तर रस्त्यावर येऊन भीक मागण्या शिवाय पर्याय पूर्ण नाही. उद्याच्या भेटीत आम्ही मुख्यमंत्र्यांना आमची आर्थिक परिस्थिती समजावून सांगणार आहोत. याशिवाय आम्हाला दिलेल्या पूर्वीच्या आश्वासनांची माहिती देणार आहोत.  ते आमच्या मागण्या मान्य करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. 

हेही वाचा