शिवराम गावकर : खरीप हंगामासाठी दोन टन ‘गोवा धान ३’ उपलब्ध
गोवन वार्ता
मडगाव : ‘रत्नागिरी ७’ या लाल भाताच्या वाणाची प्रायोगिक तत्त्वावर गेल्यावर्षी चाचणी घेण्यात आली. गोव्यात हे वाण चांगले उत्पादन देते. तसेच चवीलाही रुचकर असल्याने तीन वर्षांच्या चाचणीनंतर ते शेतकर्यांसाठी उपलब्ध केले जाईल. या वर्षीच्या खरीप हंगामासाठी खाजन भागासाठी ‘गोवा धान ३’ या वाणाचे दोन टन बियाणे तयार ठेवण्यात आले आहे, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे मुख्य तथा प्रकल्प समन्वयक अधिकारी शिवराम गावकर यांनी दिली.
दक्षिण गोवा कृषी विज्ञान केंद्रात शेतकर्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या उत्पादनात वाढ करण्यात येते. कृषी विज्ञान केंद्राकडून विविध भाताची, तसेच इतर पिकांची बियाणे व रोपे आणून गोव्याच्या वातावरणात कशाप्रकारे प्रतिसाद मिळतो, याची चाचणीही केली जाते. त्यानंतर ते शेतकर्यांना उपलब्ध केले जाते. कृषी विज्ञान केंद्राने गेल्यावर्षी ‘रत्नागिरी ७’ हे लाल भाताचे सुधारित वाण गोव्यातील वातावरणात कशाप्रकारे उत्पादन देते याची चाचणी घेतली होती. लाल भाताकडे दुर्लक्ष होत गेल्याने लागवड कमी होत गेली; पण हा भात पौष्टिक असल्याने पुन्हा याची लागवड करण्याकडे लक्ष दिले जात आहे. ‘रत्नागिरी ७’ वाण सुमारे ११० दिवसांत परिपक्व होते. सासष्टीसह बार्से, काणकोण, धारबांदोडा या तालुक्यांतही पीकाची लागवड घेतली होती. त्याची चव रुचकर असल्याचे आढळले. यावर्षी दुसर्यांदा काही शेतकर्यांना वाण उपलब्ध करून चाचणी केली जाणार आहे. तीन वर्षे चाचणीनंतर शेतकर्यांना हे वाण उपलब्ध केले जाईल, असे गावकर यांनी सांगितले.
सध्या खरीप हंगामातील भातशेतीसाठी कृषी विज्ञान केंद्राची तयारी सुरू आहे. ‘गोवा धान ३’ हे वाण खाजण भागात चांगले पीक देते. त्यामुळे उत्तर व दक्षिण गोव्यातील शेतकर्यांसाठी ‘गोवा धान ३’ चे सुमारे दोन टन बियाणे उपलब्ध असणार आहे. याशिवाय शेतकर्यांना आवश्यक रोपांची विक्रीही सुरू करण्यात आली आहे. दुर्गा फार्ममध्ये २० हजार माडाची रोपे असून ९० रुपये दराने विक्री होत आहे. याशिवाय काजूची रोपेही उपलब्ध आहेत.
मासळी सुकवण्याची सोय
दक्षिण गोवा कृषी विज्ञान केंद्रात विविध प्रकारची मासळी सुकवण्यासाठी ड्रायर उपलब्ध आहे. १ रुपये प्रति नग असा दर असून दोन हजार नग एकाचवेळी मशिनमध्ये ठेवून केवळ आठ तासांच्या कालावधीत सुकी मासळी उपलब्ध होते. यात मासळीचा खारेपणा व उष्णतेवर नियंत्रण ठेवता येते. उघड्यावर सुकवण्यापेक्षा ही पद्धत आरोग्यदायी असल्याचे गावकर यांनी सांगितले.
मासळी विक्रेत्यांना इन्सुलेटेड बॉक्स
दक्षिण गोवा कृषी विज्ञान केंद्रात मत्स्य उत्पादन, दूध व दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, घरातील बाग, एकात्मिक शेती यावर सातत्याने प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय पोषण पखवाडा कार्यक्रम आयोजित केला होता. मासळी विक्रेत्यांना ट्रायबल सबप्लानमधून इन्सुलेटेड बॉक्सही देण्यात आले आहेत. शेतीतून जास्तीत जास्त उत्पादन मिळावे यासाठी शेतकर्यांना प्रशिक्षित केले जाते. नवी वाण प्रायोगिक तत्त्वावर चाचणीनंतर शेतकर्यांना उपलब्ध केली जातात. याचा फायदा राज्यातील शेतकर्यांना होत आहे, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी शिवराम वायंगणकर यांनी दिली.