शिरगांव दुर्घटना अहवालावर देवस्थान समितीचे भाष्य; अध्यक्ष म्हणाले, 'आमच्यावरचा ठपका...'

प्रशासनाला आम्ही पूर्णपणे सहकार्य केले असून याप्रकरणी आम्ही दोषी नाही : गावकर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
4 hours ago
शिरगांव दुर्घटना अहवालावर देवस्थान समितीचे भाष्य; अध्यक्ष म्हणाले, 'आमच्यावरचा ठपका...'

डिचोली : शिरगांव दुर्घटनेची दखल घेत सरकारने सखोल चौकशीसाठी महसूल सचिव संदीप जॅकीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीने घटनास्थळी जाऊन तसेच प्रत्यक्षदर्शींशी चर्चा करून तयार केलेल्या अहवालात उत्तर गोव्याच्या माजी जिल्हाधिकारी स्नेहा गीते, माजी पोलीस ‍‍अधीक्षक अक्षत कौशल, डिचोलीचे माजी उपअधीक्षक जीवबा दळवी, माजी निरीक्षक दिनेश गडेकर, माजी उपजिल्हाधिकारी भीमनाथ खोर्जुवेकर यांच्यासह देवस्थान समिती आणि पंचायत समितीलाही दोषी ठरवले आहे. 

सरकार अहवालातील निष्कर्ष तपासत असून, दोषींवर निश्चित कारवाई करण्यात येईल, अशी हमी मुख्यमंत्र्यांनी दिली होती. त्यानंतर आता देवस्थान समितीने अहवालावर भाष्य केले आहे. 

समितीने जो अहवाल सादर केलेला आहे त्यात देवस्थान समितीने प्रशासनाला सहकार्य केले नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मात्र तो पूर्णपणे चुकीचा असून आम्हाला तो मान्य नाही. प्रशासनाला आम्ही पूर्णपणे सहकार्य केले असून याप्रकरणी आम्ही दोषी नाही, असे स्पष्टीकरण देवस्थान अध्यक्ष दीनानाथ गावकर यांनी दिले आहे. 

सरकारकडून आम्हाला अजून या अहवालासंदर्भात अधिकृत रिपोर्ट आला नाही. तो आल्यानंतर आम्ही त्यावर आमची भूमिका स्पष्ट करू. तसेच ज्या काही गोष्टी असतील त्या संपूर्ण महाजनांसमोर मांडून पुढील निर्णय घेऊ. मात्र जो ठपका ठेवला जातो, तो पूर्णपणे चुकीचा असल्याचा दावा अध्यक्ष दीनानाथ गावकर आणि देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. 

हेही वाचा