आधार कार्ड लिंक न केल्याने २१ हजार जणींनी गमावला ‘गृह आधार’

सूचना दिल्यानंतर ३ हजार महिलांनी केले आधार कार्ड लिंक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
53 mins ago
आधार कार्ड लिंक न केल्याने २१ हजार जणींनी गमावला ‘गृह आधार’

पणजी : दिलेल्या मुदतीत आधार कार्ड (Aadhaar Card) आधारित पेमेंट प्रणाली बँकेत जोडलेली नसल्यामुळे २१ हजारांहून अधिक लाभार्थ्यांचे गृहआधारचे पैसे अडकले आहेत. २४ हजार लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया केलेली नव्हती, पण मुदत संपण्यापूर्वी ३ हजार जाणांनीच ही प्रक्रिया पूर्ण केली. ज्या लाभार्थ्यांचा लाभ स्थगीत झाला आहे, त्यांनी ही प्रक्रिया केव्हाही पूर्ण करावी, त्यानंतर त्यांना थकबाकीसह योजनेचा लाभ मिळायला सुरुवात होईल, अशी माहिती महिला आणि बाल विकास खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

जे सरकारी लाभ बँक खात्यांमध्ये जातात त्या बँक खात्यांमध्ये पैसे १ मार्च २०२४ नंतर आधार पेमेंट प्रणालीद्वारे जमा करावेत, असे निर्देश वित्त खात्याने १७ नोव्हेंबर २०२३ रोजी एक परिपत्रक काढून सर्व खात्यांना दिले होते. त्यामुळे बाल आणि महिला विकास खात्याने १२ डिसेंबर २०२३ रोजी परिपत्रक काढून कळविले होते की यापुढे गृहआधाराचा लाभ थेट बँक खात्यात जमा होणार नाही आणि हे पैसे आधार पेमेंट प्रणालीद्वारे बँकेत जमा होतील. त्यासाठी सर्व लाभार्थ्यांनी आधार कार्ड आधारित पेमेंट यंत्रणा सक्रिय करण्यासाठी आपल्या बँकेला भेट देऊन आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक करण्याचे निर्देश दिले होते.

त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्याला आधार कार्डाची जोडणी करून आधार प्रणाली यंत्रणा सक्रिय केली त्यांना थेट बँक ट्रान्सफरद्वारे एप्रिल २०२५ पासून लाभ देण्याचा निर्णय घेतला होता. ज्या लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नव्हती, ती पूर्ण करावी यासाठी लाभार्थ्यांना एसएमएस पाठवला होता. बँकेत जाऊन ही प्रक्रिया करावी आणि त्यानंतर ही आधार पेमेंट प्रणाली सक्रिय झाली याची पुष्टी देणाऱ्या दस्तावेजासह आपले आधार कार्ड आणि बँक पासबूकची प्रत त्यांच्या संबंधित तालुक्यातील खात्याच्या गट कार्यालयात सादर करावी. जर ही प्रक्रिया ३० एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ण झाली नसेल तर या योजनेचा लाभ स्थगीत केला जाईल, असे कळविले होते.

२४,८५६ लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया केली नव्हती. त्यांना एसएमस पाठवल्यानंतर त्यापैकी ३,७१९ लाभार्थ्यांनी ३० एप्रिलपूर्वी आधार कार्ड बँक खात्याला लिंक करून ही पेमेंट प्रणाली सक्रिय केली. सध्या २१,१३७ लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यामुळे त्यांना लाभ मिळणे स्थगीत झाले आहे. त्यांनी आपल्या बँकेत जाऊन ही आधार पेमेंट प्रणाली सक्रिय करावी त्यानंतर त्यांचा लाभ बँकेत नियमितपणे यायला सुरुवात होईल. तसेच गेल्या महिन्यांची जी थकबाकी आहे ती त्यांना मिळणार आहे.

एकूण १,२४,२०४ लाभार्थी

ही प्रक्रिया करून घेण्यासाठी खात्यातर्फे खास मोहीम राबवली जाणार आहे. सध्या आधार पेमेंट प्रणालीद्वारे १,२४,२०४ लाभार्थींना गृहआधाराचा लाभ त्यांच्या खात्यात जमा होतो, असे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा