दक्षिण गोव्याचे खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस यांची मागणी
💧 पणजी : राज्यातील धरण व्यवस्थापनातील त्रुटी आणि वाढत्या बांधकाम प्रकल्पांमुळे गोमंतकीयांना आठवड्यातून केवळ चार दिवस पाणी मिळते. राज्यात पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ठोस 'मास्टर प्लॅन' तयार करण्यात यावा, अशी मागणी दक्षिण गोव्याचे खासदार कॅ. विरीयातो फर्नांडिस यांनी केली आहे.
📜 निवेदन सादर
या संदर्भात काँग्रेसच्या शिष्टमंडळासह फर्नांडिस यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंते उत्तम पार्सेकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. या बैठकीत राज्यातील पाणी समस्येवर सविस्तर चर्चा झाली.
❓ नागरिकांना पाणी का मिळत नाही
"मुख्यमंत्री वारंवार 'पाणी भरपूर आहे, भिवपाची गरज ना' असे विधान करतात. पण जर पाणी भरपूर असेल, तर नागरिकांना ते नियमित का मिळत नाही?" असा सवाल खासदार फर्नांडिस यांनी उपस्थित केला. अनेक भागांमध्ये दोन-दोन दिवसांनी पाणीपुरवठा होतो.
⚠️ धरणांकडे लक्ष द्यावे
सरकारने धरणे आणि जलाशयांकडे द्यावे, त्यामुळेच ही स्थिती ओढवली आहे. राज्यात फ्लॅट्स आणि लक्झरी बंगले उभारून प्रत्येक बंगल्यासाठी स्वतंत्र स्विमिंग पूल दिला जातो. सरकार या प्रकल्पांना परवानगी देते मात्र यामुळे मूळ गोमंतकीयांचा पाण्याचा हक्क हिरावला जातोय.
📢 ठाम भूमिका
"केवळ पावसावर अवलंबून राहून ही समस्या सुटणार नाही. त्याएवजी सरकारने धोरणात्मक विचार करून त्वरित उपाययोजना कराव्यात," अशी ठाम भूमिका खासदार फर्नांडिस यांनी मांडली.