पेडणे तालुक्यातील साहित्यिक, पत्रकार, हितचिंतकांचा पुढाकार
साहित्यिक अवधूत कुडतरकर यांचे निवासस्थान. (निवृत्ती शिरोडकर)
पेडणे : उगवे येथील ज्येष्ठ साहित्यिक अवधूत कुडतरकर यांचे जुने घर मोडकळीस आले असून पावसाळ्यापूर्वी त्यांना नवीन घर उभारून देण्यासाठी पेडणे तालुक्यातील साहित्यिक, पत्रकार, हितचिंतक आणि आश्रयदात्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी गोमंतकीय आश्रयदाते त्यांना सढळ हस्ते मदत करणार आहेत.
कुडतरकर यांची आर्थिक स्थिती हलाखीची असल्यामुळे जुने घरही त्यांना दुरुस्ती करता येत नाही. साहित्यसेवा करत असताना अनेक मासिक अंक, कादंबऱ्या, कविता आदी साहित्य प्रकाशित केले आहे. अशा जेष्ठ साहित्यिकाला आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यांचे मोडकळीस आलेले घर दुरुस्त करण्यासाठी त्यांनी अनेक वेळा कैफियत मांडली. त्याच अनुषंगाने मंगळवारी चांदेल-हसापूरचे सरपंच तुळशीदास गावस, उगवेचे माजी सरपंच शशिकांत महाले, पत्रकार निवृत्ती शिरोडकर, महादेव गवंडी, नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर यांची एक महत्त्वाची बैठक कुडतरकर यांच्या निवासस्थानी झाली. पावसाळ्यापूर्वी घर उभारून देण्याची ग्वाही या बैठकीत देण्यात आली. लवकरच घर उभारणीस सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी त्यांच्या घरातील साहित्य आणि त्यांना एक महिना इतरत्र भाडेपट्टीवर राहण्याची सोय उगवेचे माजी सरपंच शशिकांत महाले यांनी पुढाकार घेऊन केली आहे. त्यानंतर नवीन घर कशा पद्धतीने उभारले जाईल, यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. हे घर ५ जूनपूर्वी उभारून पूर्ण करण्याचे ठरविण्यात आले. पावसाळ्यानंतर आतील काम टप्प्याटप्प्याने करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हलाखीत जगत असतानाही...
अवधूत कुडतरकर हे आपल्या पत्नीसोबत आपल्या जुन्या निवासस्थानी हलाखीचे जीवन जगत आहेत. आपली कैफियत ते कोणालाही सांगत नाहीत. परंतु त्यांच्या हितचिंतकांनी पुढाकार घेऊन त्यांना घर उभारून देण्याचा निर्णय घेतला आहे.