सभागृह बंद ठेवण्यामागचे अध्यक्षांनी सांगितले कारण, वाचा...
मडगाव : मडगाव रवींद्र भवनाला इफ्फीचे केंद्र बनवण्यासाठी आता नवी स्क्रीन, प्रोजेक्टर बसवणे व इतर अपग्रेडेशनसंबंधित कामे केली जाणार आहे. यासाठी मुख्य सभागृह जुलै व ऑगस्ट महिन्यात बंद राहील असे अध्यक्ष राजेंद्र तालक यांनी सांगितले. तियात्रिस्त व कलाकारांना विश्वासात घेत ही कामे केली जात असून कुणाचीही तक्रार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मडगाव रवींद्र भवनातील सभागृहांची जी कामे गेली कित्येक वर्षे प्रलंबित होती. त्याकडे आता लक्ष देण्यात येत आहे. रवींद्र भवनातील कार्यक्रमांना अडचणी निर्माण होणार नाही याची काळजी घेत देखभालीचे काम केले जात आहे. मुख्य सभागृहाच्या छपराचे कामही सध्या हाती घेण्यात आले असून त्यामुळे पाण्याची गळती पूर्णपणे बंद होईल. रवींद्र भवनच्या इमारतीच्या संलग्न एनएक्स इमारतीच्या कामाला पुन्हा सुरुवात झाली आहे.
डिझाईन व इतर कामे प्रगतीपथावर असून पुढील सहा महिन्यात ती कार्यान्वित होईल. ब्लॅक बॉक्समधील देखभालीची कामेही हाती घेतली आहेत. त्यामुळे या मान्सूनमध्ये रवींद्र भवनातील गळतीचा प्रश्न निर्माण होणार नाही, अशी माहिती तालक यांनी सांगितले.
रवींद्र भवनाच्या मुख्य सभागृहातील नूतनीकरणाचे काम होणार आहे. यापूर्वी मुख्य सभागृहात फिल्म स्क्रिनिंग व्हायचे. पण कालांतराने नवी तंत्रज्ञानानुसार स्क्रीन, साउंड टेक्नोलॉजी बसवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
या कामांना १५ जूनपासून सुरुवात केली जाणार होती. पण तियात्रिस्तांच्या विनंतीनुसार १ जुलैपासून ऑगस्ट महिनाअखेरपर्यंत नूतनीकरणाची कामे केली जातील. यासाठी मुख्य सभागृह बंद ठेवण्यात येणार आहे.
तियात्रिस्तांची बैठक घेत नूतनीकरणाच्या कामांचे नियोजन केले आहे. त्यामुळे कुणाकडून नूतनीकरणाच्या व अपग्रेडेशनच्या कामांना विरोध दर्शवण्यात आलेला नाही. नूतनीकरणांच्या कामानंतर मडगाव रवींद्र भवन हे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे हे स्थळ बनणार असल्याचे तालक यांनी सांगितले.