गेल्या दोन वर्षांतील सर्वात मोठे नोकर कपातीचे सत्र
वॉशिंग्टन : मायक्रोसॉफ्टने सुमारे ६,००० कर्मचाऱ्यांना, म्हणजेच त्यांच्या एकूण जागतिक कर्मचाऱ्यांच्या जवळपास ३ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. गेल्या दोन वर्षांतील हे सर्वात मोठे नोकर कपातीचे सत्र मानले गेेले आहे.
कंपनीने या आर्थिक वर्षात एआय इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेटा सेंटर्समध्ये ८० अब्ज डॉलर्सची मोठी गुंतवणूक सुरू ठेवल्याने ही कपात करण्यात आली आहे.
मायक्रोसॉफ्ट कंपनीने दुसरी मोठी नोकर कपात जाहीर केली आहे. जागतिक स्तरावरील कर्मचाऱ्यांपैकी ३ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाईल. याचा परिणाम सर्व स्तरावरील टीममधील हजारो कर्मचाऱ्यांवर जाणवेल. या नोकर कपातीच्या या फेरीत सुमारे ६ हजार कर्मचारी असतील, असे मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे.
मायक्रोसॉफ्टमध्ये एकूण २ लाख २८ हजार कर्मचारी काम करतात. दरम्यान, व्यवस्थापन स्तर कमी करणे आणि कामकाज सुलभ करण्याच्या उद्देशाने ही नोकरकपात केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.
मायक्रोसॉफ्टचा 'एआय' वर अधिक भर-
बिझनेस इनसाइडरने याआधी दिलेल्या वृत्तानुसार, मायक्रोसॉफ्ट कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित यंत्रणेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असून त्यांचा अभियांत्रिकी प्रतिभेला प्राधान्य देण्याचे उद्देश आहे. बिझनेस इनसाइडरने दिलेल्या वृत्तानुसार, कामावरून कमी करण्यात आलेले कर्मचारी ६० दिवसांपर्यंत पेरोलवर राहतील. त्याव्यतिरिक्त त्यांना रिवॉर्ड्स आणि बोनसचा लाभ मिळेल. मायक्रोसॉफ्टच्या परफॉर्मन्स मॅनेजमेंट सिस्टीममध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण बदलांच्या पार्श्वभूमीवर ही नोकर कपात करण्यात आली आहे. दरम्यान, कंपनीने कामगिरीच्या आधारावर काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांसाठी दोन वर्षांची पुनर्भरती बंदी लागू केली आहे.
कंपनीच्या निर्णयाचा परिणाम-
कंपनीच्या निर्णयाचा सर्वात लक्षणीय परिणाम वॉशिंग्टनमध्ये झाला. वॉशिंग्टनमधील मायक्रोसॉफ्टच्या रेडमंड मुख्यालयाजवळील १,९८५ नोकरदारांना काढून टाकण्यात आले. टाळेबंदीचा परिणाम सॉफ्टवेअर अभियांत्रिकी, उत्पादन व्यवस्थापन, एक्सबॉक्स, लिंक्डइन आणि इतर संघांवर झाला.