
अहमदाबाद : पाळीव कुत्र्यांच्या हल्ल्यात लोकांना प्राण गमवावे लागल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून अशाच प्रकारची एक घटना गुजरातच्या अहमदाबाद शहरातून समोर आली आहे. शहरातील हातीजण परिसरातील एका रेसिडेन्शल सोसायटीत चार महिन्यांच्या बाळावर एका पाळीव रॉटविलर कुत्र्याने हल्ला केला असून या हल्ल्यात त्या बाळाचा मृत्यू झाला आहे. या प्रकारानंतर कुत्र्याच्या मालकिणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी बाळाची मावशी तिला सोसायटीच्या आवारात फिरण्यासाठी घेऊन आली होती. त्याचवेळी सोसायटीतील एका महिलेने तिचा रॉटविलर जातीचा पाळीव कुत्रा फिरवायला खाली आणला होता. ती फोनवर बोलत असताना अचानक कुत्रा तिच्या हातातून सुटला आणि त्याने बाळावर आणि त्याच्या मावशीवर हल्ला चढवला.
जवळच उभ्या असलेल्या आणखी एका महिलेने मुलाला वाचवण्यासाठी धाव घेत ताबडतोब बाळाला कुत्र्याच्या तावडीतून सोडवले. त्यानंतर बाळाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र बाळाच्या मानेवर आणि डोक्यावर खोल जखमा झाल्यामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच अहमदाबाद ग्रामीणच्या विवेकानंदनगर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. सदर हल्ल्याची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.
सरकारच्या आदेशाला केराची टोपलीसुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर, पिटबुल टेरिअर, अमेरिकन बुलडॉग, रॉटविलर यांसारख्या श्वानांच्या २३ हिंस्र जातींची विक्री आणि पैदास करण्यावर बंदी घालण्याचे आदेश केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिले आहेत. असे असूनही या कुत्र्यांना बहुतांश घरात पाळले जात असल्याचे दिसून येतेय.