कावेरी नदीत आढळला मृतदेह
बंगळुरू: कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेचे माजी महासंचालक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते सुब्बन्ना अय्यप्पन यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह श्रीरंगपट्टणजवळील कावेरी नदीत तरंगताना आढळून आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ते नियमितपणे श्रीरंगपट्टणाजवळील कावेरी नदीच्या काठावर असलेल्या साई बाबा आश्रमात ध्यानासाठी जात असत. घटनास्थळी त्यांची दुचाकी आढळली असून, त्यांनी नदीत उडी घेतली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
७ मे पासून होते बेपत्ता -
अय्यप्पन हे म्हैसूरचे रहिवासी होते. त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी आणि दोन मुली आहेत. अयप्पन ७ मे पासून बेपत्ता होते. ८ मे रोजी म्हैसूरच्या विद्यारण्यपुरम पोलीस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
२०२२ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित -
भारताच्या 'ब्लू रेव्होल्यूशन'मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अयप्पन यांना २०२२ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दरम्यान, आयसीएआरचे माजी सदस्य वेणुगोपाल बदरवाडा यांनी पद्मश्री पुरस्कार विजेते सुब्बन्ना अयप्पन यांच्या "अकाली आणि गूढ" मृत्यूची न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.