कार्यक्रमाहून परतताना अपघात; मृतदेहांचा चेंदामेंदा
रायपूर : छत्तीसगडच्या रायपूरमध्ये ट्रक-ट्रेलरमध्ये भीषण अपघात होऊन १३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्काकदायक घटना समोर आली आहे. रविवारी रात्री उशीरा हा अपघात घडला असून अपघातामुळे परिसरात प्रचंड गोंधळाचे वातावरण आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, चौथिया छठी कार्यक्रम संपवून बन्सरी गावातील एक कुटुंब ट्रकने माघारी परतत होते. दरम्यान, रायपूर-बालोदाबाजार रोडवर रायपूरहून चटोदच्या दिशेने निघालेल्या ट्रेलरची ट्रकला धडक बसली. हा अपघात इतका भयंकर होता की, रस्त्यावर मृतदेहांचा अक्षरशः खच पडला होता. अपघातानंतर प्रशासनाच्या पथकाने क्रेनच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले असून जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातात साधारण १३ जण जखमी झाले असून यामध्ये एका सहा महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. पोलिसांनी अपघातानंतर पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतले असून याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
अधिकाऱ्यांनी अपघाताची चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक निष्कर्षांवरून असे दिसून येते की जास्त वेग आणि चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला असावा. या दुःखद घटनेने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षा कायद्यांची कडक अंमलबजावणी करण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.