सातपैकी चार मते घेत कामुर्ली सरपंचपदी एल्विस अँथनी डायस विराजमान

तीन उमेदवारांनी भरलेले अर्ज

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
सातपैकी चार मते घेत कामुर्ली सरपंचपदी एल्विस अँथनी डायस विराजमान

मडगाव : कामुर्ली सरपंचपदासाठी सोमवारी निवडणूक झाली. यात तिघांनी उमेदवारी अर्ज सादर केले होते. सातपैकी चार मते घेत एल्विस अँथनी डायस हे सरपंचपदी विराजमान झाले. पंचायतीची जी कामे प्रलंबित आहेत, ती पूर्ण करण्यावर लक्ष दिला जाईल, असे डायस यांनी याप्रसंगी सांगितले.

कामुर्ली सरपंचपदाचा बासिलो फर्नांडिस यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. सरपंचपदासाठी सोमवारी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. सोमवारी सकाळी कामुर्ली पंचायतीच्या सात पंच सदस्यांपैकी तिघांना सरपंचपदासाठी निवडणूक अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे सादर केले होते. मतदार प्रक्रियेनंतर सर्वाधिक चार मते एल्विस अँथनी डायस यांना मिळाली.

माजी सरपंच बासिलो फर्नांडिस यांना दोन मते मिळाली तर अँथनी फर्नांडिस यांनी एक मत मिळाले. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडून सरपंचपदी एल्विस डायस यांची निवड जाहीर करत त्यांना प्रमाणपत्र दिले.

पंचायतीकडून जी कामे सध्या केली जात आहेत, ती पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न केले जातील. याशिवाय पंच सदस्यांशी चर्चा करुन व त्यांना विश्वासात घेत यापुढील विकासकामे केली जातील, असे नवनिर्वाचित सरपंच डायस यांनी सांगितले.

माजी सरपंच बासिलो फर्नांडिस यांनी नवनिर्वाचित सरपंच एल्विस डायस यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांना सहकार्य आणि पाठिंबा असेल, असे जाहीर केले.

हेही वाचा