महिलांच्या सुरक्षेबाबत राजधानी पणजी एक पाऊल पुढे!

महानगरपालिकेने सुरू केलीय 'ही' विशेष मोहीम...

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12th May, 04:18 pm
महिलांच्या सुरक्षेबाबत राजधानी पणजी एक पाऊल पुढे!

पणजी : पणजी महागरपलिका, गोवा पोलीस आणि स्कॅन गोवातर्फे महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. यानुसार पणजी शहरातील बसमध्ये नियमित तपासणी केली जाणार आहे. यासाठी साध्या वेशातील पोलीस अधिकारी बसमध्ये प्रवास करणार आहेत. याशिवाय या विषयाच्या जागृतीसाठी संपूर्ण शहरात, स्थानिक बसवर  होर्डिंग्ज आणि स्टिकर्स लावले जाणार आहेत. 

महानगरपालिकेतर्फे "सेफ्टी फर्स्ट: एमपावरिंग विमेन अँड प्रोटेक्शनिंग चिल्ड्रन" ही मोहीम आजपासून सुरू करण्यात आली आहे. हा उपक्रम सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी लोकांना शिक्षित करणे, सक्षम करण्यासाठी राबवण्यात येत आहे. 

शहरात लावण्यात येणाऱ्या  होर्डिंग्ज आणि स्टिकर्समुळे नागरिकांना सुरक्षितता संसाधनांबद्दल महत्त्वाची माहिती मिळणार आहे. सार्वजनिक ठिकाणी महिला आणि लहान मुलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हा उपक्रम तयार करण्यात आला आहे.

विविध वयोगटातील लोकांना आकर्षित करण्यासाठी उपक्रमात आकर्षक डिझाइन आणि संदेश वापरले जातील. रहदारी जास्त असलेल्या ठिकाणी होर्डिंग्ज लावण्यात येतील. तर सामुदायिक केंद्रे, शाळा आणि स्थानिक व्यवसायांमध्ये स्टिकर्स वाटले जातील. यामध्ये आवश्यक सुरक्षा सूचना, स्थानिक समर्थन सेवांसाठी संपर्क तपशील आणि आगामी सामुदायिक सुरक्षा मेळाव्याबद्दल माहिती असेल.

पहिला टप्पा सुरू
या उपक्रमाचा पहिल्या टप्प्यात पणजी बसस्थानक, मिरामार, बाजारपेठ, बांदोडकर रस्ता आणि १८ जून रस्त्यावर भीक मागणाऱ्या विरोधी कायद्याची माहिती देणारे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. २६ एप्रिल रोजी पणजीमध्ये ७ मुले आणि ५ महिलांना भीक मागण्यापासून वाचवण्यात आले. 

प्रत्येक महिला आणि बालकाला भीतीशिवाय जगण्याचा अधिकार असल्याची आमची धारणा असल्यानेच हा उप्रकम सुरू करण्यात आल्याचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी सांगितले.

हेही वाचा