मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नव्या प्रशिक्षण व्यवस्थापन प्रणालीचा शुभारंभ
पणजी : 'जिपार्ड'तर्फे विविध खात्यातील अधिकाऱ्यांना आता प्रशासकीय तसेच अन्य प्रशिक्षण डिजिटल माध्यमातून दिले जाणार असून यासाठीच्या नव्या प्रशिक्षण व्यवस्थापन प्रणालीचा (टीएमएस) शुभारंभ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सोमवारी झाला.
'इगोट मिशन कर्मयोगी पोर्टल'ची माहिती देणारी कार्यशाळाही यावेळी आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी मुख्य सचिव डॉ. वी. कांडावेलू तसेच इतर सरकारी अधिकारी उपस्थित होते. प्रशिक्षण डिजीटल स्वरूपात कशाप्रकारे देणे शक्य आहे, याबाबत या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.
मार्गदर्शनासाठी दिल्लीहून 'इगोट'चे पथक आले होते. यापुढे प्रशिक्षणासाठी 'जिपार्ड' हीच प्रमुख संस्था राहणार असून सर्व अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना 'इगोट'च्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. विकसित गोवा, विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.