उपसरपंच पंचसदस्यांना सहकार्य करत नसल्याचा पंचांचा दावा
मडगाव : राय पंचायतीमध्ये अंतर्गत राजकारणामुळे आरोप प्रत्यारोपाचे प्रकार याआधी झाले होते. आता पुन्हा राय पंचायत अविश्वास ठरावामुळे चर्चेत आली आहे. पंचायतीच्या सहा पंच सदस्यांनी उपसरपंच गॉडफ्री ओसवर्ड सुझा यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला आहे. सोमवारी सकाळी बीडिओंकडे यासंदर्भात ठराव सादर करण्यात आला.
काही दिवसांपूर्वी राय पंचायतीच्या सरपंचांनी विकासकामांबद्दल सचिवांवर केलेले आरोप सचिवांनी फेटाळले होते. त्यानंतर काही पंचांनीही पत्रकार परिषद घेत, 'राय पंचायतीतील सत्ताधार्यांकडून चुकीच्या कागदपत्रांच्या सहाय्याने कामे देण्यात आली असून ऑडिटसह विकासकामांना निधी मिळताना अडचणी निर्माण होणार आहे', असे सांगितले होते.
आता पुन्हा एकदा राय उपसरपंच गॉडफ्री ओसवर्ड सुझा यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आल्याने राय पंचायत चर्चेत आली आहे. आंतानिओ झेविअर फर्नांडिस, मान्यूएल रॉड्रिग्ज, पीटर क्वाद्रोस, जुडास क्वाद्रोस, मिंगुलिना डिसोझा, क्विनी डिकॉस्टा या सहा पंच सदस्यांच्या सह्यानिशी पत्र गटविकास अधिकार्यांना सादर करण्यात आले आहे. यात उपसरपंच पंचसदस्यांना सहकार्य करत नाहीत, निर्णय घेताना पंचांना विश्वासात घेत नाहीत, असा दावा करण्यात आला आहे.