पर्वरीतील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू
🚨 पणजी : सांकवाळ येथील शांतादुर्गा मंदिराजवळ रविवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण रस्ते अपघातात पर्वरीतील ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मृताची ओळख अवधूत पांडुरंग जाधव (मूळ कोल्हापूर) अशी झाली आहे.
🚗 जाधव हे स्वतःच्या स्कोडा रॅपिड कारमधून वास्कोहून पर्वरीच्या दिशेने जात असताना, गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली.
🏥 अपघातानंतर तातडीने १०८ रुग्णवाहिकेद्वारे त्यांना मडगावच्या दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांनी प्राण सोडले. रुग्णालयातून माहिती मिळताच वेर्णा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी सुरू केली.
👮 पोलीस चौकशीत जाधव यांच्या पत्नीने अपघाताच्या घटनेची माहिती दिली आहे. सध्या मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन कक्षात ठेवण्यात आला आहे. वेर्णा पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ अंतर्गत अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.
🕵️ दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक टिकम सिंह वर्मा, मुरगावचे उपअधीक्षक गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच, पोलीस निरीक्षक आनंद शिरोडकर यांच्या नेतृत्त्वाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक प्रमिला फर्नांडिस पुढील तपास करत आहेत.