करबुडवेगिरी करणाऱ्या रेकॅटचा झाला पर्दाफाश! गोवा उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
पणजी : गोव्यात बाहेरील राज्यातून अवैध मार्गाने मद्याची वाहतुक करून करबुडवेगिरी करणाऱ्या रेकॅटचा पर्दाफाश गोवा उत्पादन शुल्क विभागाने केला आहे. ही कारवाई राज्याच्या सीमेवरील पेडणे तालुक्यातील पत्रादेवी चेकपोस्टवर करण्यात आली. हरियाणामधील एका मद्य वितरक कंपनीने उच्च दर्जाचा मद्यसाठा ‘कस्टम्स’साठी असल्याचे भासवत गोव्यात अवैधरीत्या पाठवण्याचा प्रयत्न केला होता.
हाती आलेल्या माहितीनुसार, हरियाणात नोंदणीकृत ट्रकमधून चिव्हास रीगल, अब्सोल्यूट व्होडका, जॉनी वॉकर, ब्लॅक लेबल यांसारख्या उच्च ब्रँडच्या मद्याच्या बाटल्या सापडल्या. या मद्यसाठ्याची किंमत सुमारे ७५ लाख रुपये आहे. मात्र, या मद्य साठ्याची वाहतूक करण्यासाठी वाहकाकडे परवानगी नव्हती, मद्याच्या बाटल्यांवर लेबलही नव्हते, तसेच कस्टम क्लीयरन्स देखील नव्हता.
या प्रकरणात ट्रकचालकाला अटक करून त्यांची चौकशी करण्यात आली. त्याने सुरुवातीला ही कस्टम्स विभागासाठी असलेली मालवाहतूक असल्याचे सांगितले. मात्र, ट्रकमधील बाटल्या ७५० मिलीच्या होत्या, ज्या केवळ किरकोळ विक्रीसाठी वापरल्या जातात. अधिकाऱ्यांनी अधिक खोलवर चौकशी केली असता चालकाच्या दाव्यातील अनेक विसंगती उघड झाल्या.
नंतर जिथे हा मद्यसाठा नेण्यात येणार होता त्या आल्त पिळर्ण येथे असलेल्या एका गोदामावर अधिकाऱ्यांनी धाड टाकली. गोव्यात अशा प्रकारची ही पहिलीच वाहतूक होती, असे तपासातून असे स्पष्ट झाले. आता या हरियाणास्थित कंपनीचे गोव्यातील घाऊक व्यवसायाचे परवाने रद्द होण्याची शक्यता आहे.
संबंधित कंपनीकडून अशाच स्वरूपाचे आणखी नेटवर्क राज्यभरात सक्रिय असण्याची शक्यता असून, त्याचा तपास सुरू आहे. पकडलेला ट्रक चालकाला तात्पुरत्या जामिनावर सोडण्यात आले असले तरी, सदर मद्याचा दर्जा व प्रकरणाची पाळेमुळे तपासण्यात येत आहे. गोव्यात यापूर्वी अशा प्रकारे 'कस्टम्स'च्या नावाखाली अवैध मद्यसाठा आणण्याचा प्रकार झाल्याचे निदर्शनास आलेले नव्हते. त्यामुळे ही कारवाई उत्पादन शुल्क विभागासाठी मोठे यश मानली जात आहे.