युद्धजन्य स्थिती, बस कंडक्टर ठार, बुडून मृत्यूच्या घटनांनी मन हेलावणारा आठवडा
पणजी : भारत पाकिस्तान यामध्ये निर्माण झालेली युद्धजन्य स्थिती, यामुळे राज्यात सरकारकडून जारी केलेले निर्देश, शिरगावातील लईराई जत्रोत्सवावेळी झालेल्या चेंगराचेंगरीनंतर देवस्थान कायदा दुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव तसेच ताळगाव येथे लागलेली आग, बस उलटून कंडक्टर ठार, बुडून मृत्यू होण्याच्या घटनांमुळे हा आठवडा काहीसा मन हेलावून टाकणारा होता.
रविवार
चेंगराचेंगरीनंतर देवस्थान कायदा दुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव!
गोवा सरकारने विचाराधीन घेतलेली देवस्थान कायदा दुरुस्ती अंमलात आली असती, तर गोव्यातील मोठ्या देवस्थानांच्या व्यवस्थापनात सरकारी अधिकाऱ्यांची भर पडली असती. देवस्थानांच्या व्यवहारांवर लक्ष ठेवणे सरकारला अधिक सोपे झाले असते. पण ही कायदा दुरुस्ती बारगळली. आता शिरगावातील जत्रोत्सवावेळी झालेल्या चेंगराचेंगरीनंतर ही कायदा दुरुस्ती सरकारने पुन्हा विचारात घेण्याचा विचार चालवला आहे.
महिलेचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दोषी
म्हापसा पोलीस स्थानकात २०११ मध्ये पीडित महिलेचा लैंगिक छळ करण्यात आला होता. याप्रकरणी म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने पोलीस कॉन्स्टेबल विश्वविजय परब याच्या विरोधात सबळ पुरावे असल्यामुळे त्याला दोषी ठरविले आहे.
कौलोत्सवाच्या शेवटच्या दिवशी भाविकांना प्रवेश बंद
शिरगाव जत्रेत सहा भाविकांचे प्राण गमावल्याने देवस्थान समितीला मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर, देवस्थान समितीने कौलोत्सवाच्या शेवटच्या दिवशी, ६ मे रोजी भाविकांना शिरगावात प्रवेश पूर्णपणे बंद केला.
सोमवार
एफडीएचा अन्न सुरक्षा अधिकारी निलंबित
अन्न आणि औषध प्रशासनातील (एफडीए) अन्न सुरक्षा अधिकारी विश्वासराव राणे यांच्या निलंबनाचा आदेश जारी झाला आहे. अन्न आणि औषधे प्रशासन संचालक श्वेता देसाई यांनी हा आदेश जारी केला. शिस्तभंगाच्या चौकशीसाठी निलंबनाचा आदेश जारी झाला.
ताळगाव येथे शेतजमिनीत आग
ताळगाव येथील शेतामध्ये अचानक लागलेल्या आगीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. धुराचे प्रचंड लोट परिसरात पसरले आणि शेजारील घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. ३० जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. सुमारे पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग नियंत्रणात आणण्यात आली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही.
मंगळवार
सातोण दाबाळ येथील महिलेची मगरीच्या जबड्यातून सुटका
सातोण दाबाळ येथे नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेला दोन मगरींकडून जबड्यात पकडण्याचा प्रकार मंगळवारी सकाळी घडला. वेळीच त्या ठिकाणी महिलेचा दीर व भावजय पोहोचल्याने तिची मगरीच्या जबड्यातून सुटका झाली. अन्यथा तिच्या प्राणावर बेतले असते.
हणजूण-आसगाववासीयांची पाणीपुरवठा कार्यालयावर धडक
हणजूण व आसगावमध्ये होणाऱ्या अनियमित पाणी पुरवठ्यावरून रहिवाशांनी पेयजल पुरवठा खात्याच्या म्हापसा कार्यालयावर मोर्चा काढला. गेल्या दोन महिन्यांपासून गावात नियमित पाणी पुरवठा झालेला नाही. ही समस्या सोडवण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यासाठी खाते अपयशी ठरल्याचा आरोप मोर्चेकरांनी केला.
बुधवार
पाकिस्तानमध्ये ९ दहशतवादी तळ उद् ध्वस्त
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) नऊ दहशतवादी अड्ड्यांवर बुधवारी रात्री हवाई हल्ले केले. यामध्ये बहावलपूर, मुरीदके, बाग, कोटली, मुझफ्फराबाद या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे. या कारवाईत २४ क्षेपणास्त्रे डागण्यात आली. यात १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. पहलगाम हल्याच्या १५ दिवसांनंतर तिन्ही सैन्याने पाकिस्तानला योग्य उत्तर देण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले.
राज्य सहकारी बँकेवर तीन सदस्यीय प्रशासक समिती
गोवा राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्यानंतर निवडणूक घेण्यात आली नाही. त्यामुळे बँकेवर तीन सदस्यीय प्रशासक समितीची नियुक्ती केली आहे. चार्टर्ड अकाऊंटंट संतोष केंकरे समितीचे अध्यक्ष असणार आहेत. तर, चार्टर्ड अकाऊंटंट लक्ष्मीकांत नाईक आणि गोवा नागरी सेवेचे अधिकारी विशांत गावणेकर यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. याबाबतचा आदेश सहकार निबंधक कबीर शिरगांवकर यांनी जारी केला आहे.
गुरुवार
भारताचे पाकिस्तानला लाहोरमध्ये जोरदार प्रत्युत्तर
जम्मू आणि काश्मीरसह राजस्थान आणि पंजाबच्या अनेक भागांना लक्ष्य करत पाकिस्तानने एकाच वेळी ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. मात्र, भारतीय संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानचा हा डाव पूर्णपणे उधळून लावला. यानंतर भारतानेही तातडीने प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या लाहोर शहरात मोठी कारवाई केली.
क्विनीनगर-सांकवाळ येथे बस उलटून कंडक्टर ठार
बिर्ला चौकातून वास्कोकडे येणारी मिनी बस क्विनीनगर-सांकवाळ महामार्गावर सायंकाळी पाचच्या दरम्यान उलटल्याने कंडक्टर शिवराज बसवराज मदार (२३, रा. बिर्ला) जागीच ठार झाला. या बसमधील सुमारे २८ पेक्षा अधिक प्रवाशी जखमी झाले.
आंगडी लोटली येथे दुचाकीच्या धडकेत जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
मायना कुडतरी परिसरातील आंगडी लोटली येथे इलेक्ट्रिक दुचाकीच्या धडकेत जखमी सांताना फर्नांडिस हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी चालक रोहित नाईक (लोटली) याच्यावर मायना कुडतरी पोलिसांकडून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आंगडी लोटली येथे ७ मे रोजी ११ वाजता अपघात घडला होता.
श्रवण बर्वे खून प्रकरणातील संशयिताला न्यायालयीन कोठडी
नगरगाव सत्तरी येथील श्रवण बर्वे याच्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पिता देविदास बर्वे, भाऊ उदय बर्वे व स्थानिक नागरिक वासुदेव ओझरेकर यांच्या न्यायालयीन कोठडीत वाळपई प्रथम न्यायदंडाधिकार्यांनी वाढ केली आहे. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.
शुक्रवार
कांदोळीत शॉर्टसर्किटमुळे दुकान भस्मसात
सेबेस्तियनवाडा कांदोळी येथील पॅरी जनरल स्टोअर शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत आणि दोन गॅस सिलींडरच्या स्फोटामुळे जळून भस्मसात झाले. या दुर्घटनेत दुकान मालक वृद्ध दाम्पत्य किरकोळ जखमी झाले असून आगीत अंदाजे ५ लाखांपेक्षा जास्त रुपयांच्या मालमत्तेची हानी झाली आहे.
कंपनीला ५० लाखांचा गंडाप्रकरणी ठाण्यातील व्यावसायिकाला अटक
मुरगाव तालुक्यातील एका कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक असल्याचे भासवून अज्ञात व्यक्तीने संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपये साना एंटरप्रायझेस या कंपनीच्या खात्यात जमा करून गंडा घातला. या प्रकरणी गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हा विभागाने मोहम्मद रझाक मुल्ला (२८, ठाणे) या व्यावसायिकाला अटक केली.
शनिवार
नायजेरियन विद्यार्थ्याकडून १.६५ कोटींचे ड्रग्ज जप्त!
आराडी पर्रा येथे गुन्हा शाखेने टाकलेल्या छाप्यात २३ वर्षीय नायजेरियन विद्यार्थ्याकडून १.६५ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. याबाबत तेलंगणा नार्कोटिक्स ब्युरोकडून गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेला माहिती देण्यात आली होती. पथकाने आराडी पर्रा येथे सापळा रचत नानिएलुगो अबासिनी या नायजेरियन विद्यार्थ्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून विविध प्रकारचे मिळून १.६५ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे.
चिरेखाणीत रसायनांनी भरलेल्या बॅरलचा स्फोट
सावर्डेतील चांदीमळ-कष्टी येथील एका बंद पडलेल्या चिरेखाणीत रसायनांनी भरलेल्या बॅरलचा स्फोट होऊन मोठी आग लागली. ही चिरेखाण पूर्वीपासून रुग्णालयांतील बायोमेडिकल वेस्ट आणि इतर ठिकाणचा रासायनिक कचरा टाकण्यासाठी वापरली जात होती.
लक्षवेधी
पेडामळ-शिरवई, कुडचडे येथील कालव्यात बुडून ९ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. सेहर शेख असे चिमुकलीचे नाव आहे. दुसऱ्या घटनेत आगोंद येथे हॉटेलच्या स्वीमिंगपूलमध्ये बुडून तीन वर्षीय बालिकेने जीव गमावला.
म्हापसा येथील नवीन आंतरराज्य कदंब बस स्थानकावर म्हापसा पोलिसांनी छापा टाकून १८ लाख रूपये किंमतीचा १८० ग्रॅम हायड्रोपॉनिक वीड हा उच्च दर्जाचा गांजा जप्त केला. या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी संशयित आरोपी लिओनार्ड जोजफ देवा (२२, रा. आराडी गिरी व मूळ आंध्र प्रदेश) याला अटक केली.
कुटबण जेटीवर काम करणाऱ्या कामगाराचा उपचाराआधीच अतिसारामुळे मृत्यू झाला. याप्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली असून मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उत्तरीय तपासणीसाठी ठेवण्यात आला आहे.
भारत-पाकिस्तानात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू, पोलीस उपमहानिरीक्षक अजय कृष्णन यांच्यासह इतर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत, राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. दुसरीकडे, सरकारने अशा स्थितीत 'नागरी संरक्षक' म्हणून दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक करीत, सरकारने त्यांच्यासाठी नियमावलीही जारी केली आहे.