गर्दीचा सोस टाळणेच योग्य!

गोव्यातील अनेक गावांत होणारे उत्सव अशी लाखांची गर्दी सहजपणे खेचतात. ही गर्दी नियंत्रित करताना देवस्थान समिती आणि प्रशासनाच्या नाकीनऊ येतात. त्यातून काही ठिकाणी चोऱ्यामाऱ्या, विनयभंग, बाचाबाची, क्वचित हातघाईसुद्धा होते. पण यातून कोणीही बोध घेताना दिसत नाही. या गर्दीमागे अर्थकारण असल्यामुळे तशा फंदात कोणी पडत नाही. मात्र या अर्थकारणापोटी अनर्थ घडवायचे का, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

Story: वर्तमान |
6 hours ago
गर्दीचा सोस टाळणेच योग्य!

दरवर्षी वैशाख शुक्ल एकादशीला लाखो भाविक शुचिर्भूत होऊन घरापासून दूर वस्ती करतात. पुढचे पाच दिवस शुचिर्भूत राहून शिरगावच्या श्री लईराई देवीच्या जत्रेची वाट बघतात. या पाच दिवसांत ब्रह्मचर्य, शाकाहार, सात्विक संभाषणाचा अवलंब केला जातो. या ‘धोंड’ म्हटल्या जाणाऱ्या भाविकांना अन्य काेणालाही स्पर्श केल्यास आंघोळ करावी लागते. त्यामुळे या पाच दिवसांसाठी हे भाविक घरापासून दूर गावातील मंदिरात किंवा एखाद्या सार्वजनिक जागी गटागटाने वस्ती करतात. पाच दिवस देवीच्या नामस्मरणातून आपली आध्यात्मिक बैठक आणखी दृढ करतात. जसजसे दिवस सरतात, तसतशी या भाविकांना श्री लईराई देवीच्या भेटीची आस लागते. पंचमीच्या दिवशी देवीच्या मंदिरात जाऊन देवीला आवडणारे मोगरीचे कळे, ओटी अर्पण केली की वार्षिक सेवा केल्याचे अलौकिक समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दाटते. पाच​ दिवसांच्या गणपतीप्रमाणेच श्री लईराई देवीचे पाच दिवसांचे हे व्रत भाविक पाच दिवस प्राणपणाने ज​पतात. उत्सवाच्या दिवशी रात्री हजारो धोंड एकाच वेळी शिरगावात जमतात. या ठिकाणी होमकुंड, तळीतील स्नान, ‘मुड्डेर’ येथील देवीच्या मूळ स्था​नी दिला जाणारा कौल अशा गोष्टींना धोंडांच्या लेखी फार महत्त्व आहे. त्यातूनच ‘मी पहिला’ या चुरशीच्या भावनेतून धोंडांच्या गर्दीचा लाेंढा झेपावतो, त्यात अन्य भाविकांची भर पडते आणि तळीवर स्नान करण्याच्या आणि होमकुंडाकडे ​जाण्याच्या घाईपोटी धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरीसदृश स्थिती निर्माण होते. शिरगावची हल्लीची दुर्घटना अशाच घाईगडबडीतून आणि एकूणच बेपर्वाईतून घडली.

उत्सवांना अशी गर्दी होणे साहजिकच आहे. त्या गर्दीतून पुढे सरकून देवाचे दर्शन घेण्यावाचून तरणोपाय नसतो. देवस्थान समित्या आपल्यापरीने उपाययोजना करतात. पण बहुतेक ठिकाणी त्या पुरेशा नसल्याचे दिसून येते. आपल्या समाजमानसाला गर्दीचा भयंकर सोस. मी गर्दीत अमूक तास उभा राहून देवाचे दर्शन घेतले, असे भाबडेपणाने सांगणारे अनेक जण मिळतात. किंबहुना गर्दीत जाऊन देवदर्शन घेतले नसल्यास ते लाभत नसल्याचाच आविर्भाव अशांच्या वर्तनातून व्यक्त होत असताे. हा धार्मिक भावनेचा भाग असला तरी त्याला किती कवटाळून बसावे, याचा विचार करण्याची​ वेळ आली आहे. गोव्यातील अनेक गावांत होणारे उत्सव अशी लाखांची गर्दी सहजपणे खेचतात. ही गर्दी नियंत्रित करताना देवस्थान समिती आणि प्रशासनाच्या नाकीनऊ येतात. त्यातून काही ठिकाणी चोऱ्यामाऱ्या, विनयभंग, बाचाबाची, क्वचित हातघाईसुद्धा होते. पण यातून कोणीही बोध घेताना दिसत नाही. या गर्दीमागे अर्थकारण असल्यामुळे तशा फंदात कोणी पडत नाही. मात्र या अर्थकारणापोटी अनर्थ घडवायचे का, याचा विचार करण्याची वेळ शिरगावच्या घटनेनंतर आली आहे.

पहिला दिवस हा खास धाेंड भाविकांचा हक्काचा दिवस. पाच दिवस ज्या निष्ठेने पावित्र्याचे पालन करून, प्रापंचिक सुखांचा त्याग करून ते देवीची उपासना करतात, ते पाहिले तर जत्रेच्या दिवशीचा त्यांचा उताविळपणा अमान्य करता येणार नाही. देवीच्या कळसाचे दर्शन घेऊन इतर धार्मिक उपचार पार पाडून पुन्हा घर गाठण्याची त्यांची धडपड अन्य भाविकांनी लक्षात घ्यायला हवी. अक्षरश: हजारो धोंड वेतकाठ्या आणि त्याला लावलेले रंगित गोंडे नाचवत, गळ्यात मोगरीच्या कळ्यांचे, अबोलीचे हार घालून, सोवळी नेसून उत्साहाने, भक्तिभावनेने देवीच्या चरणी लीन होण्यासाठी येतात. हे धोंड केवळ गोव्यातील असतात असे नाही. जवळच्या सिंधुदुर्ग, कारवारमध्येही हजारो धोंड आहेत. तेही​ शिरगावात जत्रेला येतात. या गर्दीत अन्य भाविकांची भर पडल्यामुळेच स्थिती हाताबाहेर जाते. त्यामुळे किमान पहिला दिवस अशा धोंड भाविकांसाठी राखीव असायला हवा, हा आग्रह आता सर्वांनी धरून पुढच्या काळात नियोजन करायला हवे. पाच दिवसांच्या या उत्सवातील एक दिवस खास धोंडांकरिता दिला, तर चार दिवस उरतात. त्या चार दिवसांत देवीच्या अवसाराकडून मिळणारा ‘कौल’ घेण्यासाठी उडणारी झुंबड दरवर्षी बघायला मिळते. यावर्षी पहिल्या दिवशी चेंगराचेंगरी होऊन सहा जणांनी जीव गमावल्यानंतरही कौलासाठी पुन्हा तशीच गर्दी जमा झाली, हे लक्षात घ्यायला हवे. शेवटच्या दिवशी तर पोलिसांनी शिरगावची नाकाबंदी करूनही गर्दी जमली. त्यावरून भाविकांची सुरक्षितता लक्षात घेऊन या पाच दिवसीय उत्सवाचा कालावधी आणखी वाढवता येईल का, याची चाचपणी देवस्थान समितीला करावी लागेल. अर्थात हा अधिकार सर्वस्वी देवस्थानचा असून त्यासाठी आवश्यक त्या धार्मिक विधींचे पालन करूनच त्यासंबंधी निर्णय घेणे क्रमप्राप्त आहे, हे नम्रपणे नमूद करावे लागेल. तसे शक्य नसेल, तर प्रशासनाच्या मदतीने पाच दिवस कोणत्या प्रकारे गर्दीचे व्यवस्थान करता येईल, याची चोख व्यवस्था पुढच्या काळात करावी लागेल. कारण गर्दीला मेंदू नसतो. ती जमण्याआधी​च चाप लावला, तरच संभाव्य अप्रिय गोष्टी टाळता येतील.

घटना घडून गेल्यानंतर आरोपप्रत्यारोप करणे हे तर पश्चातबुद्धीचे लक्षण. त्यातून एकमेकांवरचा राग व्यक्त करण्यापलीकडे काही घडत नाही. विसंवादाचे जाहीर प्रदर्शन होऊन त्यावर खमंग चर्चा मात्र होताना दिसते. मतभेद असतातच, पण कुठल्याच धार्मिक स्थळांच्या बाबतीत असे प्रकार जाहीररीत्या होणे योग्य नव्हे. अर्थात त्यातून बोध घेतल्यास त्याचा फायदा भविष्यात नक्की होईल यात दुमत नाही. ज्या त्रुटी दिसून येतात, त्या दूर करण्याला प्राधान्य तर असायला हवेच, शिवाय सर्वांनी एकजुटीने असे विषय हाताळण्याची गर​ज आहे. हा झाला आयोजन-नियोजनाचा मुद्दा. खरे अवघड जागेचे दुखणे आहे ते म्हणजे गर्दी. गर्दीचा भाग होण्यातच धन्यता मानणाऱ्यांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. उत्सवाच्या दिवशी धार्मिक स्थळावरील रांगांमध्ये उभे राहण्यात किंवा बराच काळ तिष्ठत राहून देवदर्शन घेण्यात चुकी​चे काहीच नाही. धार्मिक भावनेतून सहज होणारी ती एक कृती आहे. उत्सवाच्या दिवशी देवदर्शनाचे महत्त्व सर्वांना ज्ञात आहेच. मात्र अशा गर्दीचा भाग होऊन जीवावर बेतण्याआधी धडा घेण्यातच शहाणपणा आहे. शक्यतो गर्दीची वेळ टाळून किंवा अन्य दिवशी देवदर्शन घेणे योग्य. अर्थात हा प्रत्येकाचा निर्णय असेल. स्वत:सह इतरांच्या सुरक्षिततेसाठी गर्दीचा सोस टाळणेच योग्य!


सचिन खुटवळकर 
(लेखक दै. गोवन वार्ताचे वृत्तसंपादक आहेत.)