तुळशी

पोरीची जात आहे हो, भीती वाटते त्या कोवळ्या जीवाला उगाचच कोणाच्याही स्वाधीन करायला. या गावात डोळे झाकून विश्वास करावा असे फक्त तुम्हीच आहात. म्हणून सर्वांनी तुमच्याकडे बोट दाखवलंय. तुम्हीच त्या पोरीचे दाता होऊ शकता.

Story: कथा |
04th May, 05:37 am
तुळशी

सकाळपासून भाऊसाहेब हे आपल्या लांबलचक असलेल्या ओसरीवर येरझाऱ्या मारत होते. अनेक वर्षांपासून साठलेले विचारांचे थर आज उचल घेत होते, विचारचक्र चालू असताना मध्येच भानुप्रिया येऊन त्यांच्यासमोर उभी राहिली. 

“अहो ऐकलं का, जो निर्णय तुम्ही आज घेणार आहात तो काही मला पटला नाही. चौघींना बोलवायचं आणि माझ्या तुळशीला मात्र अलगद बाजूला करायचं. किती करते हो पोर आपल्यासाठी. पोटची पोर नसली म्हणून काय झालं? मुलगी असली तरी मुलाला लाजवेल अशी जबाबदारीची कामं करते. कारखान्यात किती मदत होते तिची तुम्हाला. जरासुद्धा त्रास होऊ देत नाही पोर आणि... तुम्ही एवढ्या मोठ्या निर्णयात तिला सामील करून घेत नाही याचंच वाईट वाटतं मला.” 

“तसं नाही गं भानू, तुला नाही समजायचं. सोड! जाऊ दे! या आल्या की बोलू सविस्तर.” असं म्हणत भाऊसाहेब आराम खुर्चीत बसले. 

“मला सगळं समजतंय, काही द्यायची वेळ आली की माणूस आपल्याच मुलांचा विचार करतो. शेवटी काय परक्याने कितीही केलं तरी परकं ते परकंच ठरतं हेच खरं.” भानुप्रिया जिभेवरचा ताबा सुटल्यागत बोलत सुटली होती. 

“अगं भानू, पिसाळलेल्या वाऱ्यासारखी बेभान होऊन कुठल्याही दिशेने का वाहवत चालली आहेस? जरा लगाम घाल त्या जिभेला!” रागातच भाऊसाहेब म्हणाले. “कोण परकी? तुळशी, अगं तिला तर आपण पोटच्या पोरीपेक्षा जास्त जीव लावलाय आणि खरं सांगायचं तर तिने आपल्यापेक्षा आम्हा दोघांनाही लळा लावलाय. पण कसं आहे ना भानू, माझ्या इस्टेटीच्या खऱ्या वारसदार आपल्या चार मुली आहेत. त्यामुळे पहिला हक्क त्यांच्याकडे जातो. उद्या बापाने अन्याय केला असं होता कामा नये म्हणून आणि फक्त त्यांच्यासाठी मी सर्वांसमक्ष काय तो निर्णय घेणार आहे. तुला आठवतोय तो दिवस ज्या दिवशी मी तुळशीला घेऊन आलो होतो?” 

असं म्हणत असताना भाऊसाहेब भूतकाळाच्या पायऱ्या अलगद चढू लागले. दुपारच्या जेवणानंतर आपल्याच कारखान्यात जरा आरामखुर्चीवर विसावले होते तेवढ्यात वॉचमन ऑफिसच्या दारावर ठोठावू लागला. किंचित झोपेच्या अधीन होत असलेल्या भाऊसाहेबांनी “कम इन” म्हटलं तसा तो आत आला. 

“साहेब!” 

“काय रे काय झालं?” भाऊसाहेबांचा आवाज जरा वरचढ होता. 

“साहेब, बाहेर काही गावातील माणसं आली आहेत.” वॉचमन कसाबसा बोलला. 

“पाठव त्यांना आत.” म्हटलं खरं पण का आली असणार गावातील माणसं असा विचार डोकावतो न डोकावतो तेवढ्यात लोक ऑफिसमध्ये पोहचले होते. 

“कसं काय भाऊसाहेब” म्हणत सगळ्यांनी हात मिळवणी करून बसले. काही जण उभे राहिले. 

“काय काम काढलंत माझ्यासारख्या पामराकडे?” भाऊसाहेबांचा प्रश्न. 

“भाऊसाहेब, जे काम आहे ते तुम्हीच करू शकता. मोठ्या आशेने आलो आहोत तुमच्याकडे.” एक गावकरी म्हणाला. 

“मला झेपणारं असेल तर नक्कीच करेन. सांगा काय सेवा करू?” भाऊसाहेब म्हणाले. 

“आपल्या गावातली दुर्गी म्हालकर गेली. तिची पाच वर्षांची लेक आहे. तिचा सांभाळ करायला तिचा भाऊ तयार नाही त्यामुळे तो मोठा गहन प्रश्न पडला आहे संपूर्ण गावाला आणि यातून मार्ग म्हणजे त्या मुलीला भाऊसाहेब आपण आश्रय दिला तर उपकार होतील हो गावावर. म्हणून आलो होतो आम्ही.” म्हणत गावाकऱ्यांनी हात जोडले भाऊसाहेबांसमोर. 

“आहो असे हात जोडू नका, मी काही देव नाही. मी एक सामान्य माणूस आहे. तुम्हाला जशी त्या करुण जीवाची काळजी आहे, तशीच मलासुद्धा वाटतेय. पण माझ्या घरी अगोदरच माझ्या चार मुलींचं करताना थकून जायला होते. तिथे पाचवी कशी घरी नेऊ? हा प्रश्न आहे.” 

“भाऊसाहेब, नाही म्हणू नका. तुमच्याशिवाय आता त्या पोरीला कोणी वाली नाही. पोरीची जात आहे हो, भीती वाटते त्या कोवळ्या जीवाला उगाचच कोणाच्याही स्वाधीन करायला. या गावात डोळे झाकून विश्वास ठेवावा असे फक्त तुम्हीच आहात. म्हणून सर्वांनी तुमच्याकडे बोट दाखवलंय. तुम्हीच त्या पोरीचे दाता होऊ शकता.” एवढ्या सगळ्या विनवण्या ऐकून भाऊसाहेबांना रहावलं नाही. त्यांनी क्षणात निर्णय घेतला आणि त्या निष्पाप जीवाला आधार द्यायचे ठरविले. (क्रमश:)


बबिता गावस, साखळी