म्हालची पांढर

हा असा दसरा अनुभवण्यासाठी पायवाटा तुडवत माळावर जावे लागते. विस्तीर्ण पसरलेल्या हिरव्यागार शेताच्या मेरेवरून तोल सांभाळून चालावे लागते. त्याची सुरुवात आणि समाप्ती होईपर्यंत तासनतास उभे राहावे लागते.

Story: लोकगंध |
12th October, 12:04 am
म्हालची पांढर

दसरा सणाचा आबच मोठा. त्याचा थाट राजेशाही. वेष भरजरी. श्रीमंतीचे प्रदर्शन घडविणारा हा सण. सर्वसामान्यांना पुरते वेड लावतो. शिवलग्न पार पाडले जाते. देव पाहूणचाराला येतात. त्यांची उठबस करताना सगळ्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो. पूर्वी गावात पाहुणेर घातला जायचा. ज्या मानकऱ्याच्या घरात देव एका रात्रीचा मुक्काम करायचे, ते घराणे संपूर्ण गावाला जेवण वाढायचे. चांदीवड्याच्या पानांवर गरमागरम उकडा भात... त्यावर पिवळेजर्द वरण! बस्स!! एवढाच काय तो बेत. तो महाप्रसाद स्वर्गीय सुख द्यायचा. शौर्याचा, असीम साहस, पराक्रमाचा हा दिवस. चांगुलपणाचा वाईटावरील विजय.

नऊवारी कापडाचा एकावर एक थर नेसवलेली तरंगे... मुसळ सदृश्य त्यांचा दांडा. त्यावर असलेली पारंपरिक नक्षी. ती उराशी कवटाळून देवतत्वाची स्पंदने अनुभवणारे भक्तगण. लोकवाद्यांचा निनाद, त्यावरील ते बेभान होऊन धावणे... सारेच विलोभनीय, अलौकिक, चित्तवृत्ती रोमांचित करणारे. हा उत्सव प्रकृती पुरुषाच्या मिलनाचा सोहळा साजरा करतो. त्याचा भरजरी पदर त्यातील भव्यत्व दिव्यत्वाची प्रचिती देतो. कोहळ्यावर केलेला रक्ताचा अभिषेक समर्पण आणि सामर्थ्य अधोरेखित करतो. हा उत्सव श्रीमंती थाटाचा. रंध्रारंध्रात उसळत्या रक्ताचा अवसर जागविणारा... अध्यात्मिक अनुभूतीच्या स्पर्शाने झपाटून टाकणारा. 

या पेक्षा एक वेगळा दसरा, दूर निसर्गाच्या सानिध्यात झाडापेडांच्या साक्षीने होणारा... एक घंटा, ढोल आणि थाळी सोडली तर आणखीन कोणतेच वाद्य नाही. पूर्वी सुरपावा, कोंडपावा, मुरली यांचा वापर व्हायचा. काळाच्या ओघात तेही मागे पडले. या दसऱ्याला भरजरी किनार नाही परंतु रानगंधाची भूल आहे. पारंपरिकतेचा साधासुधा साज आहे. पावित्र्याचे कोंदण आहे. दसऱ्याच्या नवमीला देव पूजेला लावतात. नवरात्रीच्या आठव्या रात्री जागर केला जातो. नारळाचे तोरण माटोळी मंडपीला बांधली जाते. त्याच्या जोडीने करांदे, भेंडी, काकडी, वाली, कारली, कवंडाळे, भाताच्या लोम्ब्या, झेंडूची फुले ही त्यांनी स्वतःच्या हाताने केलेली मशागतीचे फळ असलेली फळं, फुलं मंडपीला बांधली जातात. जागराच्या रात्रीला करांदे व तांदळाच्या पीठापासून तयार केलेले पदार्थ नेवैद्य म्हणून दाखवले जातात. हा असा दसरा अनुभवण्यासाठी पायवाटा तुडवत माळावर जावे लागते. विस्तीर्ण पसरलेल्या हिरव्यागार शेताच्या मेरेवरून तोल सांभाळून चालावे लागते. त्याची सुरुवात आणि समाप्ती होइपर्यंत तासनतास उभे राहावे लागते. 

घराघरातून पाट्या निघतात. त्या मांडावर येईपर्यंत वाट पहावी लागते. चांदीचे, दगडाचे, नारळाचे, सुपारीचे देव घराण्याप्रमाणे पुजले जातात. प्रत्यक्ष दसऱ्याला उभयता मिळून पाटी बाहेर काढतात. शेणाने सारवलेल्या टोपलीत पूजेचे साहित्य आणि ताकाने भरलेला दुडगा ठेवला जातो. ती पाटी महिला आपल्या डोक्यावर घेते. त्यापूर्वी तिने डोक्यावरून पदर घेतलेला असतो. तिच्या नवऱ्याने  डोक्यावर कांबळीची खोळ करून घेतलेली असते. हातातील पितळेच्या ताटात आरती असते. मांडावर पोहोचेपर्यंत अखंड घंटानाद चालूच असतो. जमिनीवर कांबळी ओळीत अंथरून त्यावर तांदळाच्या चौकटीची आखणी करून प्रतीकात्मक म्हालची पांढर रेखाटली जाते. कुड्याच्या पानांवर शिजविलेला भात ठेवला जातो... समोर पंचारती, अगरबत्ती, गोड पदार्थ... काही नैवेद्याचे तर काही आंगवणीचे. नैसर्गिक तत्त्वाचे अधिष्ठान असलेला आहे धनगरी दसरा. 

एकेकाळची भटकी जमात. धरित्री आणि धनगरी समाजाचा उगम हा समांतरच आहे. अशी त्यांच्या जुन्या जाणत्यांची धारणा आहे. 'म्हालची पांढरच्या रुपातील निराकार तत्त्वावर असीम श्रध्दा  बाळगणारा समाज म्हणजे धनगरी समाज. ही जमात एकेकाळी भटकी होती. डोंगरदऱ्या पालथ्या घालीत निसर्गाशी सख्य जुळवून आपला उदरनिर्वाह करणारी. प्राणी जनावरांना आपल्या पोराबाळा एवढाच जीव लावणारी. या जमातीतील जुने जाणते सांगतात की, कधीकाळी धनगर जाती फिरती पाटी, खुटी मारून मठी जोडली. तीन धोंड लावले. पाच वासे लावून जल्लोम जोडून दिला. वारसा पुढे नेणारी पिढी तगवली. कुळदेव दिला. अंग झाकण्यासाठी वस्त्र, कमरेला आकडी, खांद्यावर घोंगडी, एका हातात काठी त्याला कुंडली, सोबतीला बरोबरीने साथ करणारी जोडीदारीण अस्तुरी, पोटापाण्याची सोय गुरे-वासरे, शेळ्या, बोकड्या, कोंबड्या देऊन केली. पोटाला कोंडा आणि उशाला धोंडा दिला. वरून आशीर्वाद दिला, की या पृथ्वीतलावर जेथे जेथे कोठे सूर्य उगवतो आणि मावळतो त्या धरित्रीवर तू कोठेही राहिलास तरीही तुझे कल्याण होईल... आज काळ बदलला आहे. शिक्षणामुळे कौटुंबिक विश्वाला आकार मिळाला. जगण्याला स्थैर्य लाभले. बदलत्या जीवनशैलीमुळे त्यांच्या राहाणीमानात, भावविश्वात प्रचंड उलथापालथ झालेली असली तरी ज्या सणाविषयी त्यांचे सारे समाजजीवन एका सूत्रात गुंफले गेले आहे तो दसरा सण म्हणजे त्यांच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि कौटुंबिक संचिताचे वैभवसंपन्न रूप आहे. 

म्हालची पांढरचे कांबळी वरील अधोरेखन करून त्या निराकार स्वरूपाची पूजा केली की मग सुरू होतो गजानृत्याचा आविष्कार... “भले चांग... भले चांग...” करून परिसर दणाणून सोडला जातो. खास लकबीने घातलेली धनगरी फुगडी हे या मांडाचे वेगळेपण. हळूहळू करून विविध देवदेवतांचा अवसर, पितरांची आठवण काढीत मांडाला धीरगंभीर गुढत्वाचे वलय प्राप्त होते. या वर्षी मांड बघितला तो दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले-केर गावाचा. सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेला. तुरळक घरे. फार फार वर्षांपूर्वी चार बाजूला चार खुंट मेडी पुरल्या जात. बेताच्या कामट्यापासून तयार केलेल्या दोन साट्या. वरच्या साटीला नारळाचे तोरण व इतर नैसर्गिक फळ फळावळ बांधली जायची. खालच्या साटीवर कपडा अंथरून देव पुजले जात. कालपरत्वे आता यात बराच बदल झालेला आहे. लांबर, गावडे, जंगले, शिंदेच्या पाट्या मांडावर आलेल्या, पाऊस जोरदारपणे पडत होता. जमलेले सर्वच भिजून चिप्प झालेले. पण नृत्याची ओढ अनिवार.

पावसामुळे सर्वत्र चिखल झाला होता. त्याच चिखलात सर्वच बेहोष होऊन नृत्य करीत होते. एवढ्यात एकेकट्याच्या अंगात देव येत गेले. येणारे जाणारे, पै पाहुणे, भक्तगण सगळेच देवासमोर नतमस्तक होत गेले. पूर्वी धनगरी समाजात घरीदारी तुपाचे दिवे लावले जायचे. दूधदुभते, ताक, दही मुबलक प्रमाणात होते. शेळ्या-म्हशींचा राबता वैभवशाली परंपरेचे प्रतीक होते. आज मुख्य प्रवाहात त्यांचे जगणे जोडले जात आहे. असे असले तरी निसर्ग आणि माती यांच्याशी जुळलेली नाळ सहजपणे विलग होणारी नसते. म्हणूनच नोकरी, धंदा, शिक्षण या कारणामुळे गावापासून दूर गेलेल्या लोकमानसाची पावले आपोआपच नैसर्गिक कोंदण लाभलेल्या पारंपरिक मांडाकडे वळतात...

(लेखिका लोकसाहित्याच्या अभ्यासक, कवयित्री आणि शिक्षिका आहेत.)


- पौर्णिमा केरकर