मुलांसाठी मन घट्ट करून डोळ्यातून एक टिपूस न काढलेल्या जोश्याने आज माझ्या खांद्यावर डोकं ठेवून हमसून हमसून रडून घेतलं आणि त्याने रडता रडता म्हणलेलं वाक्य माझ्या डोळ्यात झणझणीत अंजन घालून गेलं. तो म्हणाला, 'ती माझी सहधर्मचारिणी होती, हेच मी विसरलो होतो.'
“मंजिरी... मी आलोय गं. तू झोप. वाढून घेतो मी..!!” पेंगणाऱ्या मंजिरीजवळ येत मंदार म्हणाला. तशी मंजिरी लगेच उठून त्याच्यापासून दूर झाली. “मी आणते वाढून...” म्हणत ती आत गेली. तिने जेवण गरम केलं आणि ताट आणून टेबलवर ठेवलं आणि ती जायला वळतच होती, इतक्यात मंदारने तिला रोखलं. “मंजू... थांब ना. इथेच बस ना, पूर्वी मी जेवताना बसायचीस तशी.” तो म्हणाला. तशी ती दबकतच टेबलाच्या एका टोकाला बसली. “अशी दूर का? इथे ये ना, या समोरच्या खुर्चीत बस. माझ्या जवळ...” मंजिरीला धक्क्यावर धक्के बसत होते.
एरवी ऑफिसमधून जमदग्नींचा अवतार धारण करून येणारा आणि घुश्श्यात तिच्याशी वागणारा मंदार अगदी मवाळ वागत होता. जेवता जेवता त्याने तिलाही दोन घास भरवले. तो कितीही उशिरा घरी आला तरी त्याला जेवू घातल्याशिवाय ती जेवत नसे हे त्याला पुरेपूर माहीत होतं. जेवून झाल्यावर तिने सारं आवरलं आणि झोपायला किचनमध्ये अंथरुण अंथरलं. ती अंथरुणावर पाठ टेकणार इतक्यात मंदार किचनमध्ये आला.
“मंजू... आज इथे नको झोपूस. आपल्या बेडरूममध्ये चल.” म्हणत त्याने तिला उठवलं. तीही त्याच्यामागे आली. ती पौर्णिमेची रात्र होती. खिडकीतून येणाऱ्या चांदण्या प्रकाशात खोली उजळून निघाली होती. मंजिरी त्या खोलीत अशी रात्रीच्या वेळी सुमारे पाच वर्षांनंतर येत होती. एरवी खोली आवरण्यासाठी दिवसा येणं व्हायचं तेवढंच. पण आज अचानक चमत्कार झाला होता. मंदार तिच्या पायाजवळ बसला आणि त्याने अलगद तिच्या मांडीवर डोकं ठेवलं. नकळत तिचे हात त्याचे केस कुरवाळू लागले. “काय झालं..!?” तिने हळुवार आवाजात विचारलं. “मी चुकलो मंजू... मी खूप वाईट वागवलं तुला, आता इथून पुढे चूक होणार नाही... मला माफ कर... माझ्यापासून कधी दूर जाऊ नकोस... मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय...” मंदार अगदी डोळ्यात पाणी आणून निरागस मुलासारखा काकुळतीला येऊन तिला विनवीत होता. “अहो, अचानक झालयं काय तुम्हाला... कसली चूक... कसली माफी... उठा बघू... उठून बसा... आणि झोपा लवकर, उशीर झालाय, उद्या ऑफिस आहे तुम्हाला... मी जाते...” मंजिरी गोंधळून म्हणाली. “हो बरोबर आहे. मला हीच शिक्षा. इतकी वर्ष तुला गरज असताना मी तुला दूर सारलं, आज मला गरज आहे तुझी, पण माझ्या कर्मामुळे तू दूर... असो... जा तू... तुला जागरण नको आणि हो, त्रास करून घेऊ नकोस आणि जमलं तर मला माफ... नाही, काही नाही, जा तू...” आता मात्र मंजिरीला खात्री झाली, काहीतरी गंभीर घडलं होतं आणि त्यामुळेच मंदार एका रात्रीत बदलला होता.
तिने त्याला हलकेच उठवून बेडवर बसवलं आणि त्याच्या हातावर हात दाबत म्हणाली, “मी नाही जात कुठे... आहे तुमच्या अगदी जवळ पण आधी मला सांगा काय झालयं..?” “मंजू... अगं, हार्ट अॅटॅकचं निमित्त होऊन शारदा वहिनी गेल्या... कालच त्यांचं दिवस कार्य झालं आणि आज जोशी पुन्हा रुजू झाला. नेहमी कडक इस्त्रीच्या कपड्यात येणाऱ्या जोशीचे कपडे आज चुरघळलेले होते, त्याने डबा उघडताच पंचपक्वांन्नांचा ऑफिसभर दरवळणारा वास गायब होऊन आज त्याच्या डब्यात अर्ध्या जळक्या पोळ्या, पाण्याच्या धारेगत डाळ आणि अळणी भाजी होती. मुलांसाठी मन घट्ट करून डोळ्यातून एक टिपूस न काढलेल्या जोश्याने आज माझ्या खांद्यावर डोकं ठेवून हमसून हमसून रडून घेतलं आणि त्याने रडता रडता म्हणलेलं वाक्य माझ्या डोळ्यात झणझणीत अंजन घालून गेलं. तो म्हणाला, 'ती माझी सहधर्मचारिणी होती, हेच मी विसरलो होतो.' ” बोलता बोलता मंदार थोडा थांबला. एकवार मंजिरीच्या डोळ्यात पाहिलं. तिचे डोळे पाण्याने काठोकाठ भरले होते.
“मंजू... आपलं लग्न झालं. नव्याची नवलाई सरली आणि आपला खऱ्या अर्थाने संसार सुरू झाला. तू माझ्यासकट माझ्या साऱ्या घराचा भार सांभाळलास. माझ्या ऑफिसच्या वेळा, आई-अण्णांची पथ्ये. माझ्या बढत्या, आपल्या छोट्या घरातून या मोठ्या घरात येण्याचा निर्णय, घेतलेलं कर्ज, तुझे गहाण पडलेले दागिने, कर्ज फेडतानाचे कष्ट, आपल्या मिनीचा जन्म, ही सुबत्ता-समृद्धी सारं सारं तुझ्या खंबीर पाठिंब्यामुळे झालं, याचाच मला विसर पडला होता. तू घरात असतेस, तुला तुझी मतं नाहीत, तू माझ्या आधारावर जगतेस, असला खुळा अहंकार मी कुरवाळत होतो. रोज उगाचच तुझ्या कामात खोड्या काढत होतो. हे असं करता करता ज्या मंजूवर मी भाळलो, तिलाच पदोपदी टाळू लागलो. ज्या टपोऱ्या डोळ्यांनी मला जिंकलं होतं, जो कमनीय बांधा मला मोहिनी पाडत होता, जे गुलाबी ओठ मला मधाधीन करत होते, या सगळ्यांना कर्तव्यदक्ष गृहिणीची, जबाबदार सून, प्रेमळ आईची अशा अनेक झालरी लागल्यानंतर माझ्या लेखी माझी सखी तुझ्यातून नष्ट झाली. तुझा सुग्रणीचा हात, त्या हातातून दरवळणाऱ्या अन्नपूर्णेच्या गंधाला मी तुच्छ लेखलं आणि 'तुझ्या अंगाला मसाल्यांचा वास येतो, तुला जवळ घ्यावसं वाटत नाही' म्हणत आपल्यातला दुरावा वाढवत राहिलो आणि माझी ही टवटवीत कळी पार कोमेजून गेली हे सुद्धा माझ्या लक्षात आलं नाही. पण आज जोश्याच्या शब्दांनी माझे डोळे उघडले. माझी पत्नी म्हणून सप्तपदी घेऊन सुरू झालेला तुझा प्रवास सहधर्मचारिणी होत तू पूर्ण केलास, हे मला आज कळलं आणि या वाटेत मी मात्र अपात्र ठरलो, पण मला एक संधी देशील... माझी चूक सुधारण्याची..? मला माझी सहधर्मचारिणी गमवायची नाही गं...” तिचा हात हातात घेऊन त्याने तिच्या नजरेला नजर भिडवत विचारलं... त्याच्या हृदयाची आर्त हाक तिच्या हृदयापर्यंत पोहचली होती आणि म्हणून ती काही न बोलता त्याच्या कुशीत शिरली आणि रात्रीला रंग चढला नि मंदारला त्याचं उत्तरही मिळालं..!!
- अनु देसाई
७७६८९८४००३