स्वीकृती

​त्यांच्या शरीराचे कण कण लढत होते, पण त्यांची इच्छाशक्ती एवढी प्रबळ होती की, आजाराला त्यांच्यासमोर मान झुकवावी लागली. एकीकडे जीवघेणा आजार आणि दुसरीकडे जीवनाचा हा अखंड आणि उत्साही स्वीकार... त्यांचा हा अफाट आशावाद, त्यांची लढण्याची ही पद्धत बघून त्यांच्या कुटुंबातील आणि आमच्या वैद्यकीय टीममधील सगळ्यांचंच मन कृतज्ञतेने आणि आदराने भरून यायचं.

Story: स्टेथोस्कोप |
06th December, 11:13 pm
स्वीकृती

त्या दिवशी आयसीसीयूच्या थंड हॉलमध्ये माझे पाय अगदीच जड झाले होते. वहिनींच्या बेडसमोर उभा राहिलो, तेव्हा त्यांचे डोळे माझ्याकडे वळले. ऑक्सिजन मास्कच्या मागून हसतच म्हणाल्या,

"काय रे रागावलास काय माझ्यावर?"

माझ्या चेहऱ्यावरील संकोच पाहून त्यांनी हात पुढे केला . मी त्यांचा हात पकडला, तेव्हा त्यांनी माझ्या हातावरून हात फिरवला आणि सांगितले,

"अरे नाही रे, मी तुला बोलावलं होतं पण ओपीडीच्या गडबडीत तू येऊ शकला नाहीस हे मला कळतंय रे. सोड रे, तुझी गम्मत केली. तुझी भेट मला आधार वाटतो ‘डॉक्टरसाहेब’."

चार महिन्यांपूर्वी त्यांचा मेसेज आला होता, ‘डॉक्टरसाहेब, भेटून जा रे, जरा तब्येत खराब आहे.’ पण OPD च्या धावपळीत, रुग्णांच्या रांगा सांभाळताना मी वेळ काढू शकलो नव्हतो. आज मात्र मी हॉस्पिटललाच पोहोचलो. दार उघडताच नर्सने सांगितले, "ऑक्सिजनवर आहेत ताई."

धक्काच बसला! काही वर्षांपूर्वी वहिनी पहिल्यांदा माझ्या दवाखान्यात आल्या, तेव्हाचा त्यांचा चेहरा आठवतोय. अगदी आरोग्यपूर्ण, टवटवीत आणि आत्मविश्वासाने भरलेला. त्यांची ओळख काय सांगू? एम.कॉम.ची पदवी घेऊन बँकेत उच्च पदावर कार्यरत, कुटुंबाचा आधारस्तंभ, आपले घर प्रेमाने सांभाळणाऱ्या आणि सर्वांच्या लाडक्या 'वहिनी'. त्यांच्या जीवनाची गाडी अगदी रुळावरून सुरळीत, वेगाने धावत होती.

​पण जेव्हा त्यांच्या तपासण्यांचे अहवाल आले, तेव्हा होत्याचे नव्हते झाले. कागदपत्रांमध्ये दडलेली ती क्रूर बातमी होती: ब्रेस्ट कॅन्सर, स्टेज-३.

​हे ऐकून क्षणभर माझ्या मनातही काहूर माजले. एवढ्या तेजस्वी व्यक्तीच्या वाटेवर नियतीने ही कुठली परीक्षा आणली? मी त्यांना धीर देण्याची तयारी करत असतानाच, त्यांच्या डोळ्यांतील स्थिर आणि शांत भावाने मलाच शांत केले.

​त्यांचे शब्द आजही माझ्या कानात घुमतात, ज्यात भीतीचा लवलेशही नव्हता. त्यांनी अगदी सहजपणे, विनोदी आणि खंबीर स्वरात मला म्हटले होते: ​“टेन्शन नको डॉक्टर. मी बिनधास्त आहे. कॅन्सरने माझ्या शरीरात प्रवेश केला असेल, पण माझ्या आत्म्यात नाही. मेडिसिन घेते, तुम्ही द्याल ती पण घेते! मी लढायला तयार आहे!”

​आणि खरोखरच, त्यांचा हा असामान्य आशावाद केवळ बोलण्यापुरता नव्हता. कीमोथेरपीचे शारीरिक आणि मानसिक अत्याचार सुरू असतानाही, त्यांच्या आयुष्याची गती क्षणभरही थांबली नाही. उपचारांमुळे होणारा थकवा, वेदना, केस गळणे या सगळ्यावर मात करून त्या रोज सकाळी ऑफिसला जायच्या. स्वतःच्या दोन्ही मुलींना शाळेत सोडायच्या, वेळेवर घरी येऊन घरची सगळी जबाबदारी पार पाडायच्या आणि रात्री शांतपणे आपल्या नोकरीची कामेही पूर्ण करायच्या.

​त्यांच्या शरीराचे कण कण लढत होते, पण त्यांची इच्छाशक्ती एवढी प्रबळ होती की, आजाराला त्यांच्यासमोर मान झुकवावी लागली. एकीकडे जीवघेणा आजार आणि दुसरीकडे जीवनाचा हा अखंड आणि उत्साही स्वीकार... त्यांचा हा अफाट आशावाद, त्यांची लढण्याची ही पद्धत बघून त्यांच्या कुटुंबातील आणि हॉस्पिटलच्या वैद्यकीय टीममधील सगळ्यांचंच मन कृतज्ञतेने आणि आदराने भरून यायचं. त्या केवळ औषध घेत नव्हत्या, तर त्या सकारात्मक जगण्याची ऊर्जा शोषून घेत होत्या.

“वहिनी, इतका त्रास होतोय तरी तुम्ही हसता कसं?” मी विचारलं होतं. हसून म्हणाल्या होत्या, “डॉक्टर, हसणं हे मेडिसिन आहे. ते घेतलं की सगळं सहज वाटतं.”

वेळ गेली. काही वर्षं आजाराची लढाई लढल्या. दोन्ही मुलींना इंजिनीअरिंग कॉलेजात पाठवलं. वहिनी अभिमानाने सांगायच्या,

“आता जबाबदारी पूर्ण झाली हो डॉक्टरसाहेब. त्या आता स्वतःच्या पायावर उभ्या राहतील. आता माझं मन हलकं झालंय.”

पण आज... 

ऑक्सिजन मास्क लावलेला होता. प्रत्येक श्वास कठीण होत होता. तरीही त्यांचं बोलणं तसंच होतं. धापा लागत असतानाही मला म्हणाल्या,

“डॉक्टर... दे मेडिसिन. मी घेते.”

पुन्हा एकदा तीच विनंती. मी अवंढा गिळला आणि म्हणालो, “हो वहिनी, देतोच मी.”

त्यांनी माझ्या डोळ्यात डोळे घालून सांगितले,

“मला माहित आहे डॉक्टर... मला माहित आहे पुढे काय आहे... पण तू दे मेडिसिन. तुझ्यावर माझा विश्वास आहे.”

आजही जेव्हा ते शब्द आठवतात, "मला माहिती आहे", तेव्हा लक्षात येते की ते केवळ मृत्यू स्वीकारत नव्हत्या, तर त्या आपल्या 'डॉक्टरसाहेबला' आणि आयुष्याच्या प्रवासाला एक शांतपणे निरोप देत होत्या. मृत्यूची काळोखी सावली त्यांच्या अगदी समोर उभी होती, तरीही त्यांच्या चेहऱ्यावर एक अलौकिक शांतता आणि डोळ्यांत निर्भयतेची चमक होती. त्यांच्या त्या विश्वासाने माझ्या जबाबदारीला एक मानवी आणि भावनिक किनार दिली. त्या विश्वासाचे मोल कुठल्याही औषधाच्या किमतीपेक्षा जास्त होते!

मी त्यांचा हात हातात घेतला आणि त्यांच्या डोळ्यांत पाहिले, तेव्हा मला समजले. हा विश्वास केवळ आधुनिक मेडिसिनचा नव्हता, उपचारांवरचा नव्हता.

​हा विश्वास होता त्यांच्या अखंड जीवनावरच्या श्रद्धेचा, त्यांच्या अदम्य इच्छाशक्तीचा आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, गेल्या काही वर्षांत आमच्या दोघांमध्ये निर्माण झालेल्या अटूट नात्याचा. काही वर्षांचा हा प्रवास... या काळात मी त्यांचा केवळ उपचार करणारा फॅमिली डॉक्टर नव्हतो; मी त्यांचा लहान भाऊ झालो होतो, कधी त्यांचे दुःख हलके करणारा मित्र झालो होतो, तर कधी त्यांना आधार देणारा मुलगा.

“वहिनी, तुम्ही आता आराम करायला हवा.” मी हळूच म्हणालो.

त्यांनी हसत हात वर केला आणि सांगितले,

“दे त्याला शक्ती... डॉक्टरला दे शक्ती... तो खूप चांगलं काम करतोय.”

मी त्यांच्या डोक्यावर हात फिरवला. केस गेले होते, चेहरा अर्धा झाकलेला होता, पण डोळ्यांत तीच चमक होती. 

मी आयसीसीयू बाहेर पडलो तेव्हा माझे पाय जड होते, पण मनात एक विचित्र शांतता होती.

वहिनींकडून मी खूप काही शिकलो:

आशावाद – कितीही कठीण प्रसंग असो, चेहऱ्यावर हसू ठेवा.

विश्वास – डॉक्टरवर, कुटुंबावर, स्वतःवर

सहजता – जीवन-मृत्यू दोन्ही सहजतेने स्वीकारा

कुटुंबाबद्दल नेहमी आभारी रहा

वहिनी माझ्यासाठी फक्त रुग्ण नव्हत्या. त्या माझ्या मोठी बहिण होत्या, मार्गदर्शक होत्या, माझ्या आयुष्याचा आधार होत्या. त्यांचा हा विश्वास, हा आशावाद, ही शांतता सगळं माझ्या मनात कायमचंच कोरलं गेलं.

आजही जेव्हा एखादा रुग्ण मला विचारतो, “डॉक्टरसाहेब, मी बरा होईन ना?” तेव्हा वहिनींचं ते हसू आठवतं. मी हसून सांगतो,

“होईल रे... विश्वास ठेवा. हसत रहा.”

कारण वहिनींनी मला शिकवलं होतं...

‘मृत्यू ही प्रक्रिया आहे, शेवट नाही. शांत स्वीकृती ही खरी ताकद आहे  विश्वास हे सर्वात मोठं औषध आहे. प्रत्येक क्षण मूल्यवान आहे

मृत्यू अनुभवणं खरंच कठीण आहे रे...’


डॉ. अनिकेत मयेकर