घरट्यातून उडणारी पाखरे आणि शिक्षणासाठी घराबाहेर पडणारी मुले, दोघांची ओढ सारखीच. चिमणीच्या पिलांचा चिवचिवाट आणि आईच्या डोळ्यांतील आसवे यांच्यातील भावनिक नात्याचा वेध घेणारी ही एक हृदयस्पर्शी कथा.

घराचा उंबरा ओलांडताना पिलांचा बारीक आवाजातला चिवचिवाट कानावर पडला. घरात पाय ठेवताच मी आईला आवाज दिला, "आई, चिमणीला पिल्लं झालीत का गं?"
"होय रे, चार-पाच दिवस झाले असतील. आता आवाज यायला लागलाय!"
"अजून घरात पोहोचला नाहीस, तोवर लक्ष गेलं होय त्या चिमणीच्या घरट्याकडे!" आई उत्तरली.
हॉस्टेलवरून महिन्यातून एखादी फेरी घरी व्हायची. घराकडे येण्याची मी वाटच पाहत बसायचो. यावेळी पंधरा दिवसांची सुट्टी होती, त्यामुळे आता निवांत वेळ मिळणार होता. आई भारी खुश झाली होती. अजून पप्पा कामावरून यायचे होते. मी फ्रेश होऊन बाहेरच्या दगडी कट्टीवर येऊन बसलो. भिंतीच्या वरच्या कोपऱ्यातल्या खाचेमध्ये चिमणीचं घरटं होतं. बरीच वर्षे झाली होती आता; त्यांची सवयच झाली होती. आता तिथूनच या पिलांचा आवाज कानावर पडत होता. त्यांचा तो आवाज माझ्या परिचयाचा होता. आम्ही लहान असल्यापासून घरी चिमण्यांचा वावर होता, त्यामुळे प्रत्येक दिवस हा त्यांच्या मधुर चिवचिवाटाशिवाय जात नसे.
आम्ही भावंडे लहान असताना नुकतंच नवीन घर बांधलं होतं. घरी बाहेरच्या खोलीत एक मोठा आरसा लावलेला होता. तो आरसा बाहेर जाण्यापूर्वी आम्हाला टापटीप असण्याची पोचपावती देण्यासाठी सज्ज असायचा. घरातील कुणीही बाहेर जाण्यापूर्वी हमखास त्यात डोकावायचे. पण का कुणास ठाऊक, नंतर या चिमण्यांचा वावर वाढला आणि आमच्यासोबत त्या चिमण्याही त्या आरशात डोकावायला लागल्या. स्वतःचं प्रतिबिंब पाहून त्याला चोच मारत बसायच्या. कालांतराने त्या आरशावर छान नक्षीकाम अवतरले. जाळीदार रेषा पसरल्या. आरसा काही फुटला नव्हता, तर त्याच्या आतमध्ये ती नक्षी आली होती. आम्हाला त्याचे भारी कौतुक वाटायचे. मी ती नक्षी न्याहाळत राहायचो. या विचारात गुंग होतो, तोवर दारात पप्पांची गाडी थांबली आणि माझी तंद्री भंगली. पप्पा आणि मी गप्पा मारत घरात गेलो.
मी घरी असल्यामुळे या दिवसांत आई आणि पप्पा आनंदात होते. पुढचे काही दिवस मी त्यांच्या जवळ असणार होतो. आजही आठवतंय, मला शिक्षणासाठी लांब जावं लागलं याचं आईला खूप वाईट वाटलेलं. ती तेव्हा खूप रडली होती. दादाही नोकरीनिमित्त बाहेर होता. दोघेही घरी आणि आम्ही भावंडे बाहेर. त्यामुळे सुट्टीत आम्ही दोघे घरी आलो की ते आनंदी असायचे. या सुट्टीत रोज घरचं आवरायचं आणि चिमण्यांची खबरबात घ्यायची, हा माझा दिनक्रम ठरणार हे नक्की होतं. आता पिल्लं थोडी मोठी व्हायला लागली होती. घरट्यातून येणारा आवाज आजकाल वाढला होता.
चिमणा-चिमणी चोचीतून दाणे आणायचे आणि भरवायचे. मीही रोज सकाळी त्यांना तांदळाचे दाणे घालत होतो. चिमण्यांची एक-दोन पिसे तिथेच खाली उंबऱ्यात पडायची; मी ती हळुवार उचलून फुंकर मारून उडवायचो. लहानपणी हा आमचा खेळच होता. आता मोठे झालो म्हणून काय झालं, ती तेव्हाची मजा काही औरच! म्हणून आताही मी ती फुंकर मारत उडवत राहिलो.
दहा-बारा दिवस कुठे गेले कळलेच नाही. कालपासून दोन पिल्लं भिंतीच्या कोपऱ्यातून बाहेर येऊन बसायला लागली होती. आता ती छान गुटगुटीत दिसत होती. अंगावर नाजूक पिसांचा फुलोरा शोभत होता. ते पाहून मी आईला म्हणालो, "आई, पिल्लं बाहेर आलीत गं!"
तर आई म्हणाली, "आता मोठी झालीत, जातील उडून तीही. त्यांना मोठं केलं, सांभाळलं! आता त्यांचं जग त्यांची वाट पाहतंय. मग घरट्यातून बाहेर पडायला नको?"
आई एका श्वासात सगळं सांगून गेली. मी मात्र विचारात पडलो. चिमण्यांची आणि आपली गत काय वेगळी आहे का?
मी पुन्हा हॉस्टेलवर जायचा दिवस उजाडला आणि नेहमीप्रमाणे आईच्या डोळ्यांत पाणी आलं. दारात बॅग घेऊन आलो, पप्पा मला बस स्टँडवर सोडायला येणार होते. आई मात्र डोळे पुसत होती. आईला म्हणालो, "नको गं तू रडू, मग माझंही लक्ष लागायचं नाही तिकडं!"
तेवढ्यात चिमण्यांच्या घरट्याकडे लक्ष गेलं आणि आईला विचारलं, "पिल्लांचा आवाज का येत नाहीये?"
आई म्हणाली, "काल पिल्लं उडून गेलीत बाहेर. आली तर येतील, नाहीतर तिकडेच कुठंतरी राहतील!"
आईच्या डोळ्यांतील आसवांचा अर्थ आता कुठे उमजायला लागला होता.
पप्पांनी गाडीला किक मारली आणि 'आई येतो गं' म्हणून आम्ही निघालो! पण विचारांनी काही माझी पाठ सोडली नाही. चिमणी, तिची पिल्लं आणि आईच्या डोळ्यांतली आसवं... पूर्ण प्रवासभर विचारात फिरत होती.

- प्रा. सागर डवरी, हरमल