स्मार्ट 'जेन-झी'चा डिजिटल गाढवपणा..!!

हातातील 'स्मार्टफोन' जेवढा स्मार्ट होत चाललाय, तेवढीच ही 'जेन-झी' पिढी 'अनस्मार्ट' होत चालली आहे. तंत्रज्ञान आलं पण 'कॉमन सेन्स' मात्र गंजलेल्या पत्र्यामागे कायमचा हरवलाय!

Story: मिश्किली |
28th February, 11:24 pm
स्मार्ट 'जेन-झी'चा  डिजिटल गाढवपणा..!!

जकाल आपण ज्यांना 'जेन-झी' (Gen Z) म्हणतो, त्यांच्याबद्दलचा एक फार मोठा गैरसमज समाजात पसरला आहे. ही पिढी म्हणे 'टेक सेव्ही' आहे, यांना 'आर्टिफिशल इंटेलिजन्स' पाणी भरतं आणि ही पोरं आधुनिक उपकरणांत सर्वश्रेष्ठ आहेत. पण वास्तवात यांच्या डोक्यात 'इंटेलिजन्स' किती आहे आणि 'आर्टिफिशल' कचरा किती, हा खरोखर संशोधनाचा विषय आहे. काही मोजके अपवाद सोडले, तर या पिढीला साधी अक्कल वापरण्याचं वावडं आहे की काय, असं वाटतं. मी सर्वांवर आरोप करत नाही, पण काही विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वावर जर 'हास्य कादंबरी' लिहिली, तर ती 'हॅरी पॉटर'च्या सात खंडांपेक्षाही मोठी होईल. संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांची भयंकर हास्यास्पद उत्तरे एकत्र केली, तर जागतिक दर्जाचा विनोद निर्माण होईल.

यांच्या हुशारीचे नमुने परीक्षेच्या पेपरमध्ये असे काही उमटतात की तपासणाऱ्या शिक्षकाला आपण शिक्षक का झालो, असा प्रश्न पडावा. परीक्षेच्या हॉलमध्ये शेजारच्याचा 'रोल नंबर' जसाच्या तसा कॉपी करणारे जुने झाले. आताचे काही अतिशहाणे नमुने बघा. समजा, एखादा विद्यार्थी काल गैरहजर होता आणि आज त्याने मित्राच्या वहीतून बघून लिहायला सुरुवात केली. त्या मित्राने आदल्या दिवशी लिहिताना एखादा शब्द चुकला म्हणून खोडून पुन्हा लिहिला असेल, तर हा महाभाग कॉपी करताना 'तो खोडलेला शब्द' सुद्धा तसाच लिहितो आणि मग पुन्हा खोडतो! म्हणजे स्वतःचं डोकं वापरण्यावर या पिढीने संपूर्ण बॅन घातलेला दिसतो. संदर्भासाठी पुस्तक शोधण्याऐवजी 'गूगल' किंवा 'विकिपीडिया' असं लिहून मोकळे होणं, हे तर आता सर्रास झालंय. जणू काही पूर्ण ज्ञान या दोन शब्दांतच सामावलंय. मजेशीर म्हणजे कॉपी-पेस्ट करताना वाचतही नाहीत. ए.आई. वर जे खाली लिहून येते, जसे – “तुम्हाला यावर आधारित आणखी माहिती हवी आहे का किंवा मी याचा पीपीटी किंवा पीडीएफ बनवून देऊ का?” ही ओळ सुद्धा ते तशीच लिहून देतात. काही शिक्षक व उच्च पदस्थ व्यक्ती सुद्धा ए.आई. चे कॉपी करून आणतात व त्याचे फॉन्ट, बुलेट सुद्धा काढत नाहीत.

पत्र, ई-मेल लिहायची तर दूरची गोष्ट, साधे फॉर्म भरता येत नाही. फॉर्म भरणं म्हणजे यांच्यासाठी हिमालयावर चढण्याइतकं कठीण काम झालंय. पूर्वी लोक ऑफलाईन फॉर्म अत्यंत काळजीपूर्वक, शाई न सांडता भरायचे. आता सगळं ऑनलाईन आणि सोपं झालंय, नियमावली चक्क डोळ्यासमोर नाचत असते, तरीही या पिढीला फॉर्म भरता येत नाही. 'फोटो कोणता अपलोड करावा?' या गहन विषयावर तर आता खरंच एक 'अखिल भारतीय मार्गदर्शन किंवा संमेलन' भरवायला हवं! पासपोर्ट साईज फोटोसाठी स्टुडिओत जाणं तर सोडाच, पण मोबाईलमध्ये 'ए.आय.' वापरून एका क्लिकवर बॅकग्राऊंड बदलता येतो, हेही या 'टेक सेव्ही' म्हणवणाऱ्यांना माहीत नसतं की यांचा आळस आडवा येतो, हेच समजत नाही.

मग फॉर्मवर कसले फोटो येतात? कुणी दारापुढे उभं राहून काढलेला, कुणी खिडकीत पोज दिलेला, कुणी गंजलेल्या पत्र्याला टेकून दिलेली पोझ, कुणी भिंतीला टेकून, तर कुणी थेट समुद्रकिनारी किंवा धबधब्याखाली भिजतानाचा फोटो ऑफिशल फॉर्मला चिकटवतात. एका पठ्ठ्याने तर चक्क शॉपिंग मॉलच्या 'ट्रायल रूम'मध्ये सेल्फी काढली आणि तोच फोटो परीक्षेच्या फॉर्मवर व मग कॉलेजच्या ओळखपत्रासाठी ठोकून दिला! कमाल म्हणजे, त्या कॉलेजच्या प्रशासनाने तो स्वीकारला सुद्धा. कदाचित तिथला ओळखपत्र विभाग सांभाळणारा कर्मचारीही याच 'जेन-झी' टोळीतला असावा. अशा प्रकारच्या व्यक्ती पुढे जाऊन शिक्षक झाले, तर आश्चर्य नाही होणार! आता शिक्षकांना लेखी सूचना द्यावी लागतेय की, "बाबांनो, फोटो म्हणजे स्टुडिओतला नीटनेटका फोटो, कुठला सेल्फी किंवा फॅन्सी थोबाड नव्हे!" आणखी एक 'डॅशिंग' नमुना बघा त्याने चक्क स्पोर्ट्स बाईकवर बसून, छपरी स्टाईलमध्ये केस पिंजारलेला अवतार फॉर्ममध्ये अपलोड केला होता. तो फोटोही आडवा ओढून लांब केला होता, त्यामुळे तो एखादा विचित्र प्राणीच वाटत होता. तो फोटो बघून फॉर्म रद्द करावा की त्या पोराच्या थोबाडीत वाजवावी, असा प्रश्न पडतो. अक्कल कुठे वापरावी हे यांना कळत नाही. एका विद्यार्थ्याला 'उत्पन्न दाखला' (Income Certificate) अनिवार्य नव्हता. ते न भरता ठेवायचे. तिथे 'Not Applicable' असं लिहायचं सोडून त्याने काय केलं? चक्क चॅट जी.पी.टी. वरून एक 'राऊंड सील' जनरेट केला, ज्यावर 'Not Applicable' असं लिहिलेलं आणि तो अपलोड केला! म्हणजे नको तिथे डोकं चालवून स्वतःची फजिती करून घेण्यात यांचा हात कुणी धरू शकणार नाही. अनेकदा फोटो व हस्ताक्षर असते तिथे दोन्ही ठिकाणी फोटोच किंवा दोन्ही ठिकाणी हस्ताक्षर अपलोड केलेले असते.

आता या पिढीचा जीव की प्राण म्हणजे 'सेल्फी'. झुकलेले खांदे बघून तो सेल्फी आहे हे समजते. पण जवळपास प्रत्येक सेल्फी 'मिररड सेल्फी' असते. आरशात जसे दिसतात तसे फोटो आपले येतात, हे कळण्याची साधी लॉजिकल बुद्धी त्यांची संपली आहेच. सॅटिंगमध्ये 'Disable Mirror Mode' किंवा 'Save as Previewed' असे पर्याय असतात, ते बंद करून मिरर मोड काढला जाऊ शकतो हे या स्मार्ट पिढीला माहीतच नसतं. परिणामी, साडीचा पदर डावीकडून उजवीकडे जातो, नाकाची नथ डावीकडून उजवीकडे फिरते, पुरुषांच्या शर्टचा खिसा उजव्या बाजूला सरकतो आणि मागे बोर्ड असला तर अक्षरे उलटी होतात.

केवळ सेल्फीच नाही, तर सामान्य फोटो सुद्धा काही लोक 'एडिट' करताना उलटे फिरवतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे राजकीय जाहिराती. वर्तमानपत्रात आधी मनोहर पर्रीकरांचे आणि आता प्रमोद सावंतांचे फोटो जाहिरातींमध्ये ‘मिररड’ छापून येतात. म्हणजे ही 'उलटी गंगा' फक्त विद्यार्थ्यांपर्यंतच मर्यादित नाही, तर समाजातही पसरली आहे.

थोडक्यात सांगायचं तर, हातातील 'स्मार्टफोन' जेवढा स्मार्ट होत चाललाय, तेवढीच ही 'जेन-झी' पिढी 'अनस्मार्ट' होत चालली आहे. तंत्रज्ञान आलं पण 'कॉमन सेन्स' मात्र गंजलेल्या पत्र्यामागे कायमचा हरवलाय!

(सूचना: या लेखात नमूद केलेले सर्व 'अतिशहाणे' नमुने आणि त्यांचे पराक्रम हे भारतातील विविध शैक्षणिक व निम-शासकीय संस्थांमधील सत्य घटनांवर आधारित आहेत. याचा उद्देश कोणत्याही एका विशिष्ट संस्थेची किंवा कॉलेजची बदनामी करणे नसून, 'जेन-झी'च्या अगाध बुद्धिमत्तेचे दर्शन घडवणे हाच आहे. यातील पात्रांशी साधर्म्य आढळल्यास तो योगायोग नसून, सद्यस्थितीतील 'डिजिटल महामारी'चा परिणाम समजावा!)


- आदित्य सिनाय भांगी, पणजी