प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वापरामुळे द्रोणांची परंपरा कमी होत आहे. प्लास्टिक शेकडो वर्षे नष्ट होत नाही. जाळल्यास ते विषारी वायू निर्माण करते. यामुळे प्राण्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. सूक्ष्म प्लास्टिक अन्नसाखळीत प्रवेश करते यामुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्य दोन्ही धोक्यात येतात.

आजच्या आधुनिक जीवनशैलीत सोयीच्या नावाखाली आपण प्लास्टिक आणि थर्माकोलसारख्या कृत्रिम वस्तूंचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. लग्नसमारंभ असो, वाढदिवस असो, उत्सव किंवा एखादी छोटीसी बैठक, सोहळा कोणताही असो, चहा-नाश्ता-जेवणासाठी वापर करून फेकून द्यायच्या पद्धतीची ताटे/ वाट्या/ पेले वापरले जातात. सोहळा संपन्न झाला की मग आसपास कुठेतरी ह्या वर्षानुवर्ष विघटन न होण्याऱ्या गोष्टींचा खच पडलेला दृष्टीस पडतो. हे पाहिल्यानंतर एक प्रश्न प्रामुख्याने उद्भवतो, पर्यावरपूरक गोष्टी उपलब्ध असूनही आपण प्रदूषणकारी गोष्टींना का प्राधान्य देतो? प्रदूषणकारक गोष्टींचा पर्यावरणावर, माणसाच्या आरोग्यावर अतिशय वाईट परिणाम होतो, हे सर्वश्रृत असतानाही माणूस पुर्णतः पर्यावरपूरकतेकडे का वळत नाही? उत्तम पारंपारीक पर्याय उपलब्ध असतानाही माणसाचा कल नेहमीच प्रदूषणकारी गोष्टींकडे का असतो? माणसाला कळत नाही की कळते पण वळत नाही?
भारतीय संस्कृतीत द्रोणांची परंपरा अतिशय जुनी आहे. नैवेद्यासाठी द्रोण व महाप्रसादासाठी पत्रावळी ही हिंदू संस्कृतीमधील फार जुनी पर्यावरणपूरक परंपरा. ही परंपरा केवळ सोयीची नव्हती, तर ती निसर्गाशी सुसंगत असलेल्या जीवनपद्धतीचे प्रतीक होती. ही परंपरा निसर्गपूजेचा एक भाग मानला जात असे. द्रोण, पत्रावळींचा वापर करणे म्हणजे पानांपासून बनवलेल्या नैसर्गिक, जैविकरीत्या नष्ट होणाऱ्या भांड्यांचा वापर करणे. हजारो वर्षांपासून लोक अन्न वाढण्यासाठी द्रोण व पत्रावळींचा वापर करत आहेत. द्रोण म्हणजे झाडांच्या पानांपासून तयार केलेली वाटी किंवा ताट. साधारणपणे पिंपळ, वड, साल, अशोक, पळस, केळी इत्यादी झाडांच्या पानांपासून हे तयार केले जातात. झाडांच्या मोठ्या पानांना एकत्र शिवून हे तयार केले जातात. ती शिवण्यासाठी बांबूच्या काड्या किंवा नैसर्गिक दोऱ्याचा वापर केला जातो. ग्रामीण भागात ही पाने नैसर्गिकरीत्या उपलब्ध असल्यामुळे सहज वापरली जात असत. पण आज 'ट्रेंड'च्या नावाखाली ग्रामीण भागातही अन्न वाढण्यासाठी सर्रास विघटित न होणाऱ्या वस्तूंचा वापर केला जातो.
प्राचीन काळात गुरुकुल, मंदिरे आणि यज्ञयागांमध्ये द्रोणांचा वापर होत असे. द्रोण मातीमध्ये सहज मिसळतात यामुळे कोणतेही रासायनिक प्रदूषण होत नाही. पूर्णपणे जैवविघटनशील, निसर्गाशी सुसंगत असलेले द्रोण बनवल्यामुळे गावातील महिलांना व कुटुंबांना रोजगार मिळतो. पारंपरिक संस्कृतीचे जतन होते व अन्न गरम असले तरी रासायनिक प्रतिक्रिया होत नाही. आजही कित्येक यात्रा व जत्रांमध्ये द्रोणातूनच भंडारा दिला जातो.आता त्याचा वापर कमी कमी होत चालला आहे.
प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वापरामुळे द्रोणांची परंपरा कमी होत आहे. प्लास्टिक शेकडो वर्षे नष्ट होत नाही. जाळल्यास ते विषारी वायू निर्माण करते. यामुळे प्राण्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. सूक्ष्म प्लास्टिक अन्नसाखळीत प्रवेश करते यामुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्य दोन्ही धोक्यात येतात. मात्र पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुन्हा एकदा द्रोणा व इतर जैवविघटनशील गोष्टींचा वापर वाढवण्याची गरज आहे. द्रोण–पत्रावळी ही केवळ भांडी नसून ती आपल्या संस्कृतीचा आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा भाग आहे. आजच्या युगात या परंपरेचे जतन व पुनरुज्जीवन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. आधुनिक सोयींच्या नावाखाली आपण निसर्गाचा ऱ्हास करत आहोत. प्रदूषणकारी का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे. आपल्या दैनंदिन जीवनात छोटे-छोटे बदल करून आपण मोठा फरक घडवू शकतो. सोय आणि स्वस्तपणा यापेक्षा पर्यावरण आणि आरोग्य अधिक महत्त्वाचे आहे. पर्यावरणाचे रक्षण करण हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. यासाठी आपण आज सजग होणे गरजेचे आहे. आपण आज सजग झालो तरच उद्याची पिढी सुरक्षित आणि निरोगी वातावरणात जगू शकेल.

- स्त्रिग्धरा नाईक, (लेखिका इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे)