एचआयव्ही बाधितांमध्ये तरुणाईचा वाढता सहभाग: एक गंभीर धोका

राज्यात जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ या दहा महिन्यांत आढळलेल्या एचआयव्हीच्या २३७ रुग्णांमध्ये सर्वाधिक बाधित (३६.८%) २५ ते ३४ वयोगटातील आहेत. १४ वर्षांत प्रथमच तरुणाईतील हा वाढता आकडा भविष्यातील गंभीर धोक्याची घंटा आहे.

Story: कॉलिंग अटेंशन |
06th December, 11:19 pm
एचआयव्ही बाधितांमध्ये तरुणाईचा वाढता सहभाग: एक गंभीर धोका

राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या नवीन अहवालानुसार, राज्यात जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांच्या कालावधीत एचआयव्हीचे २३७ रुग्ण आढळले. यामध्ये सर्वाधिक (३६.८ टक्के) म्हणजे ८४ बाधित हे २५ ते ३४ वर्षे वयोगटातील आहेत.

याआधी राज्यात २००९ ते २०२२ दरम्यान एकूण एचआयव्ही बाधितांपैकी सर्वाधिक बाधित हे ३५ ते ४९ वयोगटातील होते. मात्र २०२३ मध्ये, म्हणजे १४ वर्षांत प्रथमच सर्वाधिक बाधित हे २५ ते ३४ वयोगटातील आढळले होते. त्यानंतर २०२४ मध्ये या वयोगटातील बाधितांची संख्या कमी झाली होती. २०२५ मध्ये या गटातील संख्या पुन्हा वाढली आहे. अर्थात, वार्षिक आकडेवारी येण्यास अजून दोन महिने बाकी आहेत. असे असले तरी, एचआयव्ही बाधित तरुणांची संख्या वाढणे ही नक्कीच धोक्याची घंटा आहे.

एचआयव्ही/एड्स हा काही नवा रोग नाही. गेल्या अनेक दशकांपासून या रोगाने संपूर्ण जगाला पछाडले आहे. याबाबत सरकारी तसेच निमसरकारी स्तरावर मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. लोकांनाही हा भयावह रोग झाल्यास त्याच्यापासून सुटका नसल्याचे समजले आहे. यामुळेच मागील काही वर्षांत राज्यात एचआयव्ही बाधितांची संख्या चार पटींहून अधिक कमी झाली आहे. तरीदेखील तरुणाईमध्ये एचआयव्हीचे प्रमाण वाढणे चिंताजनक आहे. 

राज्यात जानेवारी २००९ ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान एचआयव्हीची लागण होण्याचे प्रमुख कारण असुरक्षित लैंगिक संबंध हेच होते. या कालावधीत असुरक्षित लैंगिक संबंधातून एचआयव्हीची लागण होण्याचे प्रमाण हे ९० ते ९६ टक्क्यांदरम्यान राहिले आहे.

ही आकडेवारी पाहता असुरक्षित लैंगिक संबंधांचा तरुणाईशी संबंध लावणे गरजेचे आहे. तरुणाईत वाढलेल्या एचआयव्हीसाठी विविध कारणे आहेत. भांडवली व्यवस्थेत साबणापासून पेस्टपर्यंतची जाहिरात करताना विषयवासना आणि कामभावना हेच अधोरेखित केले जाते. चित्रपट, वेब सिरीज यांतून लैंगिक संबंधांच्या दृश्यांचा भडिमार केला जात आहे. अशा परिस्थितीमध्ये तरुण पिढी साहजिकच लैंगिक संबंधाकडे आकर्षित होते. मोबाईल ही काळाची गरज आहे हे मान्य केले तरी, त्याच मोबाईलवर एका क्लिकमध्ये हजारो पॉर्न साइट्स सहजपणे उघडतात. अशा साइटवर बंदी आणली तरी आडमार्गाने त्या उघडण्याच्या युक्त्या तरुणाईला माहीत आहेत. अशा साइटचा सहज प्रवेश (Access) मिळणे हे देखील तेवढेच घातक आहे.

तरुणाईत एचआयव्ही वाढण्याचे आणखीन एक कारण डेटिंग अॅप्सचा वाढता वापर असू शकते. गेल्या पाच-सहा वर्षांत राज्यात असे अॅप वापरणाऱ्या तरुणांची संख्या वाढली आहे. अर्थात, याला डेटिंग अॅप्स असे नाव दिले तरी, त्याचे खरे नाव सेक्स अॅप्स असायला हवे. टिंडर, बंबल अशा अॅप्सच्या मदतीने अनोळखी तरुण-तरुणी एकमेकांना भेटतात, असुरक्षित शारीरिक संबंध ठेवतात. काही काळ तरुण-तरुणी या अॅपवरून नवीन पार्टनर शोधतात. मुळात अनोळखी व्यक्तींसोबत शारीरिक संबंध ठेवणे आणि कंटाळा आल्यावर नवीन पार्टनर शोधणे याच करण्यासाठी हे अॅप्स बनवले गेले आहेत. आता तर स्थानिक पातळीवरील अप्सही सुरू झाले आहेत. यांद्वारे एचआयव्ही/एड्स फोफावत आहे. चूक का बरोबर याबाबत वाद करण्यापेक्षा परिस्थिती स्वीकारून याबाबत जागृती करणे आवश्यक आहे.

एड्स नियंत्रण संस्थेतर्फे एचआयव्ही बाबत जनजागृतीचे काम मोठ्या जोमाने सुरू आहे. संस्थेतर्फे महाविद्यालयीन युवकांमध्ये जागृती केली जात आहे. बाधितांसाठी आरोग्य खात्यातर्फे चांगल्या दर्जाचे आणि मोफत उपचार केले जात आहेत. तरुणांना तसेच गरोदर महिलांना समुपदेशन दिले जात आहे. संस्थेतर्फे राज्यभरातील महाविद्यालयांमध्ये १७७ ‘रेड रिबन क्लब’ सुरू करण्यात आले आहेत. संस्थेने मागील काही वर्षांत चांगली कामगिरी केली आहे. यामुळेच २०२४-२५ मध्ये संस्थेला एचआयव्ही नियंत्रणात देशात चौथा क्रमांक मिळाला आहे. ही नक्कीच स्वागतार्ह बाब आहे. अर्थात, सर्व जबाबदारी एड्स नियंत्रण संस्था अथवा आरोग्य खात्यावर टाकून चालणार नाही. एचआयव्ही नियंत्रण करण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

तरुण मुलांच्या पालकांनी आपल्या पाल्याला विश्वासात घेऊन या गोष्टींविषयी माहिती दिली पाहिजे. या विषयाबाबत मुलांशी बोलणे म्हणजे काहीतरी चुकीचे आहे ही मानसिकता पालकांनी सोडायला हवी. कारण हा त्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. याविषयी मुलांशी बोलणे शक्यच नाही असे वाटत असेल तर समुपदेशकांची किंवा त्यांच्या शिक्षकांची मदत घेणे कधीही चांगले. टीव्ही, मोबाईलद्वारे लैंगिक संबंधाबाबत चुकीची माहिती मिळण्याऐवजी तज्ज्ञ व्यक्तींकडून मिळालेली माहिती कधीही चांगली. पूर्वी दूरदर्शनवर एड्सबाबत एक जाहिरात येत असे. 'काही मिनिटांची मजा आयुष्यभर सजा' अशी त्याची टॅगलाईन होती. असुरक्षित शारीरिक संबंध ठेवणाऱ्या सर्वांच्या मनात ही टॅगलाईन कोरली गेली पाहिजे.

एचआयव्हीपासून बचाव कसा करावा, याबद्दल तुम्ही अधिक माहिती शोधत आहात का?


पिनाक कल्लोळी
(लेखक गोवन वार्ताचे प्रतिनिधी आहेत.)