माती : जीवनाचा आधार आणि पृथ्वीचे भूषण

मृत्तिका जीवनाचा आधार असून, सर्व सजीवांचे हित साधते, असे संस्कृत सुभाषित सांगते. माती हे पृथ्वीचे खरे भूषण आहे. जीवसृष्टीला सुजलाम-सुफलाम करण्याची शक्ती मातीतच आहे, ज्यामुळे ती जीवनाचा खरा आधार ठरते.

Story: साद निसर्गाची |
06th December, 11:11 pm
माती : जीवनाचा आधार  आणि पृथ्वीचे भूषण

‘मृत्तिका जीवनाधारः सर्वभूतहितावहा’ अशा आशयाचे संस्कृत सुभाषित प्रचलित आहे. माती ही सर्वार्थाने पृथ्वीचे खरे भूषण आहे. धरती मातेला सुजलाम-सुफलाम करण्याची शक्ती असलेली माती/मृत्तिका जीवनाचा खरा आधार आहे, असे सांगणारे हे सुभाषित.

पूर्वीच्या काळी मुले मातीत खेळायची, बागडायची, रमायची, पडायची, रडायची. खेळताना पडली, कोपऱ्याला किंवा गुडघ्याला खरचटले तर माती हा जखमेवर लावण्यासाठीचा एक रामबाण उपाय होता. माती हा कीटाणू नष्ट करणारा शक्तिशाली साबण मानला जात असे. आमची पिढी तर लहानपणापासून 'मातीत रमणारा मूर्तिकार', 'संत गोरा कुंभार' यांसारख्या मातीशी निगडित असलेल्या व्यक्तिमत्त्वांच्या गोष्टी ऐकून मोठी झाली आहे. आजची नवी पिढी मात्र मातीचे मोल विसरत चालली आहे किंवा त्यांना मातीचे महत्त्व जणू माहीतच नाही. आजच्या पिढीचा समज माती म्हणजे ‘घाण’ असा होऊ लागला आहे. आधुनिक पिढीसाठी माती म्हणजे ‘डर्ट’. आजकाल लहान मुलांना सर्दी-खोकला-धुळीचा त्रास लगेच होतो. लहानपणापासून पालकांनी त्यांच्या पाल्यांचा मातीशी तोडलेला संबंध हे यामागचे कारण असल्याचे डॉक्टर सांगतात. हा संबंध पुनर्स्थापित करण्यासाठी, मातीमधील पोषकद्रव्यांचे संतुलन पृथ्वी आणि पर्यायाने येथील जैवविविधतेसाठी किती महत्त्वाचे आहे याबद्दल जनजागृती करण्यासाठी जागतिक माती दिन साजरा केला जातो.

मातीच्या संरक्षणाबाबत समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने २०१४ पासून हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून दरवर्षी ५ डिसेंबर रोजी जागतिक माती दिन साजरा केला जातो. यंदाचा जागतिक माती दिन ‘निरोगी शहरांसाठी निरोगी माती’ या संकल्पनेवर आधारित आहे. मातीचा संबंध फक्त गावाशी नसून तिचे आरोग्य जपण्यासाठी शहरांनी पुढाकार घेण्याची गरज ही संकल्पना दर्शवते. शहरातील माती निरोगी असेल तरच शहर निरोगी राहील. मातीचे संरक्षण केले तरच आपले पर्यावरण संतुलित राहील, शेती समृद्ध होईल आणि पुढील पिढ्यांना सुरक्षित आणि हरित पृथ्वी मिळेल.

जगातील सुमारे ९५ टक्के अन्न उत्पादन थेट मातीवर अवलंबून आहे. धान्य, फळे, भाज्या, औषधी वनस्पती, कडधान्ये या सर्वांची वाढ सुपीक जमिनीशिवाय अशक्य आहे. माती केवळ अन्नधान्यच निर्माण करत नाही, तर ती पावसाचे पाणी शोषून भूजलाचा साठा टिकवून ठेवते. माती झाडांना आधार देते तसेच सूक्ष्मजीव, कृमी, जीवजंतू अशा अब्जावधी नैसर्गिक घटकांचे घर म्हणूनही कार्य करते.

धूप, प्रदूषण, रासायनिक खतांचा अतिवापर, हवामान बदल यामुळे आज मातीला अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मृदा धूप, रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा अतिवापर, जंगलतोड, अतिक्रमण, बांधकामांची वाढ, पाण्याचे चुकीचे व्यवस्थापन आणि हवामान बदल ही मातीच्या ऱ्हासाची मुख्य कारणे. सुपीक जमिनीची वरची पातळी (Top Soil) तयार होण्यासाठी शेकडो वर्षे लागतात, पण आज मानवी हस्तक्षेपामुळे ती काही वर्षांतच नष्ट होत आहे. पावसाचे पाणी, पूर, किंवा वाऱ्यामुळे मातीची वरची सुपीक पातळी वाहून जाते. रासायनिक खतांमुळे मातीची नैसर्गिक सुपीकता कमी होते. मातीतील सूक्ष्मजीव मरतात आणि pH संतुलन बिघडते. अनियमित पाऊस, दुष्काळ, उष्णतेत वाढ यामुळे मातीतील पाणी आणि पोषकद्रव्ये कमी होतात. कारखान्यांचा कचरा, जड धातू, रासायनिक द्रव्ये जमिनीत मिसळल्यामुळे माती विषारी बनते. मातीची रचना बदलल्याने पिकांची उत्पादनक्षमता कमी होते आणि अन्नसुरक्षेला मोठा धोका निर्माण होतो.

आषाढी द्वादशीला फोंडा तालुक्यातील माशेलमध्ये साजरा होणारा 'चिखलकाला' मानवकुळाचा मातीशी असलेला संबंध अधोरेखित करतो. पृथ्वीचे सौंदर्य हे तिच्यावर उगवणाऱ्या झाडांमध्ये असते. झाडांना जन्म, पोषण आणि जीवन देणारी शक्ती मातीमध्येच असते. माती हीच पृथ्वीची खरी संपत्ती आहे. मातीशिवाय वनस्पती, शेती, अन्न, मानवी जीवन अस्तित्वात राहू शकत नाही.


स्त्रिग्धरा नाईक

(लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या प्राध्यापिका आहेत.)