शेजीबाई

शेजीबाई ही एक अशी व्यक्ती होती की, तिला जीवाच्या आतली गोष्ट ती विश्वासाने सांगायची. तिच्याजवळच मन मोकळे करायला मिळायचे. माहेरची, मायेची माणसं खूप दूर परंतु, ही शेजारीण कधी बहीण, तर कधी आई बनून तिची पाठराखण करायची. ती तिची मैत्रीण, पाठराखण करणारी ही होती.

Story: लोकरंग |
06th December, 11:23 pm
शेजीबाई

मनात दुःख साठलं की आपल्या सोबतीला कोणीतरी आपला माणूस असावा असं वाटत राहतं. मनाची घुसमट, तगमग, आकांत हा जेव्हा मोकळेपणाने दुसऱ्यांसमोर व्यक्त करायला मिळतो, तेव्हा कुठेतरी आतून हलकं हलकं वाटत. पूर्वीच्या काळी लोकपरंपरेतील मालनींना संसारामध्ये दुःख सहन करावे लागायचे. हालअपेष्टा, कष्ट हे तर त्यांच्या पाचवीलाच पुजलेले होते. हे सगळं करत असताना तिच्या जीवाचा जवळचा म्हणून कोणीही नव्हता. सासरची माणसं ही नेहमीच खाष्ट, रागिट. सासुरवाशिणीला कामाला जुंपणारी. शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करताना मनाची होणारी ओढाताण त्यांच्यासाठी खूपच क्लेशकारक होती. 

त्यासाठी मग त्यांची त्यांनीच या सर्वातून वाट काढली. त्यांनी हे कष्टप्रद जगणं लोकगीतातून अभिव्यक्त केले.  यासाठी जात्यावरील ओवीचा आधार तर तिला मिळालाच, त्याचबरोबर  फुगडी गीते व इतर लोकगीतांमधूनही ती व्यक्त होत राहिली. सासरचा वासा सुद्धा कसा ठसाठसा लागतो. याचे वर्णन या स्त्रियांनी केलेले दिसते. जीवनामध्ये जे भोगले सोसले आणि जे अवहेलनेचे क्षण वाट्याला आले त्यालाच त्यांनी शब्द दिला. त्यांच्या या निर्मितीने त्यांना मोकळं मोकळं केलं. 

शेजारणीचे व तिचे नाते तसे जवळचे. शेजारधर्म आपल्या परंपरेने नेहमीच श्रेष्ठ मानलेला होता. शेजारणीचा एक आश्वासक आधार तिला होता. प्रसंगी एकमेकींशी भांडायचे आणि दुसऱ्याच क्षणी सख्य जुळवून तिच्याशीच मन मोकळं करायचं. कधी काही घरामधल्या वस्तू किंवा पदार्थ कमी-अधिक झाले तर मागण्यासाठी जायचे ते शेजेच्या दारावरच. इथे कधीच अभिमान-स्वाभिमान आडवा आला नाही किंवा प्रतिष्ठेच्या खोट्या झुली पांघरून कोणी पुढे गेले नाही. सकाळी भांडण झालं तरीही दुपारी थोडीशी चहापावडर मिळेल का? या मागणीसाठी वाटी घेऊन शेजारच्या घरात गेलेली महिला सगळं काही विसरत असे. सासुरवाशिणीला सगळ्याच गोष्टींची बंधने होती. 

सासू घराची मालकीण. ती जेवढे वाढायची, तेवढेच जेवायचे. अधिक भूक लागली तर काय खायचे? हा प्रश्न प्रत्येक सासुरवाशिणीला त्याकाळी पडायचा. शेजारणीचीही अवस्था याच्यापेक्षा वेगळी नव्हती. कधी कधी शेजारणीच्या घरी जराशी जास्तीची भाजी भाकरी असायची. मग शेजारीण, दुसऱ्या शेजारणीला पानात घालून भाजी देत असे. हे खाणं घरातल्यांना चोरून दिले जायचे. परंतु थोड्याच दिवसात, जेव्हा एकमेकींचे भांडण व्हायचं तेव्हा मात्र तीच भाजी झगड्यात काढली जायची. त्या झगड्याला शब्द देऊन त्या म्हणायच्या,

शेजेन दिली भाजी
भाजी खायीली मी गुमानित
खोलो टाकीलो वाईनात ,शेजयेंन
भाजी काढली झगड्यात 

ही अशी परिस्थिती व्हायची. परंतु तरीसुद्धा दुसऱ्या वेळेला त्या दोघीही एक व्हायच्या. वेदनेचा एक समांतर धागा या शेजीबाईंच्या मना-काळजातून जायचा. आणि म्हणूनच की काय हे झगडे, द्वेष, मत्सर हा क्षणिक होता. शेजारधर्म  हा मदतीसाठी असतो हीच भावना अधिक दृढ होत जाणारी होती.

शेजारणी बाई तू हयसर ये
माका मातशी सारन दी
माझ्या बाई सारनीचे झरले हीर
माझ्यावर कोपतले थोरले दिर
शेजारणी बाई तू हयसर ये
माका मातसा  जाता दी
माझ्या बाई जात्याची झरतली काव झरतली काव
माझ्यावर कोपतली थोरली जाव... 

ही अशी यादी वाढत जाते. शेजारीण हे सर्व मुद्दाम करते अशातला भाग नव्हे. परंतु जरी ती कामासाठी जमलेली असली तरीही घरातील कोणत्याच वस्तू वरती तिचा हक्क नव्हता. म्हणूनच, शेजारणीने झाडू मागितले तरीही तिला ती सहजपणाने शेजारणीला देता येत नव्हते; कारण कुठेतरी घरातील सासू, दीर, नणंद, सासरा या सगळ्या गोष्टींकडे नजर लावून बसलेले असतात. कष्ट हे तिच्या पाचवीला पुजलेले होते. खूप भूक लागायची; परंतू मनासारखे खायलाही मिळत नव्हते. तिची अगदी घुसमट व्हायची. शरीर काम करायला तयार असायचे, परंतू पोटात अन्न नसल्याने बऱ्याच वेळेला तगमग तगमग व्हायची. मग कधी कधी जाऊबाई सुद्धा तिच्या मदतीला यायची. त्या दोघीही मिळून भाकरी घेऊन सासूला न विचारता दूर वाड्यात घेऊन खायच्या.जावेचे आणि तिचे हे सख्य खूप वेळ टिकायचे अशातला भाग नव्हे, मात्र शारीरिक कष्ट, पोटातली भूक त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.

जावेक जाव  शिकयता
घोटयेन भाकर लीपोयता
ये गे जावया वाड्यान बसान खावया
वाड्यातली भाकर गोड गे
जावेचो काढलो झोड गे 

म्हणजे एका बाजूला एकमेकांच्या मदतीने सासू-सासर्‍याला फसवून पोटासाठी म्हणून भाकरी खायची; परंतू नंतर दोघींचेही जावाजावांचे भांडण झाले की ती चोरी घरातल्यांना सांगायची. हे असे चालले होते. त्यांचे जगणे हा भावबंधाचा एक गोफ होता. मुलीचे लग्न करून दिल्याने ती जेव्हा सासरी जाते, तेव्हाच नात्यांचा एक सेतू निर्माण होतो. दोन घरे जोडली जातात. पण त्याच बरोबर शेजारधर्माचा गोतावळा सुरू होतो. हे सगळे नाते तिच्या जीवन प्रवासात अतिशय महत्त्वाचे. बाकी सगळी रक्ताची नाती तर असतातच, पूर्वी शेजारणीचं नातं हे  सासुरवाशिणीला संवेदनशील वाटायचं. ही शेजारीण तिची मैत्रीणच होती. एकमेकींची उणीदुणी काढत स्नेहभाव जपण्याचे काम या अनोख्या नात्याने केलेले आहे. प्रसंगी पडायला झाले, खरचटले, अडीअडचणीचे प्रसंग आले, कोणी आजारी पडलं, दुखले-खुपले तर अर्धी भिस्त ही शेजाऱ्यांवरच असायची. शेजीबाई ही एक अशी व्यक्ती होती की, तिला जीवाच्या आतली गोष्ट ती विश्वासाने सांगायची. तिच्याजवळच मन मोकळे करायला मिळायचे. माहेरची, मायेची माणसं खूप दूर परंतु, ही शेजारीण कधी बहीण, तर कधी आई बनून तिची पाठराखण करायची. ती तिची मैत्रीण, पाठराखण करणारी ही होती. विहिरीवर पाणी आणण्यासाठी जाताना असो किंवा नदीवर कपडे धुण्याच्या निमित्ताने असो, डोंगर चढून, डोक्यावरून लाकडाचा भारा घेऊन येताना, कुमेरी करताना, तिच्यासाठी एक आश्वासक आधार हा या शेजीबाईचाच होता. हा आधार लोकपरंपरेतील मालनींच्या संपूर्ण जीवन प्रवासासाठी पावलात बळ देणार होता.


पौर्णिमा केरकर

(लेखिका लोकसाहित्याच्या अभ्यासक,
कवयित्री आणि शिक्षिका आहेत.)