प्रेरणा

बोर्डाची परीक्षा झाली; निकाल लागला आणि शेवटचे एकदा शाळेत भेटू म्हणत सगळे जमले, तेव्हा विनयने अकरावी कविता आपल्या हस्ताक्षरात तिला पोहोचवली आणि दुसऱ्या दिवशी तो कायमचा गोव्याला जाणार हे माहीत असल्याने ती त्याला भेटायला स्टेशनवर आली.

Story: कथा |
06th December, 11:17 pm
प्रेरणा

"तुझ्या कवितांची आठवण येईल." ती त्याचा हात दाबत म्हणाली आणि त्याने चमकून वर पाहिलं.

"म्हणजे..?" त्याने विचारलं.

"अजूनही नाही कळलं ?" ती बेफिकिरीने म्हणाली.

"तुला माहीत होतं त्या मी लिहितोय ते?" त्यावर तिने नुसती हसून मान डोलावली.

"पाठवत जा... कधी सवड झाली तर आणि हो‌, लिहीत राहा... छान लिहितोस तू." ती म्हणाली आणि गाडीचा भोंगा वाजला.

त्याने अलगद तिच्या हातात दिलेला हात सोडवून घेतला आणि ती खिडकीपासून दूर झाली. दोघांनी एकवार एकमेकांकडे पाहिलं; दोघांचेही डोळे भरले होते. ही शेवटची भेट ही खूण दोघांच्या मनात बांधली गेली होती म्हणूनच की काय, आसवं पापण्यांचा बांध ओलांडून गालावरून ओघळती झाली होती.

"या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता.." शारदा विद्यामंदिरात प्रार्थनेचे धीरगंभीर स्वर उमटले. प्रार्थना झाली आणि सगळी मुलं रांगेत वर्गात आली. लिमये मॅडमनी शिकवायला पुस्तक हातात घेतलं, तोच पित्रे सर एका मुलाला घेऊन वर्गात आले.

"मॅडम, तुमच्या शिकवण्यात थोडा व्यत्यय आणतोय, माफ करा." ते म्हणाले.

"नाही नाही सर, तसं काही नाही." मॅडम आदराने म्हणाल्या.

"मुलांनो, हा विनय कामत; तुमचा नवीन दोस्त. हा तीन महिने उशिराने दाखल होतोय, कारण नुकतेच त्याचे बाबा गेले. त्यामुळे अचानक त्याला त्याच्या घरून इथे शिक्षणासाठी यावं लागलं. पण तो उशिरा आला म्हणून त्याला दूर लोटू नका, तुमच्यात सामावून घ्या." सरांनी सांगितलं.

सगळ्या मुलांनी माना डोलावल्या. विनय तिसऱ्या ओळीतल्या दुसऱ्या रांगेतल्या बाकावर चिन्मयशेजारी जाऊन बसला.

विनयचा नवा प्रवास सुरू झाला. गोव्यात आपल्या आई-बाबांसोबत राहणारा विनय कामत. त्याचे बाबा जवळच्याच फॅक्टरीत कामाला होते; डेंग्यूचं निमित्त झालं आणि ते अचानक वारले. त्यांची फार काही संपत्ती नव्हती, पण घर, चार-सहा माडांचं कुळागार आणि दोन एकर जमीन एवढाच काय तो डोलारा. बाबा गेले, तेव्हा तो नुकताच सातवीत गेला होता, पण अचानक हे अरिष्ट आल्यामुळे आईने त्याला मामाकडे पुण्याला ठेवण्याचा निर्णय घेतला. बाकी काही त्रास नसला तरी ऐन वेळी महिन्याला येणारी मिळकत बंद झाल्याने, त्याच्या शिक्षणासाठी तिला कठोरपणे तो निर्णय घ्यावा लागला.

विनय तसा मुळातच शांत आणि मितभाषी. किंचित सावळा, तब्येतही यथातथाच. त्यात त्या घटनेपासून तर तो अधिक अबोल बनला. अभ्यासात फार नसला तरी गरजेपुरती प्रगती होती त्याची. तो घरात आणि बाहेर सगळ्यांशी जेवढ्यास तेवढं बोले, त्यामुळे त्याला मित्रही मोजून दोन-चार होते.

दोन वर्षं लोटली; विनय नववीत गेला. आता तो पुण्याला आणि शाळेतल्या वातावरणाला सरावला होता.

"विन्या... मला एक कविता लिहून हवीये." शिरीष त्याच्या गळ्याभोवती हात टाकत म्हणाला.

"मला कुठं येते कविता-बिविता.." विनयने खांदे उडवले.

"काल तुझ्या भूगोलाच्या पुस्तकात सापडला मला चिटोरा. छान होती; आवडली मला. म्हणून तूच लिहून दे आता." शिरीष त्याच्यासमोर कागद नाचवत म्हणाला.

"अरे ते असंच खरडलं होतं मी काही तरी. आण दे.." म्हणत त्याने तो कागद त्याच्या हातून खेचला.

"काय रे तू किती भाव खातोस.. दोस्तासाठी एवढंही करू नयेस..?" शिरीष काकळूतीला आला होता.

"बरं बाबा.. हरलो.. बोल कशावर लिहू?"

"प्रेमावर..!" शिरीष म्हणाला आणि विनय नखशिखांत शहारला.

"काय? कोण.. कोणासाठी?" त्याने लडबडत विचारलं.

"ती आपल्या वर्गातली निलिमा उपाध्ये. मला फार आवडते ती.. तिच्यासाठी लिहायचीये कविता."

"अरे पण तिने सरळ बाईंना दाखवली तर पंचाईत व्हायची ना.. नको रे बाबा, नसती उठाठेव उगीच अंगलट यायची. पुढच्या वर्षी मॅट्रिकचं वर्ष आहे आपलं. काही भानगड झाली तर मामांना काय तोंड दाखवू?" विनय भडाभडा बोलला.

"काही होत नाही आणि मुलींना आपली स्तुती आवडते वेड्या. आणि माझी निलू खूप साधी आहे अरे, वेडेपणा नाही करायची. आणि तुला एवढं वाटत असेल तर तू लिहून दिल्यावर मी माझ्या अक्षरात पुन्हा लिहीन आणि तिला देईन, म्हणजे तुझं नाव येणार नाही. मग तर झालं." शिरीषचा ठाम निश्चय होता.

"ए बाबा.. अजून कशात काही नाही आणि तू आपलं माझी निलूवर घसरतोयस. सांभाळून हं..." म्हणत शेवटी विनयने होकार दिला. त्यानंतर त्याने आयुष्यातली पहिली प्रेमकविता लिहिली; निलिमा उपाध्येला स्मरून!

पहिली कविता तिच्यापर्यंत पोहोचली आणि शिरीषने सांगितल्याप्रमाणे ती शांत राहिली. पण नेमकं का हे विनयलाही समजलं नाही. तिचा प्रतिसाद येईपर्यंत तिला कविता देत राहीन म्हणत शिरीषने विनयकडून दहा कविता लिहून घेतल्या. पण उत्तर नाहीच. शेवटी शिरीष कंटाळून थांबला आणि मॅट्रिकचं वर्ष उजाडलं नि सगळे अभ्यासाला लागले. विनयही जीव तोडून अभ्यास करत होता, त्यामुळे कविता पुराणाला पूर्णविराम मिळाला.

बोर्डाची परीक्षा झाली; निकाल लागला आणि शेवटचे एकदा शाळेत भेटू म्हणत सगळे जमले, तेव्हा विनयने अकरावी कविता आपल्या हस्ताक्षरात तिला पोहोचवली आणि दुसऱ्या दिवशी तो कायमचा गोव्याला जाणार हे माहीत असल्याने ती त्याला भेटायला स्टेशनवर आली.

"अक्षर शिरीषचं असलं तरी तो त्या कविता लिहिणं शक्य नव्हतं, म्हणून मी त्याला प्रतिसाद दिला नाही. कालच्या कवितेवरून तुझं अक्षर ओळखलं आणि मग मला या सगळ्याचा उलगडा झाला. खरं सांगते, खूप छान लिहितोस तू.. असाच लिहीत राहा.." बोलता बोलता तिला भरून आलं.

पंचवीस वर्षं झाली आता त्या गोष्टीला, पण आजही त्याला ती टक्क आठवते. शिरीषला कविता लिहून देता देता खरं तर तोच निलूच्या प्रेमात पडला होता, तेच सांगणारी ती शेवटची कविता होती. पण त्या दिवशी स्टेशनवर मनात असूनही ते शक्य नाही हे निलिमा डोळ्यांतून सांगून गेली आणि विनयनेही तिला निदान कवितेतून तरी सदैव जवळ ठेवण्याचा निर्धार केला.

वडिलांचं स्वप्न म्हणून विनय वकील झाला, पण निलिमाने मागितलेली एकमेव गोष्ट देण्यासाठी तो वेळात वेळ काढून लिहिता राहिला; त्याच्या कवितेमधून निलिमा नेहमीच डोकावत राहिली. त्याचे चार-दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले, पण आता तो आयुष्यात इतका पुढे निघून आला होता की मागचे सगळे संपर्क तुटले होते. पण तरीही कधी कधी कविता लिहिताना विनयच्या डोळ्यासमोर नववीतल्या कोवळ्या प्रेरणेची मूर्ती तरळून जायची आणि त्याचे डोळे ओलावायचे..!


अनु देसाई
७७६८९८४००३