भारतीय नौदलात २६ वर्षं देशसेवा केल्यानंतर गोव्याच्या राजकारणात सक्रिय झालेले कॅप्टन विरियाताे हिपोलिटो दा मेंडोन्सा फर्नांडिस यांचे जीवन शौर्य, सचोटी आणि निस्वार्थ समर्पण याचे प्रतीक आहे. कारगिल युद्धातील ‘ऑपरेशन तलवार’ मध्ये महत्त्वाचा सहभाग घेतल्यानंतर, त्यांनी आपले लष्करी मूल्ये आणि अनुभव गोव्याच्या लोकसेवेत प्रभावीपणे वापरले.

बार्देशमधील अस्नोडा येथे जन्मलेले कॅप्टन फर्नांडिस यांचे बालपण देशभक्तीच्या कथा ऐकत गेले. १९७१ चे चीन युद्ध आणि गोव्याच्या मुक्ती संग्रामातील सैनिकांचे शौर्य त्यांना सतत प्रेरणा देत राहिले. याशिवाय, हंगेरीतील जुलमी राजवटीविरुद्धचे बंड आणि चीनमधील तियानमेन स्क्वेअर निदर्शनांसारख्या जागतिक घटनांनी त्यांच्या किशोरवयीन मनात नकळतपणे देशसेवेची आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची भावना रुजवली. याच विचारातून, गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण पूर्ण झाल्यावर, त्यांनी भारतीय नौदलात सामील होण्याचा निर्णय घेतला.
नौदल भरतीचा अविश्वसनीय योग
नौदल भरतीची त्यांची कहाणी एखाद्या फिल्मी पटकथेसारखी आहे. अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात, मंडल आयोगाच्या आंदोलनामुळे त्यांना गोव्याला परत पाठवले गेले. त्याच वेळी कॅम्पसमध्ये नौदल अधिकाऱ्यांसाठी मुलाखती सुरू होत्या. बॅडमिंटन प्रॅक्टिसवरून परतलेल्या फर्नांडिस यांना मित्रांच्या आग्रहामुळे मुलाखतीसाठी जावे लागले, पण वेळेमुळे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. मात्र, अविश्वसनीय योगायोग असा की, मुलाखत घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी संख्या जुळवण्यासाठी त्यांना परत बोलावले. आत्मविश्वास आणि तत्कालीन राजकीय परिस्थितीवर स्पष्ट मते मांडल्यामुळे त्यांची निवड झाली. भोपाळ येथील खडतर SSB (सेवा निवड मंडळ) मध्ये त्यांनी 'जर तुम्ही माझी निवड केली नाही, तर तुम्हाला कळेल की तुम्ही एक चांगला सैनिक निवडला नाही' असे आत्मविश्वासपूर्वक सांगून, एकट्याने निवड मिळवली आणि १५ सप्टेंबर रोजी नौदलात आपला प्रवास सुरू केला.
कारगिलमधील शौर्य: 'ऑपरेशन तलवार'
मरीन इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर आणि एव्हिएशनमध्ये गेल्यानंतर, १९९९ मध्ये कॅप्टन फर्नांडिस कोचीन येथील INS गरुड येथे अभियांत्रिकी अधिकारी म्हणून कार्यरत होते. याच काळात कारगिल युद्ध सुरू झाले. कॅप्टन फर्नांडिस हे भारतीय नौदलाच्या 'ऑपरेशन तलवार' चा भाग होते. या ऑपरेशनमध्ये भारतीय नौदलाने पाकिस्तानी व्यापारी मार्ग रोखून कराची बंदराची यशस्वी नाकेबंदी केली. त्यांनी सी हॅरियर्स, डोर्नियर अशा अनेक विमानांवर काम केले. नौदलानी दाखवलेले शौर्य आणि कॅप्टन विक्रम बत्रा, कॅप्टन मनोज कुमार पांडे यांच्यासारख्या शूरवीरांचे बलिदान त्यांच्यासाठी अविस्मरणीय प्रेरणा ठरले. त्यांना 'ऑपरेशन विजय स्टार' आणि 'ऑपरेशन विजय मेडल' ने सन्मानित करण्यात आले.
राजकारण: शिस्तबद्ध लोकसेवा
भारतीय नौदलात २६ वर्षांची दिमाखदार सेवा कॅप्टन म्हणून पूर्ण केल्यानंतर, त्यांनी गोव्याच्या लोकसेवेत उतरण्याचा निर्णय घेतला. नौदलाने दिलेले कठोर प्रशिक्षण आणि नैतिक मूल्यांची शिदोरी सोबत घेऊन ते राजकारणात आले. नौदल सोडून राजकारणात आल्यावर त्यांना खात्री होती की नौदलामुळे 'माणूस एक मजबूत व्यक्ती म्हणून घडतो'.
राजकारणात त्यांनी गोव्याचा आवाज बनून भ्रष्टाचार, पर्यावरणाचा ऱ्हास आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. त्यांची स्पष्टवक्तेपणा आणि सचोटी पाहून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्या कामाची प्रशंसा केली आणि त्यांना महत्त्वाच्या संरक्षण समितीवर नियुक्त केले. अलीकडेच ते दक्षिण गोव्यातून लोकसभेवर निवडून आले आहेत.
कॅप्टन फर्नांडिस यांचा ठाम विश्वास आहे की, देशाची सेवा करणे हेच सैनिकाचे कर्तव्य आहे. त्यांच्या मते, 'आवड, सचोटी आणि नैतिक मूल्ये' हेच एका चांगल्या सैनिकाचे आणि लोकप्रतिनिधीचे खरे गुण आहेत. नौदलातील शिस्त आणि देशसेवेचे हे मूल्य त्यांनी राजकारणात आणले आहे आणि ते गोव्याच्या तसेच देशाच्या राजकारणात एक महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.

जॉन आगियार
+ ९१ ९८२२१५९७०५