निसर्ग संवर्धनाचा पितृपक्ष

पूर्वज निसर्गाला केवळ संसाधन म्हणून पाहत नसत, तर आदराने त्याची पूजाही करत असत. त्यांच्या जीवनशैलीत पर्यावरण संरक्षण ही एक अंगभूत संकल्पना होती. वृक्षांना देवता मानून त्यांची पूजा केली जाई.

Story: साद निसर्गाची |
11th October, 11:25 pm
निसर्ग संवर्धनाचा पितृपक्ष

हिंदू पंचांगानुसार आपण नुकताच पितृ पंधरवडा पाळला. दरवर्षी भाद्रपद पौर्णिमा ते अश्विन अमावस्येपर्यंत पितृपक्ष पाळला जातो. पूर्वजांप्रती श्रद्धा, कृतज्ञता आणि स्मरणभावना व्यक्त करण्याचा हा कालावधी. या काळात श्राद्ध, पिंडदान अशा प्रकारचे धार्मिक विधी केले जातात. पितृपक्षाचा धार्मिक पैलू सर्वश्रृत आहे, पण या पंधरवड्याचा पर्यावरणीय पैलू मात्र  बहुतेक जणांना माहीत नसावा. पितृपक्ष फक्त धार्मिक मूल्यांशी नव्हे तर सामाजिक, नैतिक आणि पर्यावरणीय मूल्यांशीही संबंधित आहे.  

पितृपक्ष आपल्याला निसर्गाचा आदर करायला शिकवतो. तुम्ही विचाराल कसं? पितृपक्ष हा निसर्गाशी  संबंधित पारंपरिक काळ आहे. पितृपक्षात श्राद्धकर्म केले जाते. कित्येक विधी बहुतेकवेळा घाटावर/नदीकिनारी पार पाडले जातात. यातून पाण्याच्या स्रोतांबद्दल असलेली आदरभावना व मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व अधोरेखित होते. नदीपुजनाद्वारे पाण्याच्या स्रोतांचे सांस्कृतिक रक्षण घडते.

पिंडदानानंतर हे पिंड कावळ्यांना, श्वानांना, गोमातेला किंवा माशांना अर्पण केले जातात. वन्यजीवांना अर्पण केलेले पिंड मानव-वन्यजीव सह-अस्तित्व अधोरेखित करतात. या काळात गाईला दिलेले अन्न आपल्याला तिच्या कर्तृत्वाची आठवण करुन देते. पितृपक्षात कावळ्याला पितरांचा दूत मानला जातो. या काळातील कावळ्याचे स्थान मानव आणि पक्ष्यांमधील नाते अधोरेखित करते. जलाशयात केलेले पिंडदान जलजीवांसाठी अन्न ठरते. पितृपक्षात विधींसाठी मर्यादित स्वरूपात जलाचा वापर केला जातो. मर्यादित स्वरूपात केलेला वापर अपव्यय टाळण्याचा संदेश देतो.

पितृ पंधरवडा हा प्रामुख्याने निसर्ग संवर्धनाशी निगडित असतो हे दर्शविणारे आणखीन एक उत्तम उदाहरण म्हणजे या काळात अळ्यांच्या संवर्धनावर दिलेला भर. धार्मिक श्रद्धेनुसार, या काळात पितरं (पूर्वजांचा आत्मा) सुरवंटांच्या स्वरूपात पृथ्वीवर येतात असं मानल जातं. विशेषत, पितृपक्षात सुरवंटांना मारू नये, फुलपाखरांना त्रास देऊ नये, असा धार्मिक नियम पाळला जातो (कारण सुरवंट वाचली तरच फुलपाखरु जन्माला येईल.)

फुलपाखरु हा परिसंस्थेतील जरी छोटासा जीव असला तरी तो अन्नसाखळीतील एक महत्त्वाचा घटक आहे. फुलपाखरं परागसिंचनासारखं महत्त्वाचं काम करतात. ऑगस्ट ते नोव्हेंबर हा फुलपाखरांच्या जीवनचक्राचा महत्त्वाचा काळ. या काळात आपल्याला भरपूर सुरवंट पाहायला मिळतात. मला आठवतं, आमच्या शेजारी एक आजोबा होते. निरफणस, चिकू, केळी, धालीया, जाई-जूई, सोनचाफा, गुलाब यासारख्या विविध फळ-फुलझाडांनी बहरणारी त्यांची भलीमोठी बाग होती. आजोबांना किडया-मुंग्यांची भारी चीड. हे कीटक झाडांची पाने खाऊन झाडांचा विध्वंस करतात म्हणून मागचा-पुढचा कसलाच विचार न करता ते नजरेस पडेल त्या किड्याला ठार मारायचे. पितृपक्षात मात्र ते किड्यांच्या अजिबात वाटेला जात नसत. विचारलं तर त्यांच एकच उत्तर असायचं “किडे म्हणजे पितरं. पितृपक्षात त्यांना मारू नये. पितृपक्षात त्यांना ठार केलं तर पितरं नाराज होतील व  त्यांचा कोप होईल”. मला त्यांच्या त्या उत्तरचा अर्थ कधीच कळला नाही. एरवी किडया-मुंग्यांना सर्रासपणे ठार मारणारे आजोबा चक्क न दिसणाऱ्या पूर्वजांना घाबरतात? त्यावेळी माझ्या बालमनाला ‘पितरं म्हणजे नक्की काय?’, ‘किडे कसे-काय माणसांचे पूर्वज असू शकतात?’ वगैरे असंख्य बालिश प्रश्न पडायचे, पण शेवटी सगळे अनुत्तरितच राहायचे. 

आज त्यामागचं कारण समजतं. खरंतर आपल्या पूर्वजांच्या बुद्धी चातुर्याची जितकी स्तुती करावी तितकी थोडीच. सर्वोच्च हंगामाच्या काळात सुरवंटांना मारू नये, सुरवंटे व पर्यायाने फुलपाखरांचे संरक्षण व्हावे ह्याच हेतूने पूर्वजांनी लढवलेली ही नामी शक्कल. ‘सुरवंट म्हणजे पितरं. पितरं म्हणजे पूर्वज’! व्वा ! काय युक्ति होती. 

पूर्वजांचे विचार किती पर्यावरणपूरक होते ह्याची यावरून प्रचिती येते. पूर्वज निसर्गाला केवळ संसाधन म्हणून पाहत नसत, तर आदराने त्याची पूजाही करत असत. त्यांच्या जीवनशैलीत पर्यावरण संरक्षण ही एक अंगभूत संकल्पना होती. वृक्षांना देवता मानून त्यांची पूजा केली जाई. गोमाता, नदी, पर्वत, झाडे आणि जमीन यांच्यात दैवत्व पाहून त्यांचं संरक्षण केलं जाई. सण-उत्सवांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक मूल्यांचं पालन केलं जाई. आपल्या पूर्वजांची सेवा ही केवळ पिंडदानात नसून पृथ्वी व निसर्गाच्या रक्षणार्थ आहे हे एकविसाव्या शतकातील आधुनिक पिढीला कधी ज्ञात होईल का?

(लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या प्राध्यापिका आहेत.)


- स्त्रिग्धरा नाईक