स्मरणशक्ती...

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
11th October, 11:15 pm
स्मरणशक्ती...

स्मरणशक्ती म्हणजे आपण वाचलेले, पाहिलेले किंवा ऐकलेले लक्षात ठेवून, योग्य वेळी आठवण्याची क्षमता. आपल्याला रोज वेगवेगळे विषय स्मरणात ठेवावे लागतात. स्मरणशक्ती चांगली असेल तर परीक्षेत चांगलं यश आपण मिळवू शकतो. शाळेत शिकत असताना आपल्याला अनेक विषय समजून घ्यावे लागतात, वेगवेगळ्या कविता, श्लोक इ. पाठ करायचे असतात, नवनवीन शब्द आठवून निबंध, पत्रलेखन करायचे असते. आणि या सगळ्या गोष्टी नीट होण्यासाठी बुद्धी आणि स्मृति तल्लख पाहिजे. त्या तल्लख होण्यासाठी आपण काही सोपे उपाय आज बघुया. 

१. पाठांतर करताना पाठ सरळ करून बसावे. पोंग काढून बसणे, सोफ्यावर किंवा जमिनीवर लोळत वाचणे, पाठ करणे टाळावे. 

२. अभ्यासात अडथळा आणणाऱ्या गोष्टी टाळा उदा. मोबाईलवरचे गेम्स, इंस्टाग्राम रील्स , फेसबुक, टी व्ही सिरियल इ.

३. रात्री पुरेशी  झोप घ्या. किमान ७ तास शांत झोप झाली पाहिजे.  त्यामुळे शरीर व मनाला विश्रांती मिळते, मनाची एकाग्रता वाढते. 

४. एकाग्रता वाढवणारी आसनं रोज थोडा वेळ करा. उदा. वृक्षासन, सेतूबंधासन, बालासन, गरुडासन, पद्मासन, शवासन. 

५. रोज अनुलोम विलोम व भ्रामरी प्राणायाम करा. 

६. बुद्धिवर्धक आहार सेवन करा -

  जेवणात साजूक तुपाचा वापर नियमित करा. 

 लाह्या भाताच्या किंवा ज्वारीच्या वेगवेगळ्या पदार्थांच्या स्वरूपात सेवन करा. कारण लाह्या बुद्धी वाढवणाऱ्या आहेत. 

 कोहळ्याचे वेगवेगळे पदार्थ खा. 

 भूक चांगली असेल तर दिवसाला बदाम - २ किंवा अक्रोड - २ चावून खावे. 

७. प्रज्ञाविवर्धन स्तोत्र रोज म्हणा.

८. अभ्यास किंवा पाठांतर करण्यासाठी वेगळी जागा ठेवा, ती जागा स्वच्छ, नीटनेटकी , इतर गोष्टींचा त्रास होणार नाही अशी असावी. 

९. बुद्धी व स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदातील सुवर्णप्राशन सुद्धा खूप उपयुक्त आहे बरं. आपल्या जवळच्या वैद्यांना भेटून सुवर्णप्राशन सुरू करा. 

१०. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकारात्मक रहा. माझा अभ्यास छान होत आहे, पाठांतर पण नीट होतंय. मला परीक्षा देताना सगळं व्यवस्थित आठवणार अशा सूचना आपल्या अंतर्मनाला द्यायला विसरू नका. 

 लक्षात ठेवा — उत्तम स्मरणशक्ती व तल्लख बुद्धी चांगल्या सवयींचं फळ आहे.

दररोज थोडा प्रयत्न करा, नीट झोप घ्या, पौष्टिक आहार घ्या आणि अभ्यास मनापासून करा.

तुमचं मन शांत, शरीर निरोगी आणि विचार सकारात्मक असतील तर नक्कीच तुमची बुद्धी आणि स्मृती दोन्ही उत्तम असतील.


- वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य