परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवला की आपल्या बऱ्यावाईटाची काळजी आपल्यापेक्षा त्याला जास्त असते. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे चांगुणा आणि चिलया बाळाची गोष्ट. देव त्यांचीच परीक्षा घेतो ज्यांच्यामध्ये परीक्षा देण्याचे बळ असते.
भारतीय संस्कृती तत्त्वावर आधारलेली आहे. दारी आलेल्या याचकाला रिकाम्या हाताने जाऊ न देणे ही आजवरची परंपरा आहे. रावणाने या तत्त्वाचा गैरफायदा घेतला आणि सीतेचे हरण केले. पण दृष्टवृत्तीच्या रावणाचा वध हे या अपहरणामागचे मुख्य ध्येय होते. पुराण काळातील प्रत्येक उदाहरणांमध्ये घडलेल्या प्रत्येक पुराणकथेमागे कोणते ना कोणते सुप्त ध्येय दडलेले असते. अशीच एक पुराणातली कथा चांगुणा माता आणि तिचा चिलिया पुत्र घरणीबाईने आपल्या ओवीमधूनही चित्रित केला आहे.
सधन घरातील चांगुणा आपले सत्व जपून होती. दारी आलेल्या प्रत्येक याचकाची रिकामी झोळी भरून ती त्या याचकाला तृप्त करून पाठवायची. चांगुणाची ही दानशूर वृत्ती महादेवांच्या कानापर्यंत पोहोचली. चांगुणा महादेवांची परम भक्त होती. महादेवांच्याच कृपेमुळे तिच्या पोटी चिलिया सारखा गुणी बाळ जन्मला होता. आपल्या एकुलत्या एका चिलिया बाळामुळे चांगुणाला मातृत्वाचा आनंद घेता येत होता. अशा या चांगुणाची सत्वपरीक्षा घेण्याची इच्छा महादेवांना झाली. महादेवाने एका साधकाचे रूप धारण केले. काखेला झोळी लावली, हातात जलपात्र घेतले आणि चांगुणाच्या घरी उभे ठाकले.
खाके राहिली झोळी घे हाती घेतला पात्र
गुरुबाबा चालले मेट्या मारगान
हिंडत गेलो गे चांगुनीच्या वाड्या
घरातले बाई गे घरा कोण हाई
महादेव अशी वेळ साधून गेले होते की ज्यावेळी चांगुणा कामात गुंतली होती. त्यामुळे पहिल्या हाकेसरशी चांगुणाला दरवाजापर्यंत पोहोचता आले नाही. त्यामुळे गुरुबाबा क्रोधित झाले.
भिक्षा भिक्षा म्हणान हाक मारीलो
मियां सुपाचे अडणी तीळ काय तानुळ
चांगुनी घेऊन आली
मीयाई गुरुबाबा कांडीत होतू
तिया त्या कांडपा भायरी जागे
सुपाचे आढणी तीळ काय तांदूळ
चांगुनी बाई काय भिक्षा घेऊन आली
गुरुबाबा काही क्षण तिष्ठत उभे राहिले याचे चांगुणाला फार वाईट वाटले. तिने मनोभावे गुरुबाबांची माफी मागितली. कांडण्याच्या कामात व्यस्त असल्या कारणामुळे ऐकू आले नाही असे सांगून क्षमा याचना करत सुपभर तीळ आणि तांदूळ देऊ केले. पण क्रोधित झालेले गुरुबाबा त्या तांदळाचा आणि तिळांचा स्वीकार करत नाहीत.
आपल्याला इतका वेळ तिष्ठत ठेवून ही असली भिक्षा देत आहे म्हणून क्रोधित झाले. अशावेळी चांगुणेने आपल्याला कोणत्या प्रकारच्या भिक्षेची अपेक्षा आहे अशी विचारणा केली. आणि गुरुबाबांनी जे शब्द उच्चारले त्या शब्दांऐवजी आपल्या कानात शिसा का ओतला नाही असे चांगुणेला वाटले कारण गुरु बाबाने तिच्या एकुलत्या एका लाडक्या पुत्राचे चिलिया बाळाचे मटण खाण्याची इच्छा व्यक्त केली.
तसली भिक्षा काय आम्हा नको नारी
चील्लयो बाळ गे दि भोजनक
एक माझा ताना गे एक माझा बाळ
कसाया देऊ काय भोजनक
ही अघोरी इच्छा ऐकताच चांगुणेला धरतीने दुभंगून आपल्याला पोटात घेतले तर बरं होईल असे वाटले. ती काकुळतीला येऊन म्हणाली की एकच माझा तन्हुला बाळ, तो तुमच्या भोजनाच्या ताटात कसा काय वाढू? ही इच्छा सोडून भले माझे प्राण जरी मागितले, तरी शीर काढून तुमच्या ताटावर ठेवते पण अशी काही मागणी करू नका.
पण चांगुणाची सत्वपरीक्षा घ्यायला आलेले गुरुबाबा तिच्या या आक्रोशाला जुमानले नाही. मी मागितलेलीच भिक्षा तुला द्यावी लागेल. ती जर तू दिली नाहीस, तर मी तुझ्या ह्या दारावरच माझी ही झोळी फाडून टाकेन. माझ्या साधनेच्या सर्व शक्ती ज्या मी या जटांमध्ये साठवून ठेवलेल्या आहेत, त्यात जटा इथेच तोडून तुझे घर भस्मसात करीन. तुझे सगळे सत्व हरण करीन ज्याच्या बळावर तू हे राज्य चालवीत आहेस.
दितय तर दि गे चांगुने
तुजा गे दारावर झोळी पिंजन
झोळी पिंजीन गे जटा तोडीन
सगळा तत्व हरान
चांगुणाची परिस्थिती इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली. अशावेळी गुरुबाबांना तिथेच बसायला सांगून ती कोंबड्या घेऊन आली. कोंबड्याचे मशा म्हणजेच मटन रांधले. गुरुबाबांसाठी आंघोळीला पाणी काढले. आणि गुरुबाबांना विनवले की आंघोळ करून तुम्ही जेवणाला बसा.
मशा रांजण झालेला आहे.
गेली गे वयल्या वाड्या
हाडिल्यो कुकडा सांगडी
कुकडाचा मशा रानीला
उठा उठा गुरुबाबा शिरताळ झाले
चिराबंदी न्हाणेगे त्या तापायला पाणी
उठा उठा गुरुबाबा आंघोळ करा
आंघोळ करा का भोजन यया
कसला मत्स्य रानिला
कुकडाचा माश्य रानीला
गुरुबाबाने साशंक होऊन कसले मटन रांधले आहेस अशी विचारणा करताच सत्ववादी चांगुणेने खरे खरे सांगितले की कुकडाचे म्हणजेच कोंबड्याचे मटण बांधले आहे. गुरुबाबांनी हे भोजन जेवण्यास नकार दिला आणि पुन्हा सांगितले की आपण जेवणार असेल तर तुझ्या चिलिया बाळाचे मटण नाहीतर इथे झोळी फाडून जटा तोडून तुझे सत्वहरण करून मी निघून जाईन ज्याच्यामुळे तुझ्या राज्याची लयाही निघून जाईल.
तसला मशा गे आम्हा नको नारी
चिलय बाळगे दि भोजनाक
एक माझा तानाजी एक माझा बाळ
दितय य तर दिगे चांगुने
तुझ्या घे दारार झोळी पिजिन
झोळी पिजिन गे जटा तोडून
सगळा तत्त्वा हरीन
आता एका बाजूला चांगुणीचे राज्य, तर दुसऱ्या बाजूला नाजूक चिलया बाळ जो तिच्या काळजाचा तुकडा होता. पण राज्याच्या रक्षणासाठी चांगुणाने आपल्या या काळजाच्या तुकड्याचा वध करून त्याचे मटण गुरुबाबांच्या पानावर वाढण्याचा निश्चय घेतला.
मातीन धरीला गे पित्यान वरील
शीर काढून थेयला शिर्केवरी
मधल्या लोण्याचा मच्छ कुटला
तेला तूपावरी गे हिंगमिठावरी
हिंगाया मिठाची तळणी दिली
बाळाचा मशा गदगद्या शिजे
बाळाची माता काय ढळढळ्या रडे
बाळाचो पिता का मनी तो मनी रडे
चांगुणेने बाळाला घट्ट धरले. पित्याने बाळाचे खटल्यावर ठेवून शिर कापले. तो घाव चिलया बाळाच्या शरीरावर नव्हे, तर चांगुणा आणि तिच्या पतीच्या मनावर होत होता. शेवटी बाळाच्या झाडाचे मटण रांधण्यात आले. आपल्या बाळाचे शीर कुशीत घेऊन चांगुणा धाय मोकलून रडली. मातेला धाय मोकलून रडता येते. पित्याला मात्र आपली आसवे मनातल्या मनात गिळावी लागतात. आठवण म्हणून ते शीर तसेच जपून ठेवले. आणि गुरुबाबांच्या जेवणाची तयारी केली.
चिरेबंदी न्हाणी गे तापेयला पाणी
उठा उठा गुरुबाबा आंघोळ करा
आंघोळ करा काय भोजना जया
कसला मश्या रानिला
मधला लोण्याचा मशा रानीला
बाळाचा मशा गदगद्या शिजे
बाळाची माता काय ढळढळ्या रडे
बाळाचो पिता काय तो मनी रडे
चिरेबंदी न्हाणी गे तापेयला पाणी
उठा उठा गुरुबाबा आंघोळ करा
आंघोळ करा काय भोजना जया
भोजनाची व्यवस्था झाल्यावर गुरुबाबांनी विचारणा केली की कशाचे मटन केले आहे? चिलिया बाळाचे मटन रांधले आहे असं म्हटल्यावर गुरुबाबा उठले. आपल्याबरोबर तुम्ही उभयतांनी जेवावे अशी इच्छा व्यक्त केली. आपल्याच बाळाचे मटण आपण खाणे ही राक्षसी वृत्तीलाही लाजवेल अशा प्रकारची क्रूरता होती. गुरु बाबांच्या हट्टापोटी तिने तीन ताटे वाढली. वाढलेली तीन पाने पाहून गुरुबाबांनी चौथे पान करण्याची आज्ञा केली. पण आपण फक्त तीन माणसे असल्याकारणाने चौथे पान कोणासाठी? असे चांगुणाने विचारले. पण उत्तरादाखल गुरुबाबांनी फक्त तिला एवढेच सांगितले की बाहेर अंगणाबाहेर जाऊन चिलया बाळ म्हणून हाक मार.
करगे चारीया पान
चारीय पान गे कोणा गुरू बाप्पा
कर म्हटल्या कर चांगुनी
चलगे खळ्या बाहेर
चिलया बाळ म्हणान सादगे घाल
पयलो शब्द आकाशी गेलो
दुसरा शब्द असतो गेलो
चिलय बाळगे धावान आलो
अरेरे खुय असले बाळा
गुडगुडी अडलूय थय माते पडलूय
मातेचे शब्द आयकन धावन येयलूय
आता घे खुशाल राजे करा
आपल्या पुत्राला स्वतःच्या हाताने मारणारी चांगुणा. त्याच्या मरणावर दुःखही व्यक्त न करता येणारी चांगुणा अंगणाबाहेर गेली आणि इतका वेळ दाबून धरलेला हुंदका तिने मोकळा केला. चिलिया बाळ चिलिया बाळ म्हणून ती आक्रोश करू लागली. आणि काय चमत्कार! दुसऱ्याच हाकेला तिचा चिलिया बाळ घराबाहेरून धावत येताना तिला दिसला. तिच्या काळजाचा तुकडा ज्याला तिने स्वतःच्या हाताने मारला होता तो दुडू दुडू पावलाने तिच्यापाशी धावत येत होता. चांगुणा जे समजायचे ते सर्व समजून चुकली. चिलया बाळाला कुशीत घेत गुरुबाबाच्या चरणी लोटांगण घातले. कारण चांगुणा ओळखून चुकली होती की तिच्यासमोर साधक वेशातील हा गुरु म्हणजेच तिचे आराध्य दैवत महादेव आहेत जे तिची सत्वपरीक्षा घ्यायला आले होते.
परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवला की आपल्या बऱ्यावाईटाची काळजी आपल्यापेक्षा त्याला जास्त असते. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे चांगुणा आणि चिलया बाळाची गोष्ट. देव त्यांचीच परीक्षा घेतो ज्यांच्यामध्ये परीक्षा देण्याचे बळ असते. म्हणून जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये परीक्षेचे क्षण येतात तेव्हा तेव्हा आपल्यामधील सुप्त बळांना आपण उत्तेजित करावे आणि येणाऱ्या प्रत्येक संकटाला हसतमुखाने सामोरे जावे हे सांगणारी गोष्ट म्हणजे चिल्या बाळाची गोष्ट.