म्याऊँ अँड म्याऊँ जनरल स्टोअर्स

Story: छान छान गोष्ट |
11th October, 10:53 pm
म्याऊँ अँड म्याऊँ जनरल स्टोअर्स

एक होतं जंगल. त्या जंगलात दोन मांजरी राहत होत्या. एकीचं नाव होतं चिमणी, जी दिसायला अगदी चिमणीसारखी छोटी, चपळ आणि हुशार होती. दुसरी होती रुई, रुईच्या बोंडासारखी पांढरीशुभ्र आणि खूप मायाळू. चिमणी खूप विचार करायची आणि रुई तिच्या विचारांना साथ द्यायची.

एक दिवस चिमणी म्हणाली, "रुई गं रुई, नुसतं उंदरांच्या मागे पळण्यात काय मज्जा? आपण काहीतरी नवीन करूया."

रुईने आपले मोठे डोळे मिचकावले, "काय गं चिमणीताई?"

चिमणी उत्साहाने म्हणाली, "आपण दुकान काढूया! म्याऊँ अँड म्याऊँ जनरल स्टोअर्स!"

रुईला कल्पना खूप आवडली. "खरंच का गं? पण आपण विकणार काय?"

"अगं, जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना लागणाऱ्या वस्तू! मध, बिस्किटे, खेळणी, रंगीबेरंगी कपडे, अरे अगदी मासे पण विकू!" चिमणीने डोळे मिचकावले.

दोघींनी मिळून एक छोटीशी जागा शोधली. झाडांच्या बुंध्याला लागून एक रिकामी गुहा होती, ती साफ केली. रंगीबेरंगी झेंडे लावले आणि गुहेच्या दारावर मोठ्या अक्षरांत पाटी लावली, 'म्याऊँ अँड म्याऊँ जनरल स्टोअर्स – मिळेल सर्व काही!'

पहिल्या दिवशी ग्राहकांची गर्दी झाली. ससाभाई आले, त्यांनी कुरकुरीत गाजर बिस्किटे घेतली. कासवदादा आले, त्यांनी आराम करण्यासाठी मऊ चटई मागितली. चिमणी बिल बनवायची आणि रुई हसत-खेळत वस्तू द्यायची. एकदा माकडदादा आले. त्यांना सगळ्या वस्तू एकाच वेळी हव्या होत्या. चिमणीने त्याला समजावले, "माकडदादा, एका वेळी एकच वस्तू घ्या." पण माकडदादा ऐकेचना. चिमणीने विचार केला आणि त्याला एक मोठी पिशवी दिली, " यात तुम्ही हव्या त्या वस्तू टाकू शकता, पण एका वेळी एकच!" माकडदादा खूश झाले.

दुकान छान चालले होते. पण एक दिवस एक मोठी समस्या आली. लांडगामामा आला. तो खूप भूकलेले होता आणि म्हणाला, "मला आत्ताच एक मोठा मासा हवाय, नाहीतर मी तुमचं दुकान बंद करीन!"

चिमणी आणि रुई थोड्या घाबरल्या. पण चिमणीने धाडस केले. ती म्हणाली, "लांडग्यामामा, मासा तयार आहे, पण आधी पैसे द्यावे लागतील."

लांडगामामा गर्दीतून धावून मासा घेण्यासाठी पुढे आला, पण त्यांने पैसे दिले नाहीत. चिमणीने युक्ती केली. तिने आधीच माशांच्या टोपलीखाली सिंहाच्या गर्जनेचा मोठा आवाज करणारी घंटा ठेवली होती. लांडग्याने जसा मासा उचलला, तशी घंटा वाजली. सिंहाच्या डरकाळीने लांडगा मामा घाबरला, तो लागला थरथर कापायला आणि तो मासा सोडून पळूनच गेला. सगळे प्राणी हसू लागले!

चिमणी आणि रुईने एकमेकींकडे पाहिले आणि 'म्याऊँ!' असा आनंदाने आवाज केला. त्यांनी नुसते दुकानच नाही काढले, तर सगळ्या प्राण्यांना शिकवले की, काम प्रामाणिकपणे आणि हुशारीने केले तर कोणतीही भीती वाटत नाही. 'म्याऊँ अँड म्याऊँ जनरल स्टोअर्स' हे जंगलातील सर्वात आवडते आणि गमतीदार दुकान बनले. चिमणी आणि रुई नेहमीच हसत-खेळत सगळ्यांची मदत करायच्या.

- स्नेहा सुतार