प्री- स्क्रिनिंगचे नीट नियोजन केले तर १ वर्षांनी येणाऱ्या परीक्षेत यश मिळण्याची संधी असते. इथेच बाहेर फेकले गेले तर पुढे जाताच येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्री स्क्रिनिंग/स्क्रिनिंगसाठी स्वतःला १२ महिने आधी सज्ज करुन मगच यात उतरावे.
अलिकडेच गोवा एम्प्लॉयमेंट एक्सचेंज विभागाने गोवा सिव्हिल सर्व्हिसेसच्या प्रवेश परीक्षांसाठी चार दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्याची संधी मला प्राप्त झाली. खरंतर अत्यंत स्तुत्य असा हा उपक्रम गोवा सरकारतर्फे सुरु करण्यात आलेला आहे. या कार्यशाळेमध्ये गोमंतकीय उच्च विद्याविभूषित विद्यार्थी आणि शासकीय अधिकारी देखील सहभागी होते. यामध्ये काही वकील होते, काही अभियंते होते, काही शिक्षक तर काही सरकारी अधिकारी देखिल होते. या सर्वांनी जेएसओच्या ३८ जागांसाठी अर्ज भरलेले होते.
जेएसओ म्हणजे ज्युनिअर स्केल ऑफिसर अर्थात, डेप्युटी कलेक्टरची पोस्ट. हे पदाधिकारी म्हणजे गोव्यातील 'आयएएस' समकक्ष उमेदवार. यांची निवड गोवा पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या माध्यमातून केली जाते. कमिशन परीक्षा घेते व चार स्तरांतून ही परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अथवा उमेदवार यांची मुलाखत होऊन पोस्टींग होते. प्री स्क्रिनिंग, मग स्क्रिनिंग, मग लेखी परीक्षा आणि शेवटी तोंडी परीक्षा अश्या क्रमाने निवड असते. ही परीक्षा इतर पोस्टच्या परीक्षांपेक्षा अवघड असते. कारण युपीएससी परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम हा जसाच्या तशा जीपीएससीला लागू पडतो. गोवा राज्य कर्मचारी भरती आयोगातर्फे सुद्धा अलिकडेच भरती प्रक्रिया सुरु झालेली आहे. ‘ग्रुप सी’ आणि ‘ग्रुप डी’ साठीच्या पदांसाठी ही परीक्षा घेतली जाते. यामध्ये स्क्रिनिंग टेस्ट १ आणि स्क्रिनिंग टेस्ट २ असे स्तर असतात. विशिष्ट शासकिय खात्यासाठी जर पोस्ट भरायच्या असतील तर त्या खात्याविषयीचे प्रश्न त्या त्या परीक्षेत विचारले जातात. याला 'कोअर सब्जेक्ट' म्हटले जाते. गंमत अशी आहे की पुढील स्तरावर जाण्यासाठी प्रथम स्क्रिनिंग/प्री स्क्रिनिंग प्रवेश परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. मगच पुढे जाता येते. हजारो विद्यार्थी या परीक्षेला बसतात पण मोजकेच विद्यार्थी ती पास होऊन पुढच्या स्तराला निवडले जातात किंवा पात्र होतात. प्री स्क्रिनिंग अथवा स्क्रिनिंग परीक्षेमध्ये प्रामुख्याने इंग्रजी व त्याचे व्याकरण, गणितीय अर्थात न्युमरीकल अॅबिलीटी, रिझनिंग आणि जनरल अॅप्टीट्यूड असे विषय असतात. ६० मार्कांची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असते. मल्टिपल चॉईस प्रश्न असतात. साधारणपणे ७५ मिनिटात हे प्रश्न सोडवायचे असतात. चांगली गोष्ट म्हणजे याला निगेटिव्ह मार्किंग नसते. त्यामुळे युपीएससीसारखे दडपण नसते. पहिले १० प्रश्न छोटा इंग्रजी उतारा आणि त्यावरील प्रश्न अशा स्वरुपात असतात. मग समानार्थी शब्द तसेच विरुद्ध शब्द यावर प्रश्न असतात. ज्याला सिनॉनीम आणि अँटोनीम असे म्हणतात. काही ठिकाणी वाक्याचे व्याकरण दुरुस्त करा असे प्रश्न असतात. काही इडियोम तसेच म्हणींचा अन्वयार्य विचारला जातो. या ठिकाणी थोडा नीट प्रयत्न केल्यास गुण मिळवता येतात. किंवा येऊ शकतात.
मार्टीन्स यांचे 'वर्ड पॉवर' पुस्तक रेफर केल्यास याचा खूप फायदा होतो. त्यानंतर गणितीय प्रश्न असतात. साधारणपणे १० वी मध्ये जसे प्रश्न असायचे तसे प्रश्न विचारले जातात. उदा. ४ माणसे ८ दिवस १ एकर शेत नांगरु शकतात. तर ६ माणसे तेच शेत किती दिवसात नांगरू शकतील ? एक रेल्वे ताशी ८० किमी/तास वेगाने जाते व दुसरी रेल्वे विरुद्ध दिशेने ६० किमी/तास वेगाने समांतर रुळांवरून येत असेल तर किती वेळात दोन्ही एकमेकांना क्रॉस करतील असे प्रश्न हमखास असतात. प्रश्न सोपे असतात परंतु आपल्याला त्याचे फॉर्म्युले माहीत नसतात आणि सराव देखिल नसतो. त्यामुळे खूपदा इथे मार्क जातात आणि वेळ देखिल जातो. यासाठी सराव वर्ग लावल्यास हे ज्ञान मिळू शकते. काही गणिते रिलेशनशिपबद्दल असतात. पप्पूची आई वंदना असून तिचा भाचा सुरेश आहे. तर सुरेश हा पप्पूच्या मावस बहिणीचा मुलगा आहे. तर मावस बहिणीचे आणि वंदनाचे नाते काय? अशा स्वरुपाचे प्रश्न असतात. सिरीज प्रकारात 'मिसिंग नंबर' शोधून काढायचे असतात. 'ऑड वन आऊट' नुसार ऑड गोष्ट शोधायची असते. काही प्रश्नांना लॉजिकनुसार उत्तरे द्यावी लागतात. त्या उत्तराला काहीतरी लॉजिक असावे लागते. खूपदा विद्यार्थी येथे अपयशी ठरतात. कारण आली परीक्षा - भर फॉर्म या नुसार या परीक्षेत उत्तीर्ण होता येत नाही. किमान १२ महिने आधी याची व्यवस्थित तयारी करून उतरावे लागते. मुलांची तयारी हा एक मोठा इश्यु आहे. यात असे विषय शिकवणारे कोचिंग क्लास देखिल कुठेही उपलब्ध नसतात. प्री- स्क्रिनिंगचे नीट नियोजन केले तर १ वर्षांनी येणाऱ्या परीक्षेत यश मिळण्याचे खूप चान्सेस असतात. इथेच बाहेर फेकले गेले तर पुढे जाताच येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्री स्क्रिनिंग / स्क्रिनिंग साठी स्वतःला १२ महिने आधी सज्ज करुन मगच यात उतरावे.
(लेखक नामांकित वकील आणि करिअर समुपदेशक आहेत.)
- अॅड. शैलेश कुलकर्णी