सुंदर रंग आणि मन प्रसन्न करणारा सुगंध देणारा फुलांचा राजा गुलाब. गुलाबाचे संस्कृत नाव आहे शतपत्री गुलाबाचे फूल केवळ सौंदर्यासाठी आणि शोभेसाठीच नाही, तर आरोग्यासाठीही खूप उपयोगी आहे.
सुंदर रंग आणि मन प्रसन्न करणारा सुगंध देणारा फुलांचा राजा गुलाब. गुलाबाचे संस्कृत नाव आहे शतपत्री गुलाबाचे फूल केवळ सौंदर्यासाठी आणि शोभेसाठीच नाही, तर आरोग्यासाठीही खूप उपयोगी आहे. आज आपण गुलाबाच्या आरोग्यदायी गुणांबद्दल जाणून घेणार आहोत.
आयुर्वेदानुसार गुलाब थंड स्वभावाचा असतो. तो शरीरातील पित्तदोष कमी करतो म्हणजेच उष्णता कमी करतो. गुलाबामध्ये मन शांत करण्याची, रक्त शुद्ध करण्याची आणि त्वचेला सुंदर बनवण्याची शक्ती असते. म्हणून उष्णता कमी करण्यासाठी जी आयुर्वेद औषधं बनवली जातात त्यांमध्ये गुलाबाचा वापर केला जातो. हा गुलाब म्हणजे बाजारात मिळणारी मोठी जाड पाकळ्यांची गुलाबाची फुलं नाहीत हं, हा आपला सुंदर गुलाबी रंगाचा, गुलाबी सुगंधाचा, नाजूक पातळ पाकळ्यांचा देशी गुलाब.
गुलाबाचे आरोग्यदायी फायदे
उष्णता कमी करतो - उन्हाळ्यासाठी खास गुलाबाचे सरबत, गुलकंद बनवले जाते.
उन्हाळ्यात गुलाबाचं सरबत किंवा गुलकंद खाल्ल्यास शरीरातील उष्णता कमी होते आणि थकवा दूर होतो. गुलाबाच्या पाकळ्या किंवा गुलाब जल घालून बनवलेले सुगंधी पाणी उन्हाळ्यात अंघोळीसाठी सुद्धा वापरू शकतो.
डोळ्यांसाठी उपयोगी
गुलाब पाण्याच्या घड्या बंद डोळ्यांवर ठेवल्याने डोळ्यांची जळजळ, थकवा कमी होतो. हे गुलाब पाणी मात्र उत्तम प्रतीचे असले पाहिजे.
त्वचेसाठी उपयुक्त
चेहऱ्याची त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी गुलाब पाण्याचा फवारा चेहऱ्यावर करावा. गुलाब पाण्याच्या स्प्रेमुळे चेहऱ्यावरचा थकवा कमी होतो आणि त्वचा निरोगी रहाते, चेहरा सुंदर दिसतो.
घामाची दुर्गंधी कमी करण्यासाठी गुलाब पाकळ्यांचा लेप शरीराला लावावा.
गुलाबाचे तेल - गुलाबाच्या फुलांपासून सुगंधी तेल बनवले जाते. याचे काही थेंब खोबरेल तेलात घालून मालिशसाठी वापरले असता त्वचा मऊ राहते. अभ्यंग तेलातसुद्धा गुलाब पाकळ्यांचा किंवा गुलाबाच्या चूर्णाचा वापर केला जातो.
मन प्रसन्न करण्यासाठी - बागेत सुंदर गुलाबी रंगाचा गुलाब फुललेला दिसला की मन आनंदी होते. गुलाबाचे विविध रंग आणि सुगंध मन प्रसन्न करतात. गुलाब केसात माळल्याने सौंदर्यसुद्धा खुलते.
असा हा आरोग्यदायी सुंदर फुलांचा राजा तुमच्या बागेत सुद्धा असावा असं तुम्हाला वाटतं ना? चला तर लगेच एक गुलाबाचे रोपटे कुंडीत लावा. या उन्हाळ्यात गुलकंद दूधात घालून किंवा गुलकंद व खोबऱ्याच्या वड्या करून एंजॉय करा आणि माठातले पाणी वापरून गार गार गुलाब सरबतसुद्धा प्या.
वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य