मंगुची अंघोळ!

Story: छान छान गोष्ट |
11th May, 02:26 am
मंगुची अंघोळ!

छोटू दादा रोज सकाळी येतो. सकाळी म्हणजे अगदी लवकर सकाळी हां. आजीच्याच भाषेत सांगायचं तर उजाडल्यावर! सूर्य उगवला की हळूहळू सगळीकडे प्रकाश पसरायला लागतो. घरट्यातली पाखरं उठतात. किलबिलायला लागतात. गोठ्यातल्या गाई उठतात. हंबरायला लागतात. आजी म्हणते, अशावेळी उगाच लोळत राहू नये. लवकर उठावं. आजीच्या घरचा नियमच आहे हा! सकाळी लवकर उठायचं.

पृथाला लवकर उठायला खूपच आवडतं. तिची लाडकी मैत्रीण मंगु उठलेली असते ना! पण बाबाला मात्र सकाळी लवकर उठायचा जाम कंटाळा. आजी सारखी त्याला हाका मारत राहते आणि बाबा अगदी डोक्यावरून पांघरून घेऊन कुरकुरतो, "झोपू दे ना गं आई! ऑफिसची कटकट नाही, तर तू सुखाने झोपू देत नाहीस."

पृथा मात्र मंगुच्या हंबरण्याचा आवाज ऐकला रे ऐकला की लगेच टुणकन उठून बसते. तोपर्यंत छोटू दादा येतोच. मग मंगुला कधी वैरण घालतो तर कधी कडबा. वैरण म्हणजे चारा-गवत बरं का! कडबा म्हणजे बारीक केलेलं धान्य. तर मंगुला गवत फारच आवडतं. कितीतरी वेळ ती गवत चघळत बसते.

"आजी, मंगु बघ कधीची चावतच बसली आहे खाऊ. तिला ओरड ना गं! मला कशी ओरडतेस मग? घास गालात धरून ठेवते म्हणून!" पृथा मंगुची तक्रार आजीकडे करते.

 "अगं रवंथ करते आहे ती. आता लगेच रवंथ म्हणजे काय विचारू नकोस. गाई गुरं आधी भराभर सगळा खाऊ न चावताच खाऊन टाकतात. मग सावकाश खाल्लेलाच खाऊ पुन्हा चावून चावून खातात. त्याला म्हणतात रवंथ करणे! कळलं का? आता नुसतीच प्रश्न विचारत राहणार आहेस की जाणार आहेस छोटू दादा बरोबर मंगुला आंघोळ घालायला?"

 "आंघोळ?" मंगुची आंघोळ म्हटली की पृथाचे मूळचे मोठाले डोळे अधिकच मोठे होतात. मंगुची आंघोळ म्हणजे धमाल असते नुसती! छोटू दादा मंगुला विहिरीजवळच्या, खास मंगुसाठी बांधलेल्या न्हाणी घरात नेतो...

मंगूचा थाट मोठाच आहे बाई! तिला राहण्यासाठी स्वतंत्र गोठा आहे आणि आंघोळीसाठी स्वतंत्र न्हाणी. ही न्हाणी म्हणजे पण मजेशीरच प्रकार आहे. मंगुच्या बाथरूमला भिंतीच नाहीत. आहे ती फक्त पाणी वाहून जाण्यासाठी खणलेली चर. हे पाणी थेट झाडांच्या मुळाशी जातं.

छोटू दादा बादलीभर पाणी विहिरीतून उपसतो आणि अख्खी बादलीच्या बादली उपडी करतो मंगुवर! आणि मग पृथा आणि छोटू दादा दोघेही ओरडतात "घुऽऽश्शोऽऽ..."

मग छोटू दादा आपल्या हाताने मंगुची पाठ, शेपटी, डोकं, खसाखसा घासतो. मंगु पण चाटून चाटून स्वतःचं अंग स्वच्छ करते. मग छोटू दादा पुन्हा विहिरीतून बादलीभर पाणी काढतो आणि पुन्हा "घुऽऽश्शोऽऽ..." अशा पाच सहा बादल्या पाणी घातल्याशिवाय मंगु हलतच नाही विहिरीजवळून. मग शेवटी छोटू दादा तिला विनवून म्हणतो," बस की गं मंगु आता. हात दुखले की गं माझे. पाणी उपसून उपसून!" मग मंगुसुद्धा सगळं समजल्यासारखी मुकाट्याने गोठ्याकडे जायला निघते.

पृथा हा अंघोळीचा कार्यक्रम विहिरीच्या जवळच्या दगडावर बसून पाहते. छोटू दादा जेव्हा "घुऽऽश्शोऽऽ..."  म्हणून बादलीभर पाणी मंगुच्या अंगावर ओततो, तेव्हा पाण्याचे शिंतोडे पृथाच्या अंगावर पण उडतात. पृथाला भारी गंमत वाटते. पण आजी आतून ओरडते, "हां हां छोटू दादा, मंगुलाच घाल बरं का अंघोळ पृथाला नको."

पृथा विचारते, "दादा थंड पाण्याची आंघोळ करून सुद्धा सर्दी कशी नाही होत रे मंगुला?" छोटू दादा ऐटीत सांगतो, "स्ट्रॉंग आहे बरं का आमची मंगु. तुझ्यासारखी नाजूक साजूक नाही. पृथाबाई, माहीत आहे का? एकावेळी दहा दहा पोळ्या खाते आमची मंगु! नाहीतर तू!  एकच पोळी घेऊन बसतेस आपली तासभर!"

"दहा पोळ्या?" बापरे! पृथाचं आश्चर्य तिच्या डोळ्यांत मावत नाही. "खरंच का गं आजी? दहा पोळ्या खाते मंगु रोज?" 

 पण आजी मुळी काही बोलतच नाही. फक्त गालातल्या गालात हसते.


डाॅ. गौरी प्रभू 
९०८२९०५०४५